Posts

घडी..

तिने कूस बदलत चादरीची प्रत्येक घडी चाचपडून पाहिली, एकच आशा मनात, त्याच्या धुंद सुवासाची. काही घड्यांत सापडले तिला उन्मादाच्या कड्यावरले उसासे, काहींमध्ये निव्वळ स्पर्शाची अस्पष्ट रेषा. एका घडीत सापडला लटक्या रागाचा कंगोरा, दुसरीत त्याच्या चुंबनांची प्रेमभेट. एकघडी फारच चुरगळलेली होती, तिच्यात होती वासना, उत्कट स्पर्शाच्या धाग्यांची वीण, विस्कटलेले काही हुंकार, आणि कुस्करल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्या. चादरीच्या कोपऱ्याशी तिला सापडली एक गाठ, रागात एकदा त्यानेच, " मला अजिबात हात लावू नकोस" म्हणत बांधलेली, हलकेच सोडवली तिने, त्यात मग सापडला तिला त्याच्या हसण्याचा आवाज. असंच शोधत शोधत सगळ्या रात्री एकत्र केल्या तिने, प्रेम, उत्कटता, आणि धडपड त्यांच्या स्पर्शांची. तिचं लाजणं, हुंदक्यात लपेटून हसणं, सुखाचे परमोच्च क्षण उपभोगणं तिला नव्याने सापडत गेलं, आणि उमगत गेलं त्याचं वाढलेलं प्रेम !

निनावी..

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला, कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर? पांढरा कागद निळा होईल, कृष्णासारखा ! आणि झिरपेल त्यावर माझी प्रत्येक भावना, उघड होईल माझं मन, आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू. लोकं वाचतील, चर्चा होतील, टीका करतील, थोरवी गातील माझ्या लेखनाची... पण नकोय मला हे, मला बोलायचंय कुठल्याही मापात न झुकता, कोणत्याही चष्म्यातून न पाहता. कागद निळा झाला, उतरली प्रत्येक भावना, जखमेला घातलेला टाका उसवला, आणि उरलं माझं रितेपण ! तितक्यात पाऊस आला, माझ्या आसवांचा, कागद भिजू लागला, शब्द धूसर झाले, स्वल्पविराम लोपले, आणि लुप्त झाले पूर्णविराम ! कागद पुन्हा पांढरा झाला, जुन्या ओळींच्या नकाशासह. माझं मन पुन्हा सुखावलं, शाश्वत, चिरंतन वैगरे सगळं मिथ्या असतं, सत्य असतो केवळ तो क्षण, रसरसलेला, टप्पोरा भरलेला, माझ्या कोऱ्या कागदासारखा. लिहित असते मी त्यावर आवडेल त्या शाईने, कधी जपून ठेवली जातात काही पानं, तर काहींचा होतो निव्वळ चुरगळा !

पाऊससखा....

आज तुला भेटायला यावंसं वाटतंय, न्हाऊन निघावंसं वाटतंय तुझ्या स्पर्शात, श्वासांच्या उसळलेल्या समुद्रात, गंधाच्या उधाणलेल्या वादळात, आणि अडकावंसं वाटतंय बळकट बाहूंच्या भोवऱ्यात. पण बांधलंय मला कर्तव्यांनी, पाऊल अडतंय मनात नसूनही, म्हणून मी पाठवलाय पाऊस, भेटायला तुला, निरोप दिलाय, "फक्त भेट, भिजवू नकोस." तो लबाड ऐकेल याची खात्री मात्र नाही. त्याच्यासोबत सौदामिनीही येईल, जशी मी येते, लखलखत, चंदेरी होऊन. एक सप्तरंगी इंद्रधनुष्य येईल, बघ, कदाचित माझं हसू तुला आठवेल. वाऱ्याचा झोतही येईल, तुला पिसासारखं हलकं करायला. झेल त्या प्रेमधारा मनभरून, तशाच जसं कोसळणाऱ्या मला झेलतोस, अगदी अलगद, कोवळ्या पानावरल्या इवल्या रेशीम किड्यागत. तो पाऊस नं, आहेच मुळी खट्याळ, भिजवलंच ना तुला चिंब? माझ्याकडे आला तो नंतर, रागात मी विचारला जाब त्याला, तर गालातल्या गालात हसून म्हणाला, " मला भेटता येत नसतं, बरसतो मी फक्त. अगदी तुझ्यासारखा. अविरत, बेभान, अविश्रांत, बरसतो केवळ तिच्यासाठी, आणि कोसळत असतेस तू वेड्यासारखी, तुझ्या प्राणसख्यासाठी!"  

सौभाग्याचं लेणं !

खवळलेला समुद्र, उधाणलेला वारा, वाळूही आज अस्वस्थपणे चिडून लाल झाली होती.. तिचा पदर आकाशातल्या पक्षाला साद घालत होता, केसांच्या बटा चेहरा झाकोळून टाकत होत्या, बांगड्यांनी किणकिणणं बंद केलं, कारण त्या आक्रोशत होत्या.. त्यांना रहायचं होतं त्या मनगटापाशी, पण बायका राहूच देत नव्हत्या बांगड्यांना, "विधवेने काहीही आभूषणं घालू नयेत" एक वयस्कर बाई बोलली. लपत लपत, सगळ्यांना झिडकारत ती इथवर आली, केवळ सौभाग्याच्या खुणा होत्या सोबतीला, आणि होते सुजलेले लाल डोळे.. ती जेमतेम स्वतःला सावरत किनाऱ्यावर आली, हो, किनाऱ्यावर आली, आत्महत्या करायला गेली होती ती त्या अवाढव्य समुद्रात, लाटांच्या अधीन होऊन, जीवन संपवायला, पण समुद्रात गेल्यावर हळूच कानाशी आवाज आला, "इतक्या लवकर हरलीस? नाही राणी, be strong. मी आहेच शेजारी, हा बघ असा" शेजारी तिला तो दिसला आणि तिच्या सुजलेल्या डोळ्यांत हास्याची लकेर उठली, तशीच मागे वळली ती, त्याची स्वप्न जगायला, जगाशी लढायला, आणि सौभाग्यचं लेणं जपायला... 

शब्दांपलीकडचं बरंच काही !

मनातले विचार आज कागदावर उतरत नाहीयेत, घाबरतायत ते, खूप घाबरतायत.. आज का असं होतंय कुणास ठाऊक, झालंच नव्हतं असं कधी, नवीनच काहीतरी घडतंय... का घाबरताय बाळांनो? या ना बाहेर, कोणी रोखणार नाही तुम्हाला, बंधन घालणार नाही तुमच्या स्वातंत्र्याला, मी खात्री देते, . . . विश्वास नाहीये ? खरंच देते मी खात्री, या बाहेर निर्धास्त... का त्रास देताय? मी अस्वस्थ झालेय, बाहेर नाही पडलात तर वेडीपिशी होईन, प्लीज या, तुम्हाला आवडतंय ना? हे असं वागायला? इतर वेळी अल्लड मुली घोळक्यात येऊन, पुढे पुढे करत मी येऊ ? मी येऊ? म्हणतात तसे असता, कधीतरी निर्लज्जपणे येताही बाहेर, मग आज का पाऊल अडलेल्या बाईसारखे वागताय? अरे, माझे शब्द कसे स्वच्छंद आहेत, मनमुराद बागडणारे, ऐटीत मिरवणारे... नाहीच येणार का? काय झालंय इतकं? या ना आता खरंच, त्रास होतोय, दिवस पुढे गेलेल्या गरोदर बाईसारखं वाटतंय अगदी.. का पडत नाही आहात बाहेर? का? ठीक आहे, नकाच येऊत. रहा आत घुसमटत, मी आहे मज्जेत, मोकळा श्वास घेतेय, सुखाने जगतेय, पण आज काहीतरी वेगळं घडणार, नक्कीच घडणार, आज बहुदा होईल मग, शब्...

भीती..

मला भीती वाटते रे, रात्र झाली की काळोखाचे राक्षस, अंधाराच्या सावल्या मला खायला उठतात. घर रिकामं असतं माझं, अगदी मोकळं. मग वाटतं खुर्च्या चालतायत, भांडी एकमेकांशी भांडतायत आणि खिडक्या आदळतायत गजांवर. मी दडून बसते मग, चादरीच्या आत, तितकचं समाधान आधाराचं ! आज तू येशील? बरं वाटतं मला तू असलास की, येशील ? तू असलास की बळ येतं मला दहा हत्तींचं, मी जणू शिवरायांचा मावळा होते तेव्हा, तू पण खुश होतोस मग, म्हणतोस, माझं पिल्लू किती ते निडर ! पण, पण, ऐक ना, पिल्लू घाबरतं रे, खूप घाबरतं, सावल्यांच्या खेळाला, भासांच्या अंधाराला. पिपहोलमधून बघितलं की डोळा दिसतो, एकच, पण तो प्रेमाने बघत असतो माझ्याकडे, मग कळतं डोळा तुझाच आहे, "माझी पिल्लू, दार उघड माऊ" म्हणणारा. मी दार उघडते, तू आत येतोस, दार धाड्कन बंद होतं, मी त्या आवाजाला घाबरून तुला घट्ट मिठी मारते, "तू आजची रात्र थांब, जायचं नाही कुठे!" मी तुला सक्त ताकीद देते. तू गायला लागतोस, " आज जानेकी जिद ना करो" ते शब्द गात असतात फरीदा खानुम, पण ते असतात माझ्याच मनातले. तू राहतोस...

मोहिनी ..

प्रेमात पडलंय तुझं हृदय ? मनात फक्त तीच आहे ? मग एक कर, उधळून टाक आयुष्य, चौफेर दौडू देत तुझ्या प्रेमाचे वारू, मस्त स्वार हो आनंदाच्या लाटेवर.. सोबत तिलाही घे, प्रेमात पडलंय तिचंही हृदय ? मग तर रंगून जा एकमेकांच्या मिठीत, आणि पसरू देत तुमच्या शरीराचे सुवास, तुझ्या मनात, तिच्या डोळ्यांत... प्रत्येक उसासा, क्षिणलेला प्रत्येक उच्छवास, तिच्या मानेवर तू दिलेला हलकासा चुंबनझरा, आणि त्याच क्षणी तिच्या नजरेतली लाली, गालावर चढलेला लाजेचा रंग, सगळं टिपून घे तुझ्या डोळ्यांत.... तिचं नाजूक नाक, राग आल्यावर हळूच थोडं मोठं होणारं. तुला न आवडणारे तिचे डोळे, खोल तरीही शांत. तिचं झऱ्यासारखं निखळ हसू, तुझ्या डोळ्यांत दिसतंय तुझं प्रेम.. तिचा राग समजून घे, त्याची सुंदरशी फुलमाळ बनव, तिच्याच केसांत माळ. नभागत भासणाऱ्या तिच्या कपाळावर हलकेच तुझे ओठ टेकव. सुरेखशी लाजेल मग ती भुईकडे पाहत, प्रेमात पडलास ना ह्याच लाजण्यावर? त्याच झुकलेल्या नजरेवर, तिच्या थरथरणाऱ्या पापण्यांवर, वेड लावलंय ना तिने? आणि मग "मोहिनी" हलकेच नाव घे तिचं, बघ, अगदी खुश होईल बापडी.. प्...