रफ वही
१३ - १४ जून, मे महिन्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून उजाडताच दादर गर्दीने तुडुंब भरलेलं असायचं. दप्तरं, वह्या-पुस्तकं, कव्हरं, युनिफॉर्म, पाण्याच्या बाटल्या, डब्ब्याच्या बॅगा हे सगळं घेण्यासाठी पालक आणि मुलांची गर्दीच गर्दी. त्यावेळी मुलांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेतल्या जायच्या, काहींना त्यांच्या आवडीच्या वस्तू मिळायच्या नाहीत, पण कसंही का होईना सगळ्या वस्तू घेऊन घरी जायचं, आणि मग सुरू व्हायची खरी उत्सुकता. वस्तू कधी काढल्या जातायत, कधी एकदा शेजारच्या मित्रमैत्रिणींना दाखवल्या जातायत, वह्या पुस्तकांना कव्हरं घातली जातायत आणि कधी एकदा दप्तर भरलं जातंय. मी मुद्दामहून वह्यांना चॉकलेटी तर पुस्तकांना पारदर्शक कव्हरं घालायचे, कारण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर छान छान चित्रं असायची. तेव्हा स्टेशनरीसाठी कॅमलिन, नवनीत हे फेमस ब्रँड्स होते, कॅमलिनच्या पानं, फुलं, देखावे असणाऱ्या वह्या मिळायच्या, आणि त्यांना कव्हर घालणं अगदी जीवावर यायचं, पण नियम ते नियम, घालावं लागायचं. लहान असत...