Posts

ओला पाऊस..

कोरडं मन,  सुन्नपणे,  वाट पाहत बसलंय खिडकीत. पण,  ओला पाऊस आज आलाच नाही ! खिडकीचे मोठे गज,  लोखंडी,  मी त्यांच्यात कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यागत गुरफटलेली.  पाऊस,  मला पाऊस हवाय. मी तयार बसलेय खिडकीत  पण,  ओला पाऊस आज आलाच नाही ! खूप आवाज,  प्रचंड धूर,  पण मला हवाय,  गडगडाट ढगांचा,  हवाय लोट मातीचा,  माझं कोरडं मन,  वाट पाहत बसलंय खिडकीत  पण ओला पाऊस आज आलाच नाही ! तो बसलाय  दिमाखात ढगांआड,  माझं सुन्नपण पाहतोय,  शुष्क होत जाणारी त्वचा पाहतोय,  निस्तेज होणारे केस पाहतोय,  आणि मन  कोरडं मन,  कसं कुणास ठाऊक पण त्याला तेही दिसतंय.  त्याच्याकडे चैतन्य आहे,  त्याच्याकडे आनंद आहे,  सुख आहे त्याच्याकडे,  आणि प्रेमही आहे त्याच्याकडे.  त्याच्याकडे विजा आहेत,  त्याच्याकडे गडगडाट आहे,  चिंब बरसणं आहे त्याच्याकडे,  आणि वादळही आहे त्याच्याचकडे.  बघतोय तो ढगांआडून...

वास्तव !

बोलू मी त्याच्या - तिच्यासारखं ? चालेल तुला ? साखरेच्या पाकात बुडवलेल्या कारल्यासारखं ? चालेल तुला ? लिहू मी त्याच्या - तिच्यासारखं ? तेच तेच प्रेम करणं, त्यावरंच सारखं लिहिणं, नाहीतर नेहमीचा पाऊस, चिंब भिजण्याचा अनुभव, लिहू मी तेच ? नवीन प्रेमात पडणं ? पहिलाच स्पर्श ? लिहू मधाळ सगळं ? नकोय वास्तव तुला ? साखरंच हवीये ? लपवलेलं सत्य हवंय ? मीसुद्धा तेच लिहिलेलं हवंय ? नाही !! मला नाही जमायचं, लोकांसारखं बोलणं, सगळ्यांसारखं लिहिणं, मला वास्तव मांडायचंय, अस्वस्थता, तगमग, लिहिता लिहिता हरवणं, कधीतरी मूडच न लागणं, मग चिडचिड, त्रागा, ते मांडायचंय, ते सगळं मांडायचंय.. कारण सगळेच मांडतायंत प्रेम, सुख, दु:ख, सुंदर पडणारा पाऊस, पण मला मांडायचाय; चिखल, कारण तो ही आहे सत्य, मला तेच लिहायचंय, सत्य, परखड पण ढळढळीत, वास्तव !!!   

कॉफीचे थेंब...

सिगरेटचा धूर निघत असल्यासारखा गरम वाफा येत असलेला कॉफीचा मग, समोर उघडी लॅपटाॅपची स्क्रीन, बाहेर आग ओकणारा सूर्य, काळवंडलेलं टेबल, डार्क कॉफीच्या नशेत मी! खट खट खट खट खटखट खटखटखट खटखटखटखट बटणांचा आवाज, टाइपिंगच्या वेगाने प्रणयाच्या धुंदीत असल्यासारखा डुलणारा लॅपटाॅप... विचारांचा आणि टाइपिंगचा वेग जुळवण्याच्या निष्फळ प्रयत्नात मी! युद्धाची वेळ, मेंदूची नस अन् नस उत्तेजित! युद्धाची वेळ, कोण जिंकणार? माझे हात? विचारांचे पाय? युद्ध, युद्धद्धद्ध.... मी तह केला, स्वैर धावणाऱ्या विचारांशी आणि मस्तीत कीबोर्डची तलवार चालवणाऱ्या बोटांशी! दोघांनी एकत्रच जायचं, Not too slow, not too fast, but hand in hand.. क्षीणल्यासारखी मान टाकली स्क्रीनने, मी अचेतन अवस्थेत खुर्चीत, डोळ्यासमोर कवितेचा जन्म, अन् कॉफी मगच्या कडेवरून कडेलोट झाल्यासारखे, ओघळणारे, कॉफीचे थेंब...

घुसमट !

घुसमट मनाची, घुसमट शरीराची, आक्रंदत राहतं ते रात्रभर, समजवण्यापलीकडलं! प्रत्येक श्वास कठीण होतो मग, उगाच जिवंत असल्यासारखा, शरीर बंड करत असतं, मनाविरुद्ध युद्ध सुरू असतं, कोण जिंकणार? शरीर की मन? घुसमट, घुसमट, निव्वळ घुसमट! कूस बदलूनही इलाज नाही, ना पाण्याचे हबकारे मारून, काय करावं? शरीर चिंब भिजलेलं, मन मात्र कोरडं, निस्तेज! घुसमट, रात्रभर! अन् सकाळ, नेहमीसारखी कुबट! 

कविता!

सस्पेन्स ? कॅथार्सिस ? भीती ? निगेटिव्हीटी ? काय आहे माझी कविता ? माझी अभिव्यक्ती ? माझं लिखाण ? माझे विचार ? काय आहेत ते ? काय आहेत शब्द माझे ? निव्वळ अक्षरांची जुळवाजुळव ? की विचारांची सांगड ? आज ठरवूनच बसले, हिशोब मांडायला, कागद आणि शब्दांचा! मात्र सगळ्यात जास्त वेळ घेतला विचारांनी, आणि न थांबणाऱ्या असंख्य प्रश्नांनी... बराच वेळ गेला, रात्रीची मध्यरात्र झाली, मध्यरात्रीची पहाट होणारच होती, इतक्यात, इतक्यात, उत्तर मिळालं! उत्तर मिळालं, माझे शब्द आहेत माझी कविता, त्यातला अर्थ आहे माझी कविता, आणि नकारात्मकता, हो, तीदेखील आहे माझीच कविता! धारदार आहे माझी लेखणी, आणि बोचतात माझे शब्द, चिरल्या जातात मेंदूच्या अगणित नसा, तरीही तुम्ही जिवंत असता, काहीसे बधिर कधीतरी, कधीतरी रोमांचित, तर कधी प्रेमाच्या लाटेवर स्वार, कारण शाश्वत आहे माझी कविता!

प्रश्न

बरेच प्रश्न आहेत मनात, काही उलट, काही सुलट, शिरलेत काही काळजात खोलवर, तर काही उभे ठाकलेत हृदयाच्या वेशीवर. काही लटकलेत मेंदूच्या नसांना, काही थांबलेत डोळ्याच्या कडांना. प्रश्न, अगणित, असंख्य. माझ्या शब्दांपासून, त्याच्या अस्तित्वापर्यंत, प्रश्नच प्रश्न.. का लिहिते मी? का सुचतात शब्द मला? का होते व्यक्त मी शब्दांतून? प्रश्न उत्पत्तीचे, प्रश्न शब्दगर्भाचे, प्रश्न, प्रश्न, डोक्याच्या आरपार, मनाच्या अल्याड, अन् वास्तवाच्या पल्याड, प्रश्न, काही उलट, काही सुलट !

शब्दरांजण

शोधत होते मी कवितेच्या वह्या, कागदांचे गठ्ठे , शब्दांचे ढिगारे.. जसजसा वेळ निसटत होता, मी वेडीपिशी होत होते. एका कवितेत, दुसऱ्या कवितेच्या तिसऱ्या ओळीत, तिसऱ्या कवितेच्या चौथ्या शब्दात, अस्वस्थतेत शोध सुरूच होता माझा.. शाईच्या दौती सांडून झाल्या, अलंकाराची आभूषणे काढून झाली, विरामचिन्हे पाठीशी टाकून झाली, कागदाच्या पारव्याने काळे पंख लेऊन झाले, जमिनीने काळ्या रंगाचा सडा पडलेला पाहिला, सडा, नैराश्याचा, अशांततेचा, अस्तित्वहीनतेचा, अन् असहायतेचा... आता माझा धीर सुटत चालला होता, मला कुठेच का मिळत नाहीये ? सगळंच तर शोधून झालंय, प्रत्येक गोष्ट पाहून झालीये, कविताही धुंडाळून झाल्यात, मग गेलं कुठे ? काय? अच्छा, मी काय शोधतेय विचारताय? मी शोधतेय, माझं "शब्दरांजण"