भाषा आणि तिचं (निराशाजनक) भविष्य?
आत्ता अगदी थोड्याच वेळापूर्वी मी भाषा आणि त्याचं भविष्य या विषयावर एक संदेश (मेसेज) पाठवला होता, त्याच विषयावर थोडं सविस्तर बोलण्यासाठी ही आजची पोस्ट.त्याआधी विषय नक्की काय आहे हे थोडक्यात : भाषा, त्याचं भविष्य आणि विशेषतः मराठी. "मिळणं" आणि "भेटणं" या क्रियापदांमध्ये होणारी गफलत. तर, जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा त्यातले शब्द, त्यांचा अर्थ आणि ते शब्द जिथे वापरले जातात त्यांचे संदर्भ हे सगळं शिकत असतो. बऱ्याचदा असं होतं की ह्या सगळ्यांची सांगड ही त्या त्या भाषिकानुसार बदलते. म्हणजे असं की, मराठी ही फक्त एकच नाहीये तर ती बऱ्याच छोटया छोटया अनेक मराठींची बनलेली आहे. मग ती पुण्याकडची मराठी असो, विदर्भातली असो किंवा खानदेशातली ह्या प्रत्येक प्रांतानुसार भाषा बदलते, जिला भाषाविज्ञानात Variation म्हणतात. आता तुम्ही वास्तविकता डोळ्यासमोर ठेवा आणि बघा की गोष्टी कशा आणि कुठे बदलतात. प्रत्येक शहरात आणि गावात भागाभागांप्रमाणे भाषा बदलते, ह्या वाडीत एखाद्या शब्दाचा अर्थ क्ष असतो तर लगेच पुढच्या वाडीत त्याच शब्दाचा अर्थ य होतो....