भीती..

मला भीती वाटते रे,
रात्र झाली की काळोखाचे राक्षस,
अंधाराच्या सावल्या
मला खायला उठतात.
घर रिकामं असतं माझं,
अगदी मोकळं.

मग वाटतं खुर्च्या चालतायत,
भांडी एकमेकांशी भांडतायत
आणि खिडक्या आदळतायत गजांवर.

मी दडून बसते मग,
चादरीच्या आत,
तितकचं समाधान आधाराचं !

आज तू येशील?
बरं वाटतं मला तू असलास की,
येशील ?
तू असलास की बळ येतं मला दहा हत्तींचं,
मी जणू शिवरायांचा मावळा होते तेव्हा,
तू पण खुश होतोस मग,
म्हणतोस,
माझं पिल्लू किती ते निडर !

पण,
पण,
ऐक ना,
पिल्लू घाबरतं रे,
खूप घाबरतं,
सावल्यांच्या खेळाला,
भासांच्या अंधाराला.

पिपहोलमधून बघितलं की डोळा दिसतो,
एकच,
पण तो प्रेमाने बघत असतो माझ्याकडे,
मग कळतं डोळा तुझाच आहे,
"माझी पिल्लू, दार उघड माऊ" म्हणणारा.

मी दार उघडते,
तू आत येतोस,
दार धाड्कन बंद होतं,
मी त्या आवाजाला घाबरून तुला घट्ट मिठी मारते,
"तू आजची रात्र थांब, जायचं नाही कुठे!"
मी तुला सक्त ताकीद देते.

तू गायला लागतोस,
" आज जानेकी जिद ना करो"
ते शब्द गात असतात फरीदा खानुम,
पण ते असतात माझ्याच मनातले.

तू राहतोस ती रात्र घरी,
मी तुला मिठी मारून धपकन बेडवर अंग टाकते,
पण मनात प्रश्न,
आता उद्या रात्रीचं काय ?

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...