Posts

Showing posts from October 23, 2016

घडी..

तिने कूस बदलत चादरीची प्रत्येक घडी चाचपडून पाहिली, एकच आशा मनात, त्याच्या धुंद सुवासाची. काही घड्यांत सापडले तिला उन्मादाच्या कड्यावरले उसासे, काहींमध्ये निव्वळ स्पर्शाची अस्पष्ट रेषा. एका घडीत सापडला लटक्या रागाचा कंगोरा, दुसरीत त्याच्या चुंबनांची प्रेमभेट. एकघडी फारच चुरगळलेली होती, तिच्यात होती वासना, उत्कट स्पर्शाच्या धाग्यांची वीण, विस्कटलेले काही हुंकार, आणि कुस्करल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्या. चादरीच्या कोपऱ्याशी तिला सापडली एक गाठ, रागात एकदा त्यानेच, " मला अजिबात हात लावू नकोस" म्हणत बांधलेली, हलकेच सोडवली तिने, त्यात मग सापडला तिला त्याच्या हसण्याचा आवाज. असंच शोधत शोधत सगळ्या रात्री एकत्र केल्या तिने, प्रेम, उत्कटता, आणि धडपड त्यांच्या स्पर्शांची. तिचं लाजणं, हुंदक्यात लपेटून हसणं, सुखाचे परमोच्च क्षण उपभोगणं तिला नव्याने सापडत गेलं, आणि उमगत गेलं त्याचं वाढलेलं प्रेम !