Posts

लक्ष्मी..

आज माजघर शांत आहे सुन्न बसलंय स्वयंपाकघर,  चुलीची धग लागत नाहीये  कारण चवताळलाय ज्वाळांचा वावर.. आज बांगड्या नाहीत किणकिणणाऱ्या ना दिसला साडीचा पदर,  कपाळावरलं कुंकूही दिसेना अन् एकाकी राहिला मंगळसूत्राचा सर..  असाच गेला दिवस  ओशाळली दुपार,  भरीस भर म्हणून  आली तिन्हीसांज..  पेटला नाही दिवा तुळशीवृंदावन रितं,  देवही बसले अंधारात देवघरही झालं परकं.. सरली संध्याकाळ उगवली पुनवचांदणी,  घर मात्र तरीही उदास कारण परलोकी गेली घरची लक्ष्मी !

लाल...

माझ्या तळहाताला रंग लागलेला लालभडक, रक्तासारखा ! त्याला येणारा उग्र दर्प, नाकाच्या आत भरून राहिलेला. समोर तो उभा, निमगोरा चेहरा, डोळे बोलके. क्षणार्धात माझा हात त्याच्या गालावर, त्याचा गाल लाल. तोच हात त्याच्या मानेवर, त्याची मानदेखील लाल. त्याने कुंचला घेतला, माझ्या उघड्या पाठीवर फिरवला, मी त्याच्या छातीवर पाठ टेकली, त्याची छातीदेखील लाल ! त्याने माझ्या मानेवर त्याचे ओठ टेकले, ओठ लाल ! मग मिलाप आमच्या ओठांचा, माझेही ओठ लाल. त्याने कुंचला पाण्यात बुडवला, उत्साहात पाणी उडवलं माझ्या अंगावर, माझं शरीर लाल. भावनेच्या भरात मी मारली मिठी त्याला, आता दोन्ही शरीरं लाल, सगळीकडे लाल रंग, तोच रक्तासारखा ! लाल रंग, प्रतीक प्रेमाचं ? सहवासाचं ? प्रीतीचं ? नीट बघ, त्याचं माझं शरीर. माझी छाती चिरलेली, आणि त्याच्या मानेवर सुरा फिरलेला !

"माणूस"

उजाड  रस्ता,  मोकळा पण भकास सूर्य  आणि उध्वस्त दिशा ! वाट नजरेच्या टप्प्यात आहे , पण पावलंच नाहीयेत , तरीही मला जायचंय रांगत का होईना   मला जायचंय.. सगळं वाळवंट आहे. तप्त उष्ण वाळू, चटके बसतायत पावलांना, गिधाडं घिरट्या घालतायत. पाणी दिसतंय मला , पण फक्त डोळ्यातलं. मला पळायचंय  वाचवायचंय स्वतःला... काय सांगतोस ? तो पण अडकलाय ? अरे रे, तो ही अडकलाय, हो मला कळलं सगळेच अडकलेत. बंधनात, नात्यात,  प्रेमात आणि व्यवस्थेत! हळूहळू पोखरतेय ती मला. कुरतडतेय माझी बोटं, बधिर करत चाललीये माझी प्रत्येक नस, जेणेकरून मी विसरेन मला,  मी विसरेन तुला,  मी विसरेन माणूसपणाला, होईन एक प्राणी, सर्कशीतला एक प्राणी,  "माणूस" नावाचा!

शाई...

लॅपटाॅपची उघडी स्क्रीन, बरेच चरे पडलेली ! शेजारी खूप सारे कागद, विखुरलेले ! शाईने भरलेली दौत, तळाशी गळणारी ! शाईचा एक एक थेंब, आधी फरशीवर, मग भिंतीवर, मग स्क्रीनवर ! माझ्या हातांवर, पायाच्या नखांवर, डोळ्याच्या कडांना, कानाशेजारी, शाईचं शाई ! निळसर काळी? की काळसर निळी? ठाऊक नाही... शाई आहे हे निश्चित ! पण काहीतरी चुकतंय, गडबड होतेय ना ? अरे हो, शाई सगळीकडे आहे कागद सोडल्यास ! खंत, शोक, आक्रोश. कागद रडत होता शाईसाठी, अन् शाई नको त्या सगळ्यांकडे जात होती !

नाळ....

त्या कोपऱ्यात एक दिवा पेटतोय, ह्या कोपऱ्यात पंखा फिरतोय. टेबलावर चार कॉफीचे मग, पाचव्या मगातली कॉफी अर्धी माझ्या पोटात, अर्धी कपात, मगाच्या कडेला एक ओघळ येतो कॉफीचा, हळूच माझ्या समोरच्या उघड्या डायरीच्या पानावर पडतो... मी निरखत बसते तो तांबडा, टप्पोरा थेंब. कागद रंग बदलतो अगदी सरड्यासारखा क्षणार्धात ! पंख्याचा आवाज विचित्र यायला लागतो, त्यात एक कागद रोलर कोस्टर खेळत असतो, आणि मला जाणवतं, अर्धीच आहे कविता, मी गर्भार आहे, माझ्या पोटात कवितेचा गर्भ ! प्रसवकळांना सुरुवात,  भयानक वेदना,  मी आक्रंदत असते मनात,  रडत असते हृदयात...  कविता अर्धीच झालेली असते,  बहुदा सिझेरियन करावं लागणार,  डॉक्टर ?  छे !  मीच करणार..  लेखणी घेतली आणि चिरलं मन,  थोडे शब्द बाहेर पडले,  लालसर रक्त जणू !  थोडं अजून आत जावं लागलं,  येस! मिळाली,  कविता मिळाली,  बाहेरही आली. हो, हो, सुखरूप आहेत,  कविता अन् कवयित्री !  एक गोष्ट बाकी आहे,  नाळ,  हो ती कापावी लागेल,  पण सापडत ना...

तू...

दिवसभराचा थकून मी दार ठोठावणार इतक्यात, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?" तू गात होतीस, तसा गायकी गळा नाही तुझा पण सुंदर गातेस.. मागेही जाणवलं होतं ते, जेव्हा स्वयंपाकघरात फोडणी देताना "सलोना सा सजन है और मै हू" गात होतीस. गोड वाटला आवाज तुझा जेव्हा मिठीत शिरून, "रिमझिम गिरे सावन" आळवत होतीस. तेव्हा तर अगदी पाऊसच पडावा इतकं सुंदर बरसत होतीस.. "जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई" तुझ्या कातरलेल्या स्वरांनी मी भानावर आलो, हळूच दार उघडलं, तर पाठमोरी बसलेलीस, मांडीवर छोटी तू, मी अगदी हळुवार पावलांनी जवळ आलो. साधी कॉटनची लाल साडी, पण किती आकर्षक दिसलीस, छोटीशी काळी टिकली, कानात नाजूकसे मोती, आणि कसलंही बंधन नसलेला मुक्त गळा, मंगळसूत्राशिवाय! पिल्लू तुझ्या कुशीत झोपलेली, तिच्या गालावर तुझ्या डोळ्यातला अश्रू सांडणार, इतक्यात मी अलगद तो झेलला, तू जणू मी आहे हे माहीत असल्यासारखी प्रसन्न हसलीस.. "आज उशीर केलास यायला, पिल्लू झोपलं बघ बाबाला न भेटता" मी तरीही तुझ्याकडे एक...

मीरा कृष्ण राधेचा...

व्याकूळ मन माझे  शोधी निखळ प्रेमझरा , त्या वेड्या नभी बरसे  रिमझिमत्या पाऊसधारा ..  चिंब ढगांतून कुंद हवेतून  येई गंध प्रीतीचा , ओलेता होऊन जाई  पदर त्या रातीचा ..  धुंद होऊनी मदमस्त वारा  डोले आनंदात , हासत लाजत वाजवी वीणा  मंद दिव्याची वात ..  ऐल तटावर पैल तटावर  चाले खेळ लाटेचा , त्यासवे मस्तीत नाचे निळा कृष्ण राधेचा .. तया पाहूनी हरखूनी जाई  कृष्णदेखणी राधा ,  कृष्णलीला ही चोरुनी पाहे  वृंदावनीची राधिका .. कृष्णपटलावर मुरडत नाचे मोर - लांडोरीची जोडी ,  त्या नृत्यासह हळूच वाढे  गोप -गोपिकांची लाडी .. त्यांना पाहुनी चिडूनी जाई कृष्णवेडी राधा,  त्याच कृष्णाला गाभारी नेई  कृष्णभक्त मीरा .. प्रेमापलीकडल्या तिच्या प्रेमाला  नसे कसला धिक्कार , दुःखाच्या सागरीही हासेल  असा हा प्रेमालंकार .. मनमंदिरात राधेच्या  केवळ तिचा कान्हा , या प्रीतीच्या आभूषणी शोभे रत्नरूपी मीरा .. अंत असे ना या प्रेमाला  युगायुगांची गोष्ट , कलियुगातही आहे  राधा...