रात्र
रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल... ती हल्ली मध्येच दचकून जागी होते, झोपेत बडबडत असते असंबंध, दरदरून घाम फुटतो तिला कधीतरी, पुन्हा कानठळ्या बसतील की काय ? रक्ताचे पाट पुन्हा वाहतील की काय ? २६ / ११ पुन्हा उजाडेल काय ? रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल... विजांचा कडकडाट तिचा थरकाप उडवतो, ढगांचा गडगडाट तिचा ठोका चुकवतो, पुन्हा तो गर्जना करेल काय ? पावसाचा पूर पुन्हा येईल काय ? २६ जुलै पुन्हा कोसळेल काय ? रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल... रिकामी बस बघून तिला भीती वाटते, निर्जन रस्ता आला की तिची धडधड वाढते, पुन्हा 'ती'च्यावर अत्याचार होतील काय ? 'ती'च्या किंकाळ्यांनी कानाचे पडदे फाटतील काय ? 'निर्भया'वर पुन्हा बलात्कार होतील काय ? रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल... अशीच स्वप्नं पडू लागली, अशाच कित्येक रात्री, रात्र जागू लागली, चिखल, गाळ, माणुसकीच्या कचऱ्याची दुर्गंधी सगळीकडे, अब्रू रस्त्यावर विकायला ठेवलेली, वासना नग्न होऊन फिरत असलेली, विचारांनी कधीच आत्महत्या केलेली, अन् डोळे, कधीच अंध झालेले... रात्र, बिथरलेली,...