मोहिनी ..

प्रेमात पडलंय तुझं हृदय ?
मनात फक्त तीच आहे ?
मग एक कर,
उधळून टाक आयुष्य,
चौफेर दौडू देत तुझ्या प्रेमाचे वारू,
मस्त स्वार हो आनंदाच्या लाटेवर..

सोबत तिलाही घे,
प्रेमात पडलंय तिचंही हृदय ?
मग तर रंगून जा एकमेकांच्या मिठीत,
आणि पसरू देत तुमच्या शरीराचे सुवास,
तुझ्या मनात,
तिच्या डोळ्यांत...

प्रत्येक उसासा,
क्षिणलेला प्रत्येक उच्छवास,
तिच्या मानेवर तू दिलेला हलकासा चुंबनझरा,
आणि त्याच क्षणी तिच्या नजरेतली लाली,
गालावर चढलेला लाजेचा रंग,
सगळं टिपून घे तुझ्या डोळ्यांत....

तिचं नाजूक नाक,
राग आल्यावर हळूच थोडं मोठं होणारं.
तुला न आवडणारे तिचे डोळे,
खोल तरीही शांत.
तिचं झऱ्यासारखं निखळ हसू,
तुझ्या डोळ्यांत दिसतंय तुझं प्रेम..

तिचा राग समजून घे,
त्याची सुंदरशी फुलमाळ बनव,
तिच्याच केसांत माळ.
नभागत भासणाऱ्या तिच्या कपाळावर हलकेच तुझे ओठ टेकव.
सुरेखशी लाजेल मग ती
भुईकडे पाहत,
प्रेमात पडलास ना ह्याच लाजण्यावर?
त्याच झुकलेल्या नजरेवर,
तिच्या थरथरणाऱ्या पापण्यांवर,
वेड लावलंय ना तिने?

आणि मग "मोहिनी" हलकेच नाव घे तिचं,
बघ, अगदी खुश होईल बापडी..
प्रेमात आहेस ना?
असंच खुलवत रहा ते प्रेम,
आणि झुलत रहा आनंदाच्या हिंदोळ्यावर,
हातात मात्र तिचा हात असू देत,
कायमचा !



Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...