Posts

Showing posts from October 2, 2016

निनावी..

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला, कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर? पांढरा कागद निळा होईल, कृष्णासारखा ! आणि झिरपेल त्यावर माझी प्रत्येक भावना, उघड होईल माझं मन, आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू. लोकं वाचतील, चर्चा होतील, टीका करतील, थोरवी गातील माझ्या लेखनाची... पण नकोय मला हे, मला बोलायचंय कुठल्याही मापात न झुकता, कोणत्याही चष्म्यातून न पाहता. कागद निळा झाला, उतरली प्रत्येक भावना, जखमेला घातलेला टाका उसवला, आणि उरलं माझं रितेपण ! तितक्यात पाऊस आला, माझ्या आसवांचा, कागद भिजू लागला, शब्द धूसर झाले, स्वल्पविराम लोपले, आणि लुप्त झाले पूर्णविराम ! कागद पुन्हा पांढरा झाला, जुन्या ओळींच्या नकाशासह. माझं मन पुन्हा सुखावलं, शाश्वत, चिरंतन वैगरे सगळं मिथ्या असतं, सत्य असतो केवळ तो क्षण, रसरसलेला, टप्पोरा भरलेला, माझ्या कोऱ्या कागदासारखा. लिहित असते मी त्यावर आवडेल त्या शाईने, कधी जपून ठेवली जातात काही पानं, तर काहींचा होतो निव्वळ चुरगळा !

पाऊससखा....

आज तुला भेटायला यावंसं वाटतंय, न्हाऊन निघावंसं वाटतंय तुझ्या स्पर्शात, श्वासांच्या उसळलेल्या समुद्रात, गंधाच्या उधाणलेल्या वादळात, आणि अडकावंसं वाटतंय बळकट बाहूंच्या भोवऱ्यात. पण बांधलंय मला कर्तव्यांनी, पाऊल अडतंय मनात नसूनही, म्हणून मी पाठवलाय पाऊस, भेटायला तुला, निरोप दिलाय, "फक्त भेट, भिजवू नकोस." तो लबाड ऐकेल याची खात्री मात्र नाही. त्याच्यासोबत सौदामिनीही येईल, जशी मी येते, लखलखत, चंदेरी होऊन. एक सप्तरंगी इंद्रधनुष्य येईल, बघ, कदाचित माझं हसू तुला आठवेल. वाऱ्याचा झोतही येईल, तुला पिसासारखं हलकं करायला. झेल त्या प्रेमधारा मनभरून, तशाच जसं कोसळणाऱ्या मला झेलतोस, अगदी अलगद, कोवळ्या पानावरल्या इवल्या रेशीम किड्यागत. तो पाऊस नं, आहेच मुळी खट्याळ, भिजवलंच ना तुला चिंब? माझ्याकडे आला तो नंतर, रागात मी विचारला जाब त्याला, तर गालातल्या गालात हसून म्हणाला, " मला भेटता येत नसतं, बरसतो मी फक्त. अगदी तुझ्यासारखा. अविरत, बेभान, अविश्रांत, बरसतो केवळ तिच्यासाठी, आणि कोसळत असतेस तू वेड्यासारखी, तुझ्या प्राणसख्यासाठी!"