रफ वही

        १३ - १४ जून, मे महिन्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून उजाडताच दादर गर्दीने तुडुंब भरलेलं असायचं. दप्तरं, वह्या-पुस्तकं, कव्हरं, युनिफॉर्म, पाण्याच्या बाटल्या, डब्ब्याच्या बॅगा हे सगळं घेण्यासाठी पालक आणि मुलांची गर्दीच गर्दी. 
          त्यावेळी मुलांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घेतल्या जायच्या, काहींना त्यांच्या आवडीच्या वस्तू मिळायच्या नाहीत, पण कसंही का होईना सगळ्या वस्तू घेऊन घरी जायचं, आणि मग सुरू व्हायची खरी उत्सुकता. वस्तू कधी काढल्या जातायत, कधी एकदा शेजारच्या मित्रमैत्रिणींना दाखवल्या जातायत, वह्या पुस्तकांना कव्हरं घातली जातायत आणि कधी एकदा दप्तर भरलं जातंय. मी मुद्दामहून वह्यांना चॉकलेटी तर पुस्तकांना पारदर्शक कव्हरं घालायचे, कारण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर छान छान चित्रं असायची. तेव्हा स्टेशनरीसाठी कॅमलिन, नवनीत हे फेमस ब्रँड्स होते, कॅमलिनच्या पानं, फुलं, देखावे असणाऱ्या वह्या मिळायच्या, आणि त्यांना कव्हर घालणं अगदी जीवावर यायचं, पण नियम ते नियम, घालावं लागायचं. लहान असताना आई आणि नंतर स्वतःची स्वतः ही कव्हरं घातली जायची, मग त्यांना लेबल लावायचं, घरातल्या सगळ्यात सुंदर हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीकडून नाव लिहून घ्यायचं. माझ्या वह्यापुस्तकांवर माझा बाबा हे नाव लिहून द्यायचा. 
           सगळ्यात कठीण काम असायचं प्लॅस्टिक कव्हर घालणं, ते घालताना अक्षरशः तारांबळ उडायची. कारण तो रोल असायचा, कात्रीने कापला की कसाही फाटायचा. मात्र थोडं मोठं झाल्यावर हे कसब जमायला लागलं. तर मग हे सगळं झालं की दप्तर भरायचं, वह्या-पुस्तकं प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची, रेनकोट ठेवायचा, आणि मग शाळेसाठी तयार. वर्ग ठरलेला असेल तर मित्रमैत्रिणींना भेटायची नाहीतर बाई कोण, आधीच्या वर्गातले कोणते मित्रमैत्रिणी या वर्गातही आहेत या सगळ्याची उत्सुकता. आणि या सगळ्यानंतर शाळा सुरू व्हायची. रेनकोट एक साईझ मोठा असायचा कारण त्यात तुम्ही आणि तुमचं दप्तर हे दोघंही मावणं महत्त्वाचं असायचं. आणि बऱ्याचदा हाच रोनकोट दोन तीन वर्षं वापरला जाईल हा पालकांचा छुपा हेतूही असायचा. शाळेत बस किंवा ट्रेन आणि अगदीच नाही झालं तर स्कूलबसने जावं लागायचं. शाळेचा युनिफॉर्म, त्यात बूट, तेही कॅन्व्हसचे, कारण पावसात बूट सॉक्स दोन्ही खराब व्हायचे. 
         आत्ताच्या मुलांना ही मज्जा किती प्रमाणात मिळत असेल काय माहीत! त्यांच्यापैकी बरेच जण गाड्यांनी शाळेत जातात, बऱ्यापैकी प्रत्येकाकडे शाळेतही फोन असतो. 'आमच्या काळी असं होतं' हे खूपच टिपिकल वाक्य आहे पण खरंच ते म्हणावंसं वाटतं कारण खरंच गोष्टी तेवढ्या बदलल्यात. आमच्या शाळेत फोन करणं अगदी दूरवर राहिलं, अगदीच अडचण असेल तर बाई किंवा शिपाई बाई फोन करायच्या. आता रेनकोटच्या जागी बरीच मुलं छत्र्यांमध्ये दिसतात, आडव्या दप्तरांची जागा सॅकने घेतलीये, आधी दप्तरांचे वेगळे 'ब्रँड' असतात याची आम्हा बापुड्यांना कल्पनाच नसायची आणि आत्ताची मुलं शाळेत असतानापासूनच पुमा, आदिदास, वाईल्डक्राफ्ट असल्या बॅग्ज घेऊन शाळेत जातात. त्यात त्या सॅकलाही रेनकव्हर असतं. पाण्याच्या बाटल्या आता गळ्यात घातल्या जात नाहीत. मी आठवी - दहावीत असतानाच 'ब्राऊन कलरच्या' वह्या मिळायला लागल्या, जेणेकरून कव्हर घालण्याची झंझट नाही, आतातर मुलं बायजूज आणि इ-लर्निंगमधून सगळं शिकतात. 'टीचर' ची खिल्ली उडवली जाते. काळ बदलला आणि मुलंही... 
          शाळेत असताना निबंधलेखनात विषय असायचा 'माझी शाळा' , ज्यावर मी कधीच लिहिलं नाही कारण मी नेहमीच निसर्गाशी संबंधित कोणतातरी विषय निवडायचे. पण आता ८-५ जॉब सुरू झाल्यावर, शनिवार-रविवार सुट्टी मिळायला लागल्यावर, कितीही मिस केलं तरी पुन्हा शाळेत जाता न येण्याच्या वयात आल्यावर त्यावर लिहावंसं वाटलं. प्रत्येक आठवणी सुंदर असतात, प्रत्येकाच्या मनात त्याची जागा वेगवेगळी असते. बऱ्याच जणांसाठी शाळेच्या आठवणी विशेष असतात. माझ्यासाठी म्हटलं तर शाळा ही शाळा होती, तिची जागा ना कॉलेज घेऊ शकलं ना युनिव्हर्सिटी. मस्त सकाळी उठून ट्रेनने, तेही फर्स्ट क्लासमधून जायचं (त्यावेळी शाळेतल्या मुलांना कोणी काही बोलत नव्हतं), दादरला उतरून ७ गल्ल्या चालायचं, 'राजा शिवाजी विद्यासंकुल' असं थाटात मिरवणाऱ्या बोर्डच्या गेटमधून आत शिरायचं, भांडार (स्टेशनरी मिळणारं दुकान) बघायचं, मग सुरू होणारं शाळेचं अवाढव्य मोठ्ठं मैदान बघायचं, मैदानाच्या कडांनी शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यापर्यंत वाढलेली झाडं बघायची, शाळेच्या पहिल्या पायरीला नमस्कार करायचा आणि मग पहिलं पाऊल टाकायचं. 
          कितीही जावंसं वाटलं तरी परत त्या वयात जाणं शक्य नाही. पण शरारतमधल्या जियासारखं 'श्रींग भिंग सर्वलिंग भूत भविष्य वर्तमान बदलिंग' असा पऱ्यांचा मंत्र म्हणून जर एक गोष्ट बदलता आली असती तर मला नक्कीच पुन्हा लहान व्हायला आवडेल, शाळेच्या बाकावर बसून बाहेर कोसळणारा पाऊस बघायला आवडेल. आयुष्याला अत्तराच्या कुपीची आणि शाळेला मोरपीस वगैरे बऱ्याच उपमा दिल्या जातात. पण माझ्यासाठी शाळा म्हणजे ती एक रफ वही आहे ज्यात विषयांच्या याद्या, प्रत्येक विषयाला किती पाणी वह्या, शिक्षकांची नावं, वेळापत्रक, पाचवीपासून आत्तापर्यंत माझी बेस्टफ्रेंड असलेल्या मॅड जुईलीने 'जाने तू या जाने ना' पिक्चरची गाणी असं सगळंच लिहिलेलं आहे. ती रफ वही रोज लागली नाही तरी नेहमी दप्तरात असायची, ज्याच्यात फुल्लीगोळा, चित्रं असं बरंच काही असायचं. 
          शाळेची सगळीच वह्या-पुस्तकं देऊन टाकलेली असली तरी अजूनही जांभळ्या रंगाची फुलं असलेली ती रफ वही माझ्या पुस्तकांच्या खणात आणि मनात जपून ठेवलेली आहे. कधीही जावं आणि मनातल्या मनात ती उघडून एवढ्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर हात फिरवून तो अनुभवावा इतकी प्रसन्न आणि ताजी!   

                                          

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...