Saturday, 22 June 2019

रफ वही

        १३ - १४ जून, मे महिन्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून उजाडताच दादर गर्दीने तुडुंब भरलेलं असायचं. दप्तरं, वह्या-पुस्तकं, कव्हरं, युनिफॉर्म, पाण्याच्या बाटल्या, डब्ब्याच्या बॅगा हे सगळं घेण्यासाठी पालक आणि मुलांची गर्दीच गर्दी. 
          त्यावेळी मुलांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेतल्या जायच्या, काहींना त्यांच्या आवडीच्या वस्तू मिळायच्या नाहीत, पण कसंही का होईना सगळ्या वस्तू घेऊन घरी जायचं, आणि मग सुरू व्हायची खरी उत्सुकता. वस्तू कधी काढल्या जातायत, कधी एकदा शेजारच्या मित्रमैत्रिणींना दाखवल्या जातायत, वह्या पुस्तकांना कव्हरं घातली जातायत आणि कधी एकदा दप्तर भरलं जातंय. मी मुद्दामहून वह्यांना चॉकलेटी तर पुस्तकांना पारदर्शक कव्हरं घालायचे, कारण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर छान छान चित्रं असायची. तेव्हा स्टेशनरीसाठी कॅमलिन, नवनीत हे फेमस ब्रँड्स होते, कॅमलिनच्या पानं, फुलं, देखावे असणाऱ्या वह्या मिळायच्या, आणि त्यांना कव्हर घालणं अगदी जीवावर यायचं, पण नियम ते नियम, घालावं लागायचं. लहान असताना आई आणि नंतर स्वतःची स्वतः ही कव्हरं घातली जायची, मग त्यांना लेबल लावायचं, घरातल्या सगळ्यात सुंदर हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीकडून नाव लिहून घ्यायचं. माझ्या वह्यापुस्तकांवर माझा बाबा हे नाव लिहून द्यायचा. 
           सगळ्यात कठीण काम असायचं प्लॅस्टिक कव्हर घालणं, ते घालताना अक्षरशः तारांबळ उडायची. कारण तो रोल असायचा, कात्रीने कापला की कसाही फाटायचा. मात्र थोडं मोठं झाल्यावर हे कसब जमायला लागलं. तर मग हे सगळं झालं की दप्तर भरायचं, वह्या-पुस्तकं प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची, रेनकोट ठेवायचा, आणि मग शाळेसाठी तयार. वर्ग ठरलेला असेल तर मित्रमैत्रिणींना भेटायची नाहीतर बाई कोण, आधीच्या वर्गातले कोणते मित्रमैत्रिणी या वर्गातही आहेत या सगळ्याची उत्सुकता. आणि या सगळ्यानंतर शाळा सुरू व्हायची. रेनकोट एक साईझ मोठा असायचा कारण त्यात तुम्ही आणि तुमचं दप्तर हे दोघंही मावणं महत्त्वाचं असायचं. आणि बऱ्याचदा हाच रोनकोट दोन तीन वर्षं वापरला जाईल हा पालकांचा छुपा हेतूही असायचा. शाळेत बस किंवा ट्रेन आणि अगदीच नाही झालं तर स्कूलबसने जावं लागायचं. शाळेचा युनिफॉर्म, त्यात बूट, तेही कॅन्व्हसचे, कारण पावसात बूट सॉक्स दोन्ही खराब व्हायचे. 
         आत्ताच्या मुलांना ही मज्जा किती प्रमाणात मिळत असेल काय माहीत! त्यांच्यापैकी बरेच जण गाड्यांनी शाळेत जातात, बऱ्यापैकी प्रत्येकाकडे शाळेतही फोन असतो. 'आमच्या काळी असं होतं' हे खूपच टिपिकल वाक्य आहे पण खरंच ते म्हणावंसं वाटतं कारण खरंच गोष्टी तेवढ्या बदलल्यात. आमच्या शाळेत फोन करणं अगदी दूरवर राहिलं, अगदीच अडचण असेल तर बाई किंवा शिपाई बाई फोन करायच्या. आता रेनकोटच्या जागी बरीच मुलं छत्र्यांमध्ये दिसतात, आडव्या दप्तरांची जागा सॅकने घेतलीये, आधी दप्तरांचे वेगळे 'ब्रँड' असतात याची आम्हा बापुड्यांना कल्पनाच नसायची आणि आत्ताची मुलं शाळेत असतानापासूनच पुमा, आदिदास, वाईल्डक्राफ्ट असल्या बॅग्ज घेऊन शाळेत जातात. त्यात त्या सॅकलाही रेनकव्हर असतं. पाण्याच्या बाटल्या आता गळ्यात घातल्या जात नाहीत. मी आठवी - दहावीत असतानाच 'ब्राऊन कलरच्या' वह्या मिळायला लागल्या, जेणेकरून कव्हर घालण्याची झंझट नाही, आतातर मुलं बायजूज आणि इ-लर्निंगमधून सगळं शिकतात. 'टीचर' ची खिल्ली उडवली जाते. काळ बदलला आणि मुलंही... 
          शाळेत असताना निबंधलेखनात विषय असायचा 'माझी शाळा' , ज्यावर मी कधीच लिहिलं नाही कारण मी नेहमीच निसर्गाशी संबंधित कोणतातरी विषय निवडायचे. पण आता ८-५ जॉब सुरू झाल्यावर, शनिवार-रविवार सुट्टी मिळायला लागल्यावर, कितीही मिस केलं तरी पुन्हा शाळेत जाता न येण्याच्या वयात आल्यावर त्यावर लिहावंसं वाटलं. प्रत्येक आठवणी सुंदर असतात, प्रत्येकाच्या मनात त्याची जागा वेगवेगळी असते. बऱ्याच जणांसाठी शाळेच्या आठवणी विशेष असतात. माझ्यासाठी म्हटलं तर शाळा ही शाळा होती, तिची जागा ना कॉलेज घेऊ शकलं ना युनिव्हर्सिटी. मस्त सकाळी उठून ट्रेनने, तेही फर्स्ट क्लासमधून जायचं (त्यावेळी शाळेतल्या मुलांना कोणी काही बोलत नव्हतं), दादरला उतरून ७ गल्ल्या चालायचं, 'राजा शिवाजी विद्यासंकुल' असं थाटात मिरवणाऱ्या बोर्डच्या गेटमधून आत शिरायचं, भांडार (स्टेशनरी मिळणारं दुकान) बघायचं, मग सुरू होणारं शाळेचं अवाढव्य मोठ्ठं मैदान बघायचं, मैदानाच्या कडांनी शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यापर्यंत वाढलेली झाडं बघायची, शाळेच्या पहिल्या पायरीला नमस्कार करायचा आणि मग पहिलं पाऊल टाकायचं. 
          कितीही जावंसं वाटलं तरी परत त्या वयात जाणं शक्य नाही. पण शरारतमधल्या जियासारखं 'श्रींग भिंग सर्वलिंग भूत भविष्य वर्तमान बदलिंग' असा पऱ्यांचा मंत्र म्हणून जर एक गोष्ट बदलता आली असती तर मला नक्कीच पुन्हा लहान व्हायला आवडेल, शाळेच्या बाकावर बसून बाहेर कोसळणारा पाऊस बघायला आवडेल. आयुष्याला अत्तराच्या कुपीची आणि शाळेला मोरपीस वगैरे बऱ्याच उपमा दिल्या जातात. पण माझ्यासाठी शाळा म्हणजे ती एक रफ वही आहे ज्यात विषयांच्या याद्या, प्रत्येक विषयाला किती पाणी वह्या, शिक्षकांची नावं, वेळापत्रक, पाचवीपासून आत्तापर्यंत माझी बेस्टफ्रेंड असलेल्या मॅड जुईलीने 'जाने तू या जाने ना' पिक्चरची गाणी असं सगळंच लिहिलेलं आहे. ती रफ वही रोज लागली नाही तरी नेहमी दप्तरात असायची, ज्याच्यात फुल्लीगोळा, चित्रं असं बरंच काही असायचं. 
          शाळेची सगळीच वह्या-पुस्तकं देऊन टाकलेली असली तरी अजूनही जांभळ्या रंगाची फुलं असलेली ती रफ वही माझ्या पुस्तकांच्या खणात आणि मनात जपून ठेवलेली आहे. कधीही जावं आणि मनातल्या मनात ती उघडून एवढ्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर हात फिरवून तो अनुभवावा इतकी प्रसन्न आणि ताजी!   

                                          

Sunday, 17 February 2019

युद्ध

मी युद्ध जगले, 
रणभूमीवर रक्तपात बघितला, 
कत्तल मी पाहिली, 
अगदी युद्ध संपल्यावर
विधवेच्या पुसलेल्या कुंकवासारखं सांडलेलं
रक्तही पाहिलं.

आक्रोश,
दुःख,
पराकोटीची असहायता,
श्रद्धा,
अंधश्रद्धा,
चिरलेले गळे,
भोसकलेला चाकू, 
रक्ताळलेला निर्जीव देह,
मी हारही पाहिली
आणि जीतही. 

मी येशूला क्रूसावर चढवणारे पाहिले,
गांधींना मारणारे पाहिले,
दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे बघितले, 
कृष्णभक्त पाहिले 
आणि हजारो अर्जुनही. 

पण आज मी शिकतेय लढायला, 
हातात घेतलंय मी शस्त्र सत्याचं,
कारण माझ्या अवतीभवती 
मुखवटे आहेत केवळ,
प्रेमाचे, 
काळजीचे, 
माणुसकीचे,
खोट्या दुःखाचे,
मात्र मनात सगळ्यांच्याच 
आहे एक जखम,
भळाभळा वाहणारी,
जी जपतेय अजूनही जातीधर्माच्या गाठी, 
आणि मारत चाललीये माणसातील माणुसकीच्या पेशी.. 

Sunday, 25 November 2018

सकाळचं कोवळं ऊन

प्रेम ?
अगदी प्रसन्न,
जणू सकाळचं कोवळं ऊन..

प्रेम,
तो – ती,
तुम्ही आम्ही,
आपली सुंदर हृदयं,
प्रेम,
आपल्या हृदयातील स्पंदनं..

प्रेम,
स्वत्व,
वेडेपणा,
एकमेकांच्या आवडी,
प्रेम,
निरभ्र आकाश,
थंडीची उबदार पहाट,
सदाफुलीचं नाजूक फूल,
सुकलेली गुलाबाची पाकळी..
  
प्रेम,
भांडणं,
वादावादी,
अस्वस्थ रात्री,
विस्कटलेली घडी,
प्रेम,
झुगारून दिलेल्या चालीरीती,
सततची आश्वासक मिठी,
कागदावरील ओळ खोडलेली,
ताकद पुन्हा उभं राहण्याची..

प्रेम,
स्पष्ट तरीही अस्पष्ट,
कळूनही न कळलेली कविता,
रंगाने माखलेला कुंचला,
स्वैर उधळलेला घोडा,
प्रेम,
अबोल शांतता,
मोकळा समुद्रकिनारा,
मंद तेवणारा दिवा..

प्रेम,
मायेचा सुंदर स्पर्श,
बाईची गूढ योनी,
तिचा काळासावळा देह,
प्रेम,
त्याचं आडदांड शरीर,
त्यांच्या उघड्या छात्या,
त्याची रात्रीची चुळबूळ..

प्रेम,
निर्मळशी ओवी,
सुंदरसा अभंग,
समुद्र अथांग,
प्रेम,
त्याची निःशब्द कृती,
व्यक्त अव्यक्त भावना,
अन्
तिच्या गर्भातील ब्रम्हांड...Wednesday, 15 August 2018

स्वातंत्र्यदिन

प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!

आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन,
उत्साही पालकांचा आपल्या चिमुकल्यांना छानश्या पांढऱ्या कुर्ता, धोतर किंवा साडीत सजवण्याचा अजून एक दिवस, लहान मुलांना शाळेत जाऊन ध्वजारोहण करण्याचा दिवस, कॉलेज पास आउट्ससाठी अभिमानाने कॉलेजमध्ये जाऊन, सिनियर, (एन.सी.सी मध्ये असतील तर अजूनच ऐटीत आणि अभिमानाने) म्हणून मिरवून ध्वजारोहण करण्याचा दिवस तरनोकरी करणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचा बँक हॉलिडे.
मी आता तुम्हाला स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे सांगणार नाहीये, कारण ते माहीत असण्याएवढे सुज्ञ तुम्ही आहात. तर, प्रत्येकासाठी वेगळा असतो स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन. ह्या दिवशी हमखास पहायला, ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी बऱ्याच असतात, सुरुवात होते ठिकठिकाणी दिसणाऱ्या झेंड्यांनी, मग पांढऱ्या कपड्यात किंवा तिरंग्याच्या रंगांच्या वेषात उत्साही मुले किंवा तरुणाई, आणि खास ह्या दोन दिवशी वाजणारी देशभक्तीपर गीते. मग ती घरात वाजणारी असोत किंवा गल्लोगल्ली लाउडस्पीकरवर. ती जणू एक अविभाज्य भाग असल्यासारखी वाजत असतात दिवसभर.
पण तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी होत असतं, त्यांची बिल्डिंग ध्वजारोहण करतेय, आपण पण करायला हवं, त्यांनी ही गाणी लावलीत आपण अजून मोठ्याने ती गाणी लावायला हवीत. हे असं नसतं, आपल्यापैकी किती जण देशप्रेमाच्या भावनेने ह्या गोष्टी करतो? राष्ट्रगीत ऐकल्यावर स्तब्ध उभं राहून आपला आदर व्यक्त करायचा हे अगदी लहान असताना शाळेत शिकवलं जायचं, तेव्हापासून आजवर कुठेही राष्ट्रगीत लागलं की स्तब्ध उभं रहायचं, उभं राहणं शक्य नसेल तर निदान स्तब्ध रहायचं पण आपण करतो हे सगळं?
प्रत्येक वेळी जेव्हा राष्ट्रगीत माझ्या कानावर पडतं तेव्हा अंगावर काटा येतो आणि नकळत डोळे पाणावतात, आणि हे केवळ लिहायचं म्हणून लिहित नाहीये मी, तर हे खरंच होतं. डोक्यात विचार सुरू होतात की कसा असेल तो काळ? १९४७ चा किंवा पारतंत्र्यातला? काय असेल तो आनंद स्वातंत्र्याचा? कित्येक स्वातंत्र्यसैनिकांची बलिदानं, सहन केलेला अपमान छळ, हे सगळंच. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे, पण त्या काळातल्या, प्रत्यक्ष ते वातावरण जगलेल्या लोकांना ह्या शब्दाचा जो अर्थ कळला तो आपल्याला किंचितही कळणार नाही कारण आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला. तर, हा असा स्वातंत्र्यदिन!
रोज सीमेवर लाखो जवान आपल्या देशाचे रक्षण करत असतात, त्यांच्यासाठी देशसेवा हेच कर्म आणि हाच धर्म असतो, त्यांच्यासाठी हा दिवस काय असेल ह्याची आपण फक्त कल्पना करू शकतो बहुधा.
आपण सामान्य नागरिक, आपण सीमेवर जाऊन लढत नाही, आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन शत्रूशी दोन हात करत नाही, आपण बंदूक, रायफलही हाती घेत नाही, आपण युनिफॉर्म घालत नाही, आपण छातीवर मेडल्स मिरवत नाही, मृत्यूनंतर आपण शहीदही होत नाही, तिरंग्यात लपेटून आपण अनंतात विलीन होत नाही, हे काहीच आपण करत नाही, पण म्हणून आपण काहीच करू शकत नाही असं नाहीये. छोट्या पातळीवर आपणही काही गोष्टी करू शकतो, त्या अगदी लढाई एवढ्या नसल्या तरी जे देशप्रेम आपल्या मनात आहे ते या गोष्टींमधून नक्की दिसू शकेल.
          अगदी साध्या आहेत काही गोष्टी,  म्हणजे;

  •  उगाच रस्त्यावर टाकणार असू तर झेंडे विकत न घेणं, एक दिवसापुरतं देशप्रेम मिरवून दुसऱ्या दिवशी तेच झेंडे पायदळी न तुडवणं. 
  • एकदाच खरेदी केलेला झेंडा दरवर्षी वापरता आला तर उत्तम. 
  •  जर माझ्यासारखे झेंडा विकत न घेणारे असाल तर पडलेला झेंडा दिसला तर तो उचलणं, कितीही फाटलेला असला तरी तो उचलावा, कारण त्या झेंड्याची शान आणि मान वेगळा आहे, तो त्याला देणं.
  • देशप्रेम म्हणजे केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन नव्हे, त्याहून बरीच मोठी ह्या एका शब्दाची व्याप्ती आहे, ती आपण समजू नाही शकलोरी हरकत नाही, पण निदान ज्यांना ती समजली आहे त्यांचा आदर करणं.
ह्या केवळ मला वाटणाऱ्या काही गोष्टी आहेत, तुमच्या तुमच्यानुसार इतर बऱ्याच गोष्टी असू शकतात, त्या नक्की करा. केवळ एक – दोन दिवशी देशप्रेम उफाळून येऊ देऊ नका, देशप्रेम मनात जपा, ते दाखवायलाचं हवं असंही नसतं, पण जी काही देशाप्रती तुमची भावना आहे ती खरी आणि निर्मळ असली तर ती नक्कीच सुंदर असते.
          हा लेख लिहिण्यामागे आजच्या दिवसाचं केवळ निमित्त होतं, उगाच ज्ञान देणं हा या लेखामागील हेतू नव्हे. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्ल मी आधीच माफी मागते.

वंदे मातरम्!
Friday, 10 August 2018

मी

आजूबाजूला भयंकर कोलाहल, 
रस्त्यांवर गाड्यांचे आवाज, 
बायकांचे आवाज, 
पुरुषांचे आवाज, 
लहान मुलांचे आवाज, 
आणि कर्कश गाणी .. 

रस्त्याच्या मधोमध मी उभी, 
निष्प्राण, 
मला ऐकू येतायत सगळे आवाज, 
दिसतंय सगळं, 
पण तरीही मी निष्प्राण, 
बाजूने जातायत गाड्या, 
मी जागीच थिजलेली, 
थकलेली, 
डोळे रडून रडून सुजलेले, 
डोकं विचार करून बधीर झालेलं, 
थकून मी डोळे मिटले,
तर, मिटलेल्या माझ्या डोळ्यांत 
दिसली मला ती, 
वासनेच्या चिखलात लडबडलेली, 
कित्येक पुरुषांच्या शरीरांत घुसमटलेली, 
शरीराच्या चिंधड्या होत असलेली, 
मनाची लक्तरं उरात असलेली, 
अत्याचारातही झगडणारी
आणि शेवटी दगडाच्या घावात, 
अॅॅसिडच्या माऱ्यात, 
सुऱ्याच्या भोसक्यात, 
निष्प्राण होत असलेली ती .. 

मी?
मी इथे, 
सो कॉल्ड "सुरक्षित" वातावरणात, 
होतात मारे माझ्यावरही, 
त्यांच्याच नजरेचे, 
होतात मलाही स्पर्श, 
ऐकते मीही "ए, माल"  
पण झटकून टाकते सगळं
अंगावरल्या धुळीसारखं, 
शक्य तेव्हा लढतेसुद्धा. 
पण वास्तव बघून सुन्न होते, 
बाई? 
ती काही सुरक्षित नाहीये, 
देवी? 
देवी तर बिलकूल नाहीये, 
नका करू उगाच तिची पूजा, 
तिला गरज नाहीये त्याची, 
शांत जगायचंय तिला, 
ते जगू द्या .. 

प्लीज ते जगू द्या ... 

Sunday, 24 June 2018

पाऊस

हा पाऊस ना, 
असा अवेळीच कोसळायला लागलाय, 
त्याच्या-तिच्या भेटण्याच्या वेळाच चुकवायला लागलाय.
हा पाऊस ना, 
असा अवेळीच कोसळायला लागलाय ..

तिने ठरवलेलं असतं,
 सुंदर नटायचं, 
गडद जांभळा-निळसर ड्रेस
घालून जायचा आज,
पण नेमका तेव्हाच हा गडगडायला लागलाय, 
हा पाऊस ना, 
असा अवेळीच कोसळायला लागलाय .. 

त्यानेही आज उत्साहात तिला द्यायला 
नाजूकसं फूल घेतलंय, 
तिला आवडत नाही तोडलेलं, 
म्हणून रस्त्यावर पडलेल्या सड्यातलं उचललंय, 
ते नीट रहावं म्हणून त्याची धडपड, 
पण हा छत्रीतूनही घुसखोरी करायला लागलाय, 
हा पाऊस ना, 
असा अवेळीच कोसळायला लागलाय .. 

कुठल्याश्या शेडखाली थांबलेलं असताना
ती चेहऱ्यावरचे थेंब टिपताना, 
केसांतला पाऊस पाडताना, 
भिजलेली ओढणी लपेटून घेताना, 
डोळ्यांतील काजळाच्या रेषेवरला थेंब पुसताना, 
तो तिला एकटक पाहू लागलाय, 
हा पाऊस ना, 
अगदी योग्य वेळीच कोसळायला लागलाय ..


Monday, 18 June 2018

रात्र

रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल...

ती हल्ली मध्येच दचकून जागी होते,
झोपेत बडबडत असते असंबंध,
दरदरून घाम फुटतो तिला कधीतरी,
पुन्हा कानठळ्या बसतील की काय ?
रक्ताचे पाट पुन्हा वाहतील की काय ?
२६ / ११ पुन्हा उजाडेल काय ?
रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल...

विजांचा कडकडाट तिचा थरकाप उडवतो,
ढगांचा गडगडाट तिचा ठोका चुकवतो,
पुन्हा तो गर्जना करेल काय ?
पावसाचा पूर पुन्हा येईल काय ?
२६ जुलै पुन्हा कोसळेल काय ?
रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल...

रिकामी बस बघून तिला भीती वाटते,
निर्जन रस्ता आला की तिची धडधड वाढते,
पुन्हा 'ती'च्यावर अत्याचार होतील काय ?
'ती'च्या किंकाळ्यांनी कानाचे पडदे फाटतील काय ?
'निर्भया'वर पुन्हा बलात्कार होतील काय ?
रात्रीलाही स्वप्नं पडू लागलीत आजकाल...

अशीच स्वप्नं पडू लागली,
अशाच कित्येक रात्री, रात्र जागू लागली,
चिखल,
गाळ,
माणुसकीच्या कचऱ्याची दुर्गंधी सगळीकडे,
अब्रू रस्त्यावर विकायला ठेवलेली,
वासना नग्न होऊन फिरत असलेली,
विचारांनी कधीच आत्महत्या केलेली,
अन् डोळे,
कधीच अंध झालेले...

रात्र,
बिथरलेली,
घुसमटलेली..
रात्र,
अशांत,
घाबरलेली..
रात्र,
अस्वस्थ,
एकाकी,
रात्र,
करपटलेली... 

रफ वही