Posts

ब्लॅक कॉफी आणि गुलाबाचं फूल

विचारांच्या नादात आज ब्लॅक कॉफी, थोडी जास्तच ब्लॅक झाली  आधीच कडवट लागणारी ती, आज अजूनच कडवट लागली  खिडकीच्या थंड पडलेल्या कडाप्प्यावर मी हळूच जाऊन बसले बाहेरचं विस्तीर्ण आभाळ माझ्या डोळ्यांच्या आभाळातून निरखू लागले बाहेर बघता बघता नजर गेली गुलाबाकडे  एरवी असतं भरलेलं आज मात्र एकच फूल त्याच्याकडे  त्या फुलाचा रंगही गडदसा, फुलाच्या नाममात्र पाकळ्या राहिलेल्या  तरीही फूल आकर्षक, गंधही थोडासा मधाळलेला त्या फुलाची एक पाकळी अलगद मातीत पडली  त्यावरून एक आठवण अचानक ताजी झाली  दिवस होते कॉलेजचे आणि होता एक कार्यक्रम  तोही होता सोबत माझ्या, होते त्यालाही निमंत्रण  स्वयंसेवक असूनही स्वागत झाले गुलाबाच्या फुलाने  त्यालाही दिले फूल त्या फुलं देणाऱ्या मुलीने  नाही आवडत तोडलेली फुलं मला  होती बहुधा ही कल्पना त्याला  तरीही घेतलं फूल दोघांनीही  जागा नव्हती पण फूल ठेवायला  "जागा नाहीये जुईली, फूल तुझ्याकडे ठेव" म्हणाला तो काही वर्षांपूर्वी आणि मी अजूनही जपलीये ...

रफ वही

        १३ - १४ जून, मे महिन्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून उजाडताच दादर गर्दीने तुडुंब भरलेलं असायचं. दप्तरं, वह्या-पुस्तकं, कव्हरं, युनिफॉर्म, पाण्याच्या बाटल्या, डब्ब्याच्या बॅगा हे सगळं घेण्यासाठी पालक आणि मुलांची गर्दीच गर्दी.            त्यावेळी मुलांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेतल्या जायच्या, काहींना त्यांच्या आवडीच्या वस्तू मिळायच्या नाहीत, पण कसंही का होईना सगळ्या वस्तू घेऊन घरी जायचं, आणि मग सुरू व्हायची खरी उत्सुकता. वस्तू कधी काढल्या जातायत, कधी एकदा शेजारच्या मित्रमैत्रिणींना दाखवल्या जातायत, वह्या पुस्तकांना कव्हरं घातली जातायत आणि कधी एकदा दप्तर भरलं जातंय. मी मुद्दामहून वह्यांना चॉकलेटी तर पुस्तकांना पारदर्शक कव्हरं घालायचे, कारण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर छान छान चित्रं असायची. तेव्हा स्टेशनरीसाठी कॅमलिन, नवनीत हे फेमस ब्रँड्स होते, कॅमलिनच्या पानं, फुलं, देखावे असणाऱ्या वह्या मिळायच्या, आणि त्यांना कव्हर घालणं अगदी जीवावर यायचं, पण नियम ते नियम, घालावं लागायचं. लहान असत...

युद्ध

मी युद्ध जगले,  रणभूमीवर रक्तपात बघितला,  कत्तल मी पाहिली,  अगदी युद्ध संपल्यावर विधवेच्या पुसलेल्या कुंकवासारखं सांडलेलं रक्तही पाहिलं. आक्रोश, दुःख, पराकोटीची असहायता, श्रद्धा, अंधश्रद्धा, चिरलेले गळे, भोसकलेला चाकू,  रक्ताळलेला निर्जीव देह, मी हारही पाहिली आणि जीतही.  मी येशूला क्रूसावर चढवणारे पाहिले, गांधींना मारणारे पाहिले, दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे बघितले,  कृष्णभक्त पाहिले  आणि हजारो अर्जुनही.  पण आज मी शिकतेय लढायला,  हातात घेतलंय मी शस्त्र सत्याचं, कारण माझ्या अवतीभवती  मुखवटे आहेत केवळ, प्रेमाचे,  काळजीचे,  माणुसकीचे, खोट्या दुःखाचे, मात्र मनात सगळ्यांच्याच  आहे एक जखम, भळाभळा वाहणारी, जी जपतेय अजूनही जातीधर्माच्या गाठी,  आणि मारत चाललीये माणसातील माणुसकीच्या पेशी.. 

सकाळचं कोवळं ऊन

प्रेम ? अगदी प्रसन्न , जणू सकाळचं कोवळं ऊन.. प्रेम , तो – ती , तुम्ही आम्ही , आपली सुंदर हृदयं , प्रेम , आपल्या हृदयातील स्पंदनं.. प्रेम , स्वत्व , वेडेपणा , एकमेकांच्या आवडी , प्रेम , निरभ्र आकाश , थंडीची उबदार पहाट , सदाफुलीचं नाजूक फूल , सुकलेली गुलाबाची पाकळी..     प्रेम , भांडणं , वादावादी , अस्वस्थ रात्री , विस्कटलेली घडी , प्रेम , झुगारून दिलेल्या चालीरीती , सततची आश्वासक मिठी , कागदावरील ओळ खोडलेली , ताकद पुन्हा उभं राहण्याची.. प्रेम , स्पष्ट तरीही अस्पष्ट , कळूनही न कळलेली कविता , रंगाने माखलेला कुंचला , स्वैर उधळलेला घोडा , प्रेम , अबोल शांतता , मोकळा समुद्रकिनारा , मंद तेवणारा दिवा.. प्रेम , मायेचा सुंदर स्पर्श , बाईची गूढ योनी , तिचा काळासावळा देह , प्रेम , त्याचं आडदांड शरीर , त्यांच्या उघड्या छात्या , त्याची रात्रीची चुळबूळ.. प्रेम , निर्मळशी ओवी , सुंदरसा अभंग , समुद्र अथांग , प्रेम , त्याची निःशब्द कृती , व्यक्त अव्यक्त भावना , अन् तिच्य...

स्वातंत्र्यदिन

प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !! आज १५ ऑगस्ट , भारताचा स्वातंत्र्यदिन , उत्साही पालकांचा आपल्या चिमुकल्यांना छानश्या पांढऱ्या कुर्ता , धोतर किंवा साडीत सजवण्याचा अजून एक दिवस , लहान मुलांना शाळेत जाऊन ध्वजारोहण करण्याचा दिवस , कॉलेज पास आउट्ससाठी अभिमानाने कॉलेजमध्ये जाऊन , सिनियर , (एन.सी.सी मध्ये असतील तर अजूनच ऐटीत आणि अभिमानाने) म्हणून मिरवून ध्वजारोहण करण्याचा दिवस तरनोकरी करणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचा ‘ बँक हॉलिडे ’ . मी आता तुम्हाला स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे सांगणार नाहीये , कारण ते माहीत असण्याएवढे सुज्ञ तुम्ही आहात. तर , प्रत्येकासाठी वेगळा असतो स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन. ह्या दिवशी हमखास पहायला , ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी बऱ्याच असतात , सुरुवात होते ठिकठिकाणी दिसणाऱ्या झेंड्यांनी , मग पांढऱ्या कपड्यात किंवा तिरंग्याच्या रंगांच्या वेषात उत्साही मुले किंवा तरुणाई , आणि खास ह्या दोन दिवशी वाजणारी देशभक्तीपर गीते. मग ती घरात वाजणारी असोत किंवा गल्लोगल्ली लाउडस्पीकरवर. ती जणू एक अविभाज्य भाग असल्यासारखी वाजत असतात दिवसभर. पण ...

मी

आजूबाजूला भयंकर कोलाहल,  रस्त्यांवर गाड्यांचे आवाज,  बायकांचे आवाज,  पुरुषांचे आवाज,  लहान मुलांचे आवाज,  आणि कर्कश गाणी ..  रस्त्याच्या मधोमध मी उभी,  निष्प्राण,  मला ऐकू येतायत सगळे आवाज,  दिसतंय सगळं,  पण तरीही मी निष्प्राण,  बाजूने जातायत गाड्या,  मी जागीच थिजलेली,  थकलेली,  डोळे रडून रडून सुजलेले,  डोकं विचार करून बधीर झालेलं,  थकून मी डोळे मिटले, तर, मिटलेल्या माझ्या डोळ्यांत  दिसली मला ती,  वासनेच्या चिखलात लडबडलेली,  कित्येक पुरुषांच्या शरीरांत घुसमटलेली,  शरीराच्या चिंधड्या होत असलेली,  मनाची लक्तरं उरात असलेली,  अत्याचारातही झगडणारी आणि शेवटी दगडाच्या घावात,  अॅॅसिडच्या माऱ्यात,  सुऱ्याच्या भोसक्यात,  निष्प्राण होत असलेली ती ..  मी? मी इथे,  सो कॉल्ड "सुरक्षित" वातावरणात,  होतात मारे माझ्यावरही,  त्यांच्याच नजरेचे,  होतात मलाही स्पर्श,  ऐकते मीही "ए, म...

पाऊस

हा पाऊस ना,  असा अवेळीच कोसळायला लागलाय,  त्याच्या-तिच्या भेटण्याच्या वेळाच चुकवायला लागलाय. हा पाऊस ना,  असा अवेळीच कोसळायला लागलाय .. तिने ठरवलेलं असतं,  सुंदर नटायचं,  गडद जांभळा-निळसर ड्रेस घालून जायचा आज, पण नेमका तेव्हाच हा गडगडायला लागलाय,  हा पाऊस ना,  असा अवेळीच कोसळायला लागलाय ..  त्यानेही आज उत्साहात तिला द्यायला  नाजूकसं फूल घेतलंय,  तिला आवडत नाही तोडलेलं,  म्हणून रस्त्यावर पडलेल्या सड्यातलं उचललंय,  ते नीट रहावं म्हणून त्याची धडपड,  पण हा छत्रीतूनही घुसखोरी करायला लागलाय,  हा पाऊस ना,  असा अवेळीच कोसळायला लागलाय ..  कुठल्याश्या शेडखाली थांबलेलं असताना ती चेहऱ्यावरचे थेंब टिपताना,  केसांतला पाऊस पाडताना,  भिजलेली ओढणी लपेटून घेताना,  डोळ्यांतील काजळाच्या रेषेवरला थेंब पुसताना,  तो तिला एकटक पाहू लागलाय,  हा पाऊस ना,  अगदी योग्य वेळीच कोसळायला लागलाय ..