पहिला दिवस...

पहिला दिवस हा सगळ्यात महत्वाचा,
मग तो शाळेचा असो,
प्रेमाचा असो,
लग्नानंतरचा असो,
कुठलाही असो त्याची उत्सुकता ही सारखीच असते...
पण शाळेचा पहिला दिवस काही औरच असतो,
या दिवशी काहीजण शाळेत जायचं नसतं म्हणून रडतात,
मात्र नंतर, शाळेत पुन्हा जाणं शक्य नाही या भावनेने आपण सगळेच रडतो..
तर अशाच या  पहिल्या दिवसाचे हे दोन अनुभव....


पहिला दिवस,
शाळेची चढलेली पहिली पायरी..

आत्तापर्यंत होती गुंफण,
पण अचानक सुटलेला आईचा हात,
सगळ्या मुलांबरोबर मला पुढे पाठवण्याची बाईंची गडबड,
आणि आईची मात्र अश्रू लपवण्याची धडपड...

भांबावलेल्या चेहऱ्याने पाहिलेला वर्ग,
रडवेल्या छोट्या पऱ्यांचा तो जणू स्वर्ग.
प्रत्येकाची आईला पाहण्याची तळमळ,
डोळ्यांमधून मात्र अश्रूंची पळापळ..

स्पीकरवर लागलेली प्रार्थना,
गुरूंना केलेली वंदना,
न कळणारे शब्द,
पण बाईंना कळलेल्या भावना...

कविता म्हणण्याचा त्यांचा प्रयत्न,
अजूनही काहींच्या डोळ्यात आसवांची रत्न,
हळूहळू थांबलेलं रडू,
शेपटीवाल्या प्राण्यांनी आणलेलं हसू,
इवलासा युनिफॉर्म,
केसांची दोन नारळाची झाडं,
नाजूकसे बूट,
युनिफॉर्मच्या कोपऱ्यात लावलेला रुमाल,
एक वेडं, गोंडस ध्यान...

हातात धरलेले एकमेकांचे हात,
रिंगणाची मज्जा, कवितेच्या सान्निध्यात..
हळूच दप्तरातून बाहेर आलेले डबे,
एकमेकांचा खाऊ खाताना आलेली धमाल...

घंटा मग शाळा सुटल्याची,
घाई आईपर्यंत पोचण्याची,
मात्र त्याआधी पार करावी लागणारी लांबच लांब रांग...
हळूहळू गेटमधून बाहेर पडून,
तिला शोधण्याचे प्रयत्न,
ती दिसताच क्षणी
गालावर पडलेलं खळीचं चांदणं...

धावत जाऊन तिला मारलेली गच्च मिठी,
आणि शाळेतल्या पहिल्या दिवसाचा पाढा माझ्या ओठी....

- शाळेतला पहिला दिवस अनुभवलेल्या मुलीची कविता




तुला कोणत्या शाळेत घालावं यावर बाबाचं आणि माझं खूप बोलणं झालं,
लांबची शाळा मला नको होती,
आणि बाबाला चांगली शाळा हवी होती,
शेवटी मी जिंकले आणि तुला जवळच्या चांगल्या शाळेत घातलं...

आत्तापर्यंत सगळीकडे माझा पदर धरून चालायचीस,
रांगायला लागलीस की माझ्याकडे पाहून हसायचीस,
खूप पडून झडून झालं,
हाताला, पायाला बरंच लागलं,
कळवळून तू रडलीस की वाईट मला वाटायचं,
तुझ्या काचेच्या डोळ्यात पाहिलं,
की माझे डोळे भरायचे..
बाबा ना मग मला समजवायचा,
" तिचं तिला मोठं होऊ देत !" म्हणायचा..

अशीच मोठी होत तू चालायला पाहिलं पाउल टाकलंस,
बाबा समोर होता,
तरी त्याच्या आडून तू मला पाहिलंस,
माझा ऊर भरून आला,
पण त्याचवेळी तुझा पाय अडखळला,
मग म्हटलं नाही रडायचं,
कारण माझ्या डोळ्यात पाणी आलं की तुझं पाउल अडखळायचं,
जणू मुक्यानेच तू मला 'रडू नकोस' सांगायचीस..

म्हणून मग हसत हसत तुझं वाढणं पाहिलं,
आणि आज तू मोठी झालीस,
माझं बाळ शाळेत जाण्याएवढं मोठ्ठं झालं,
तुझा छोटासा युनिफॉर्म,
इवलसं दप्तर,
सस्याएवढे नाजूक पाय,
आणि त्या पायांसाठी हे मोठ्ठे बूट...
फार छान वाटलीस शाळेच्या त्या कपड्यात तू...

तुझा शाळेत जायचा दिवस उजाडला,
बाबाचं काम होतं ना, म्हणून तो नाही आला..
तुझ्या इवल्याश्या बोटाने तू माझं बोट धरलं होतस,
मी प्रेमाने तुझ्याकडे पाहत चालत राहिले..
शाळा आली,
गर्दीही झाली,
मुलांना रडताना पाहून तुझा चेहरा उतरला,
पण माझ्याकडे पाहिलंस आणि तू पुन्हा हसलीस,
तेच बदामी हसू,
पांढरे दात,
मध्येच असलेल्या छोट्या खिडक्या,
लालचुटुक ओठ,
आणि नाजूक खळी...
असं वाटलं माझ्या सोन्याला माझीच नजर लागेल..

शिपाईकाका मग घाई करू लागले,
मी तुझी पप्पी घेतली आणि बोट अलगद सोडवलं,
तू भांबावलीस,
थोडी घाबरलीस,
तुझ्या डोळ्यात एक थेंब दिसला,
मी तरीही हसत होते कारण तू रडू नयेस,
पण तरी तू रडलीस,
मागे वळून पाहता पाहता रडलीस,
तुझ्या इवल्याश्या डोळ्यात मला भीती दिसली,
मला तुला सांगायचं होतं की मी आहे, बाळा मी आहे,
पण सांगता येत नव्हतं...

तुझं नाक टोमँटोएवढं लाल झालं,
डोळ्यांच्या कडा लाल झाल्या,
गालांचा रंग बदलला,
आणि तू वळून पाहणं थांबवलंस,
कारण तू आत शिरली होतीस...

पण इथे माझा धीर मात्र सुटला,
माझ्या परीला मी एकटं सोडणं शक्य नव्हतं,
मात्र मला मोठ्यांसारखं वागायला हवं होतं.
मी कशीतरी घरी आले, तर नेमका बाबा घरी होता..
त्याच्या कुशीत शिरून मी नाक लाल होईस्तोवर रडले,
त्याला लगेच कळलं,
नंतर पूर ओसरला आणि मी शांत झाले,
तू काय करत असशील,
रडू थांबलं असेल का?
हा विचार करूनही थकले,
आणि चक्क दोन तास संपले,
मी मात्र त्याआधीच शाळेपाशी आले होते,
बाबालाही सांगितलं चल म्हणून,
पण तुला माहितीये तो काय म्हणाला,
" मला माझ्या दोन पऱ्यांना हसत घरी आलेलं पहायचं"

थोडा वेळ वाट पहिली मी,
मग अचानक मुलांची रांग दिसली,
माझी नजर तुला शोधत होती,
आणि मला तू दिसलीस,
आनंद हाच होता की तुझी हसरी नजर मलाच शोधत होती...

तू हसत होतीस,
तेच हसू,
बदामी हसू,
माझ्या आणि बाबासारखं, पण तरीही काहीसं वेगळं,
बदामी हसू...
तू धावत आलीस माझ्या मिठीत,
घरी जाईस्तोवर मग शाळेचा सगळा अहवाल दिलास,
मी ऐकलं कमी,
पण तुझे बोलके डोळे,
चेहऱ्यावरचा आनंद,
तो मनभरून पाहिला...

बघता बघता घर आलं,
हसत हसत आपण घरी आलो,
बाबाने दार उघडलं,
तू आनंदाने त्याच्या मिठीत शिरलीस...
आणि बाबा हळूच मला म्हणाला,
" आल्या माझ्या दोन्ही पऱ्या हसत घरी !"

- पहिल्यांदाच शाळेत गेलेल्या मुलीच्या आईची कविता...


 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...