युद्ध
मी युद्ध जगले, रणभूमीवर रक्तपात बघितला, कत्तल मी पाहिली, अगदी युद्ध संपल्यावर विधवेच्या पुसलेल्या कुंकवासारखं सांडलेलं रक्तही पाहिलं. आक्रोश, दुःख, पराकोटीची असहायता, श्रद्धा, अंधश्रद्धा, चिरलेले गळे, भोसकलेला चाकू, रक्ताळलेला निर्जीव देह, मी हारही पाहिली आणि जीतही. मी येशूला क्रूसावर चढवणारे पाहिले, गांधींना मारणारे पाहिले, दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे बघितले, कृष्णभक्त पाहिले आणि हजारो अर्जुनही. पण आज मी शिकतेय लढायला, हातात घेतलंय मी शस्त्र सत्याचं, कारण माझ्या अवतीभवती मुखवटे आहेत केवळ, प्रेमाचे, काळजीचे, माणुसकीचे, खोट्या दुःखाचे, मात्र मनात सगळ्यांच्याच आहे एक जखम, भळाभळा वाहणारी, जी जपतेय अजूनही जातीधर्माच्या गाठी, आणि मारत चाललीये माणसातील माणुसकीच्या पेशी..