Posts

Showing posts from January 22, 2017

लाल...

माझ्या तळहाताला रंग लागलेला लालभडक, रक्तासारखा ! त्याला येणारा उग्र दर्प, नाकाच्या आत भरून राहिलेला. समोर तो उभा, निमगोरा चेहरा, डोळे बोलके. क्षणार्धात माझा हात त्याच्या गालावर, त्याचा गाल लाल. तोच हात त्याच्या मानेवर, त्याची मानदेखील लाल. त्याने कुंचला घेतला, माझ्या उघड्या पाठीवर फिरवला, मी त्याच्या छातीवर पाठ टेकली, त्याची छातीदेखील लाल ! त्याने माझ्या मानेवर त्याचे ओठ टेकले, ओठ लाल ! मग मिलाप आमच्या ओठांचा, माझेही ओठ लाल. त्याने कुंचला पाण्यात बुडवला, उत्साहात पाणी उडवलं माझ्या अंगावर, माझं शरीर लाल. भावनेच्या भरात मी मारली मिठी त्याला, आता दोन्ही शरीरं लाल, सगळीकडे लाल रंग, तोच रक्तासारखा ! लाल रंग, प्रतीक प्रेमाचं ? सहवासाचं ? प्रीतीचं ? नीट बघ, त्याचं माझं शरीर. माझी छाती चिरलेली, आणि त्याच्या मानेवर सुरा फिरलेला !