पाऊस
हा पाऊस ना, असा अवेळीच कोसळायला लागलाय, त्याच्या-तिच्या भेटण्याच्या वेळाच चुकवायला लागलाय. हा पाऊस ना, असा अवेळीच कोसळायला लागलाय .. तिने ठरवलेलं असतं, सुंदर नटायचं, गडद जांभळा-निळसर ड्रेस घालून जायचा आज, पण नेमका तेव्हाच हा गडगडायला लागलाय, हा पाऊस ना, असा अवेळीच कोसळायला लागलाय .. त्यानेही आज उत्साहात तिला द्यायला नाजूकसं फूल घेतलंय, तिला आवडत नाही तोडलेलं, म्हणून रस्त्यावर पडलेल्या सड्यातलं उचललंय, ते नीट रहावं म्हणून त्याची धडपड, पण हा छत्रीतूनही घुसखोरी करायला लागलाय, हा पाऊस ना, असा अवेळीच कोसळायला लागलाय .. कुठल्याश्या शेडखाली थांबलेलं असताना ती चेहऱ्यावरचे थेंब टिपताना, केसांतला पाऊस पाडताना, भिजलेली ओढणी लपेटून घेताना, डोळ्यांतील काजळाच्या रेषेवरला थेंब पुसताना, तो तिला एकटक पाहू लागलाय, हा पाऊस ना, अगदी योग्य वेळीच कोसळायला लागलाय ..