सौभाग्याचं लेणं !
खवळलेला समुद्र, उधाणलेला वारा, वाळूही आज अस्वस्थपणे चिडून लाल झाली होती.. तिचा पदर आकाशातल्या पक्षाला साद घालत होता, केसांच्या बटा चेहरा झाकोळून टाकत होत्या, बांगड्यांनी किणकिणणं बंद केलं, कारण त्या आक्रोशत होत्या.. त्यांना रहायचं होतं त्या मनगटापाशी, पण बायका राहूच देत नव्हत्या बांगड्यांना, "विधवेने काहीही आभूषणं घालू नयेत" एक वयस्कर बाई बोलली. लपत लपत, सगळ्यांना झिडकारत ती इथवर आली, केवळ सौभाग्याच्या खुणा होत्या सोबतीला, आणि होते सुजलेले लाल डोळे.. ती जेमतेम स्वतःला सावरत किनाऱ्यावर आली, हो, किनाऱ्यावर आली, आत्महत्या करायला गेली होती ती त्या अवाढव्य समुद्रात, लाटांच्या अधीन होऊन, जीवन संपवायला, पण समुद्रात गेल्यावर हळूच कानाशी आवाज आला, "इतक्या लवकर हरलीस? नाही राणी, be strong. मी आहेच शेजारी, हा बघ असा" शेजारी तिला तो दिसला आणि तिच्या सुजलेल्या डोळ्यांत हास्याची लकेर उठली, तशीच मागे वळली ती, त्याची स्वप्न जगायला, जगाशी लढायला, आणि सौभाग्यचं लेणं जपायला...