ओला पाऊस..
कोरडं मन, सुन्नपणे, वाट पाहत बसलंय खिडकीत. पण, ओला पाऊस आज आलाच नाही ! खिडकीचे मोठे गज, लोखंडी, मी त्यांच्यात कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यागत गुरफटलेली. पाऊस, मला पाऊस हवाय. मी तयार बसलेय खिडकीत पण, ओला पाऊस आज आलाच नाही ! खूप आवाज, प्रचंड धूर, पण मला हवाय, गडगडाट ढगांचा, हवाय लोट मातीचा, माझं कोरडं मन, वाट पाहत बसलंय खिडकीत पण ओला पाऊस आज आलाच नाही ! तो बसलाय दिमाखात ढगांआड, माझं सुन्नपण पाहतोय, शुष्क होत जाणारी त्वचा पाहतोय, निस्तेज होणारे केस पाहतोय, आणि मन कोरडं मन, कसं कुणास ठाऊक पण त्याला तेही दिसतंय. त्याच्याकडे चैतन्य आहे, त्याच्याकडे आनंद आहे, सुख आहे त्याच्याकडे, आणि प्रेमही आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे विजा आहेत, त्याच्याकडे गडगडाट आहे, चिंब बरसणं आहे त्याच्याकडे, आणि वादळही आहे त्याच्याचकडे. बघतोय तो ढगांआडून...