Posts

Showing posts from August 14, 2016

भीती..

मला भीती वाटते रे, रात्र झाली की काळोखाचे राक्षस, अंधाराच्या सावल्या मला खायला उठतात. घर रिकामं असतं माझं, अगदी मोकळं. मग वाटतं खुर्च्या चालतायत, भांडी एकमेकांशी भांडतायत आणि खिडक्या आदळतायत गजांवर. मी दडून बसते मग, चादरीच्या आत, तितकचं समाधान आधाराचं ! आज तू येशील? बरं वाटतं मला तू असलास की, येशील ? तू असलास की बळ येतं मला दहा हत्तींचं, मी जणू शिवरायांचा मावळा होते तेव्हा, तू पण खुश होतोस मग, म्हणतोस, माझं पिल्लू किती ते निडर ! पण, पण, ऐक ना, पिल्लू घाबरतं रे, खूप घाबरतं, सावल्यांच्या खेळाला, भासांच्या अंधाराला. पिपहोलमधून बघितलं की डोळा दिसतो, एकच, पण तो प्रेमाने बघत असतो माझ्याकडे, मग कळतं डोळा तुझाच आहे, "माझी पिल्लू, दार उघड माऊ" म्हणणारा. मी दार उघडते, तू आत येतोस, दार धाड्कन बंद होतं, मी त्या आवाजाला घाबरून तुला घट्ट मिठी मारते, "तू आजची रात्र थांब, जायचं नाही कुठे!" मी तुला सक्त ताकीद देते. तू गायला लागतोस, " आज जानेकी जिद ना करो" ते शब्द गात असतात फरीदा खानुम, पण ते असतात माझ्याच मनातले. तू राहतोस...

मोहिनी ..

प्रेमात पडलंय तुझं हृदय ? मनात फक्त तीच आहे ? मग एक कर, उधळून टाक आयुष्य, चौफेर दौडू देत तुझ्या प्रेमाचे वारू, मस्त स्वार हो आनंदाच्या लाटेवर.. सोबत तिलाही घे, प्रेमात पडलंय तिचंही हृदय ? मग तर रंगून जा एकमेकांच्या मिठीत, आणि पसरू देत तुमच्या शरीराचे सुवास, तुझ्या मनात, तिच्या डोळ्यांत... प्रत्येक उसासा, क्षिणलेला प्रत्येक उच्छवास, तिच्या मानेवर तू दिलेला हलकासा चुंबनझरा, आणि त्याच क्षणी तिच्या नजरेतली लाली, गालावर चढलेला लाजेचा रंग, सगळं टिपून घे तुझ्या डोळ्यांत.... तिचं नाजूक नाक, राग आल्यावर हळूच थोडं मोठं होणारं. तुला न आवडणारे तिचे डोळे, खोल तरीही शांत. तिचं झऱ्यासारखं निखळ हसू, तुझ्या डोळ्यांत दिसतंय तुझं प्रेम.. तिचा राग समजून घे, त्याची सुंदरशी फुलमाळ बनव, तिच्याच केसांत माळ. नभागत भासणाऱ्या तिच्या कपाळावर हलकेच तुझे ओठ टेकव. सुरेखशी लाजेल मग ती भुईकडे पाहत, प्रेमात पडलास ना ह्याच लाजण्यावर? त्याच झुकलेल्या नजरेवर, तिच्या थरथरणाऱ्या पापण्यांवर, वेड लावलंय ना तिने? आणि मग "मोहिनी" हलकेच नाव घे तिचं, बघ, अगदी खुश होईल बापडी.. प्...