पधारो म्हारे देस (भाग २)
चित्तोडगढ ६९१.९ एकरवर (सौज. विकिपीडिया) पसरलेला भव्य गड आहे. रिक्षाने जाताना प्रत्येक दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही सगळ्यात पहिले गेलो ते राणा कुंभ पॅलेसमध्ये, तो जेवढा विस्तीर्ण आहे त्यावरून त्या काळाची आपण फक्त कल्पना करू शकतो कारण तिथे केवळ पडझड झालेल्या, आगीमुळे काळसर डाग पडलेल्या भिंती आहेत. पण या पडझडीतही इतकं सौंदर्य आहे की, त्या काळी हा गड काय असेल आणि किती सुंदर असेल याची मला कल्पनाही करवत नव्हती. फक्त एका राणीच्या हव्यासापोटी कोणालाही एवढ्या सुंदर गडावर हल्ला करून त्या सगळ्या किल्ल्याची नासधूस करून आग लावावीशी कशी वाटली असेल ? पण असो, तिथे एक वेगळाच रिक्तपणा होता, अप्रतिम फ्रेम्स होत्या. एका बाजूला मीरा पॅलेस होता जिथून थेट मीरेचं मंदीर दिसतं. हळूहळू आम्ही अशा एका ठिकाणी आलो जिथे खाली भुयारात जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. आमच्या रिक्षाचालक / गाईडला विचारलं तर म्हणाला इथूनच राणी पद्मिनी आणि तिच्या दास्या जौहारसाठी (सती जाणं) गेल्या होत्या, ऐकल्याक्षणी अंगावर सरर्कन काटा आला. आम्ही खाली जाऊन पहायचं ठरवलं, कशीतरी हिंमत करत मी चार पायऱ्या उतरले, खाली पूर्ण काळोख होत...