पावसापलीकडलं काही.....
आजची सकाळ इतकी सुंदर झाली, डोळे उघडले तर समोर खिडकीत दिसला इवलासा पाऊस, आणि कानाशी छपरावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज... निवारा न मिळाल्याने चिंब भिजून पावसातच बसलेले पक्षी, आभाळात मात्र पावसाचीच नक्षी.. झाडांच्या पानांवर आकार,उकार नसलेली थेंबवेल, आणि पानांच्या कडेला, खिडकीच्या गजाला गोठलेले थेंब... करड्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा, वारा जणू विस्कटत होता पाऊसधारांच्या बटा, कारण तो पाऊस मध्येच शांत होता, मध्येच थोड्या वेगात होता, आणि आता तर एका वेगळ्याच आवेगात आलाय, दिवसभर कोसळायचा निश्चय करून... हवेतही गारवा आलाय, गोधडीची ऊब हवीशी वाटतेय, जिभेवर कॉफीची चव रेंगाळतेय, पोटाला भूकेची जाणीव होतेय, पण डोळे, त्यांना मात्र हलायचं नाहीये, समोर दिसणारा प्रत्येक थेंब, त्या थेंबाची प्रत्येक हालचाल, सततचा पाऊस, हे, हे सगळं डोळ्यात साठवायचंय... मनातल्या प्रत्येक शब्दाला कागदावर उतरवायचंय, त्याच शब्दांना माझ्या भावनांशी भांडायचंय, आठवणींना माझ्या आयुष्यातला प्रत्येक पाऊस आठवायचाय... रेनकोटमध्ये शिरून एक गोंडस बाळ दिसायचंय, हिंदू कॉलनीत साचणाऱ्या पाण्यातून वाट काढायचीये, छत्री...