कागदावरली अक्षरे !
कित्येक दिवस निःशब्द होता माझा कंठ, लेखणीची शाई सुकून गेलेली, कोऱ्या कागदांचा ढीग तसाच पडून, एका कोपऱ्यात, न वापरणाऱ्या वस्तूंसमवेत.. रोज बघायचा माझ्याकडे, हसायचा छद्मीपणे, मनातली सल मुद्दाम उलगडायचा, भळाभळा वहायचे मग मी, रक्तच रक्त सांडायचं कागदावर. पण तरी तो हसतच रहायचा, रक्ताळलेला चेहरा, भयानक, आणि क्रूर हसू! अजून काहीतरी मागायचा, सतत, दिवसरात्र टोचत रहायचा मला, छळत रहायचा माझ्या अंतर्मनाला. मी रोज कुढत होते, पाहत होते माझ्या टेबलावरचा पसारा, चुरगळलेले असंख्य कागद, अधीर होऊन रेघोट्या मारलेले कागद, आणि काहीच न लिहिलेले मूक कागद, आज शेवटी घेऊन बसले सगळा पसारा, खरंतर सगळ्यांपेक्षा जास्त बोलले मूक कागद, परखडपणे, पण स्पष्ट! मी हसले कागदाच्या ढिगाकडे पाहून, म्हटलं त्यांना , " संन्यास नव्हता घेतला मी, ही केवळ विश्रांती होती, गरुडझेपेआधीची. लेखक संन्यास घेतच नाही, संन्यास घेतात त्याचे शब्द, तो तरीही जिवंत असतो, वेन्टीलेटरवरच्या शरीरासारखा... तुम्ही डिवचत होतात, चिथवत होतात मला,...