भाषा आणि तिचं (निराशाजनक) भविष्य?


          आत्ता अगदी थोड्याच वेळापूर्वी मी भाषा आणि त्याचं भविष्य या विषयावर एक संदेश (मेसेज) पाठवला होता, त्याच विषयावर थोडं सविस्तर बोलण्यासाठी ही आजची पोस्ट.त्याआधी विषय नक्की काय आहे हे थोडक्यात : भाषा, त्याचं भविष्य आणि विशेषतः मराठी. "मिळणं" आणि "भेटणं" या क्रियापदांमध्ये होणारी गफलत.

तर, जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तेव्हा त्यातले शब्द, त्यांचा अर्थ आणि ते शब्द जिथे वापरले जातात त्यांचे संदर्भ हे सगळं शिकत असतो. बऱ्याचदा असं होतं की ह्या सगळ्यांची सांगड ही त्या त्या भाषिकानुसार बदलते. म्हणजे असं की, मराठी ही फक्त एकच नाहीये तर ती बऱ्याच छोटया छोटया अनेक मराठींची बनलेली आहे. मग ती पुण्याकडची मराठी असो, विदर्भातली असो किंवा खानदेशातली ह्या प्रत्येक प्रांतानुसार भाषा बदलते, जिला भाषाविज्ञानात Variation म्हणतात.  आता तुम्ही वास्तविकता डोळ्यासमोर ठेवा आणि बघा की गोष्टी कशा आणि कुठे बदलतात. प्रत्येक शहरात आणि गावात भागाभागांप्रमाणे भाषा बदलते, ह्या वाडीत एखाद्या शब्दाचा अर्थ क्ष असतो तर लगेच पुढच्या वाडीत त्याच शब्दाचा अर्थ य होतो.  ते म्हणतात ना " भारतात बारा कोसांवर भाषा बदलते" ते ह्याचसाठी.

भाषा बदलते म्हणजे काय होत असावं ? भाषा जेव्हा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असतात, म्हणजे मराठी आणि हिंदी किंवा इंग्रजी. अशा भाषांत शब्दसंचय (Vocabulary), त्यांचे अर्थ (Semantics ) ह्यांत फरक असतो तर एकाच भाषेच्या दुसऱ्या बोलीत ह्यापैकी एकात फरक असू शकतो. अर्थ हा घटक फार महत्वाचा ठरतो कारण जेव्हा एखादा माणूस  म्हणतो "मला पेन भेटलं " तेव्हा त्या भाषिकाच्या 'भेटलं' ह्या शब्दाच्या अर्थात सजीव आणि निर्जीव असा भेद असेलच असं नाही. जसं आपण म्हणतो की सजीव वस्तू भेटते आणि निर्जीव वस्तू मिळते " पेन मिळतं " आणि "माणूस भेटतो " हा फरक त्या माणसाच्या अर्थाच्या परिघात नसेल त्यामुळे तो हा फरक न समजून गल्लत करत असेल.

हे झालं भाषावैज्ञानिक दृष्टीकोनातून या दोन क्रियापदांच्या गैरवापराचं कारण, पण बऱ्याचदा हा फरक माहित असूनही बरेच भाषिक ही गफलत करत असतात, त्यामुळे होतं काय की आपण जी प्रमाण मराठी समजली जाते ( आम्हा भाषाविज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाण आणि अप्रमाण असं काही नसतं, प्रत्येक भाषेला तिचा तिचा एक दर्जा असतो आणि तिचं तिचं एक सौंदर्य असतं) तर त्या प्रमाण समजल्या जाणाऱ्या, थोडक्यात सांगायचं झालं पुस्तकात  वापरल्या जाणाऱ्या भाषेचं सौंदर्य मलीन होतं, आणि जर हीच भाषा तुम्ही घरीही वापरत असाल तर तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य त्यामुळे धोक्यात येतं.  भाषाविज्ञानात दोन गट दिसतात एक ज्यांना भाषा तिच्या वापराने ठरते असं वाटतं आणि दुसरे ज्यांना वाटतं की प्रत्येक भाषेचे काही नियम असतात आणि ते नियम पाळले गेलेच पाहिजेत. मला ह्या दोन्ही गटांची मते पटतात पण काही गोष्टी ह्या थोड्या त्रासदायक असतात आणि त्या तशाच राहिल्या तर केवळ मनस्ताप होतो.

हे झालं मराठीबाबत , पण मुळात प्रश्न अजूनही फार गंभीर आहेत, बऱ्याचदा मूल घरी जी भाषा बोलतं आणि शाळेत जी भाषा बोलतं ती वेगळी असते, मग शाळेतली भाषा अगदी परकी वाटते, शाळेत काय शिकवतात हे कळत नाही आणि शाळा सोडून मूल घरी बसतं .( या मुलांची संख्या जवळपासच्या वर्षांत बरीच वाढलीये ) प्रत्येक मुलाची मातृभाषा ही शाळेतली भाषा असावी यासाठीही शासन प्रयत्नात आहे. २००१ च्या जनगणनेनुसार भारतात १२२ मुख्य आणि १५९९ इतर भाषा आहेत, अर्थात यातही फरक असतोच. या इतक्या भाषा आणि त्यांचं भविष्य खूप कठीण गोष्टी आहेत. ज्या भाषा अजूनही कायद्यात किंवा शिक्षणात येऊ शकल्या नाहीयेत त्यांचं तर सगळं आयुष्यच अंधारात आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहितही नसतात.

त्यामुळे कुठलीही भाषा वापरताना ती काळजीपूर्वक वापरा, बहुभाषिक म्हणून ओळख असलेल्या भारतात आज बऱ्याच भाषा मरताहेत, केवळ एका भाषेच्या वर्चस्वाच्या ओझ्याखाली या भाषा गुदमरतायत. त्यांनाही श्वास घेऊ द्यात, म्हणून आपली मातृभाषा जपा, तिलाही गरज आहे तुमची.. 

Comments

  1. तुझा मुद्दा मला कळतोय, आपला अनेकदा ह्या विषयावर बोलणही झालं आहे. मला असं वाटतं की तुझे काही मुद्दे परस्परविरोधी आहेत. काही मुद्दे मला खटकले. प्रमाण बोला, मातृभाषा जपा, बहुभाषिक व्हा, की भाषेचा तुझा खोल अभ्यास आहे म्हणून तू त्यातील बदलांशी संवेदनशीलतेने जुळवून घेतेयस, हे मला नेमकं कळलेलं नाहीये. सविस्तर इथे बोलता येणं शक्य नाही. चर्चा नक्कीच करू.

    ReplyDelete
    Replies
    1. हो नताली चर्चा आपण नक्कीच करू, तू म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा आपण बोललो आहोत पण तरी काही गोष्टी इथेच सांगते. माझा अभ्यास आहे म्हणून मी नक्कीच जुळवून घेत नाहीये, प्रमाण बोलणं हे Pragmatics मध्ये शिकल्याप्रमाणे context वर ठरेल. मातृभाषा जपली नाही तर भाषा जगणार नाहीत आणि त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होईल. सविस्तर चर्चा भेटल्यावर होईलच :-)

      Delete
  2. "प्रमाण बोलणं हे Pragmatics मध्ये शिकल्याप्रमाणे context वर ठरेल." म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की?

    ReplyDelete
  3. context ह्याची व्याख्या मुळात संदर्भ इथवर नाही संपत. किंवा फक्त आजूबाजूचं वातावरण, म्हणजे तुम्ही गावात आहात एखाद्या किंवा शहरात इथवर मर्यादित नाहीये.

    ReplyDelete
  4. त्याची कल्पना मला आहे नताली, context वर ठरेल म्हणजे linguistic context वर ठरेल कारण जर एखाद्या शाळेत विशेषतः शहरातल्या शाळेत बऱ्याचदा ज्या पद्धतीने मराठी वापरली जाते ती गावातल्या मराठीपेक्षा वेगळी असते आणि context च्या व्याख्येचा वापर जरी भौगोलिक चौकटी किंवा वातावरण ह्यांपुरता मर्यादित नसला तरी linguistic context ह्या सगळ्या गोष्टींनुसार नक्कीच बदलेल नाही का?

    ReplyDelete
  5. त्याची कल्पना मला आहे नताली, context वर ठरेल म्हणजे linguistic context वर ठरेल कारण जर एखाद्या शाळेत विशेषतः शहरातल्या शाळेत बऱ्याचदा ज्या पद्धतीने मराठी वापरली जाते ती गावातल्या मराठीपेक्षा वेगळी असते आणि context च्या व्याख्येचा वापर जरी भौगोलिक चौकटी किंवा वातावरण ह्यांपुरता मर्यादित नसला तरी linguistic context ह्या सगळ्या गोष्टींनुसार नक्कीच बदलेल नाही का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..