पधारो म्हारे देस (भाग १)

असं म्हणतात की, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री नसते, एखाद्या गोष्टीबद्दल काय करायचं हे कळत नसतं तेव्हा प्रवास करावा. प्रवास करून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही पण आपल्या सुखदायक राहणीमानातून बाहेर पडून परक्या ठिकाणी, अनोळखी लोकांसोबत प्रवास केल्यावर आपण या प्रचंड विश्वातली अगदी मुंगीइतकी जागा व्यापतो हे आपलं आपल्याला कळतं. नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला सगळ्या पद्धतीने जागरूक असावं लागतं, वेळप्रसंगानुसार निर्णय घ्यावे लागतात. या सगळ्या प्रक्रियांमधून जाऊन जेव्हा आपण एखादं नवीन शहर, नवीन ठिकाण बघतो ती भावनाच वेगळी असते. प्रवास आपल्याला बदलून टाकतो, नक्की काय हे सांगता नाही, असं काहीतरी असतं जे बदलून जातं, आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव होते.
मला इतिहास हा विषय, पुरातन लिप्या, राजवाडे आणि हवेल्या, म्हणजे इतिहासाशी संबंधित सगळ्याच गोष्टी आवडतात, त्यांचं मला एक वेगळंच अप्रूप आहे. गेली कित्येक वर्षं मला राजस्थानला जायची इच्छा होती, एकदातर अगदी प्लॅन ठरता ठरता रद्द झाला. अखेर यावर्षी योग आला आणि मी माझ्या जिवलग मैत्रिणीसोबत निघाले. आम्हा दोघींची ९ रात्री १० दिवसांची एकत्र असलेली ही पहिलीच सहल होती, हा अख्खा प्रवासभर आम्ही दोघीच असणार होतो आणि अगदी ट्रेन, बस, हॉटेल तसेच फिरायची ठिकाणं हे सगळं आमचं आम्हीच ठरवलं होतं. आम्हाला आमच्या वेळेनुसार, आवडेल त्या ठिकाणी थांबून, ती जागा अनुभवायची होती त्यामुळे आम्हीच सगळं ठरवलं. या दिवसांमध्ये आम्ही उदयपुर-चित्तोडगढ-जयपूर-अजमेर-पुष्कर-जोधपुर या शहरांमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो.  
“राजस्थान” म्हणजे “रंगीलो राजस्थान” आणि असं का म्हटलं जातं हे तिथे गेल्यावर कळतं. राजस्थानमध्ये रंगच रंग आहेत, मग ते तिथल्या घरांमध्ये, तिथल्या पुरुषांच्या पगड्यांमध्ये, स्त्रियांच्या पोशाखांमध्ये असोत किंवा तिथल्या हवेल्यांच्या आकर्षक रंगसंगती, दरवाजे, खिडक्या आणि कमानींमध्ये असोत, राजस्थान खरंच रंगांनी भरलेलं आहे. “पधारो म्हारे देस” म्हणणारं राजस्थान आपल्याला तितकंच सामावूनही घेतं, ते परकं वाटत नाही, दोघीच मुली फिरत असल्याने एक नक्की सांगावंसं वाटतंय की, राजस्थान आम्हाला सुरक्षितही वाटलं, आम्ही फिरत होतो पण कधीच कुठलाही त्रास झाला नाही. 


उदयपूरमधला सिटी पॅलेस, सज्जनगड, सहेलियों की बारी, बागोर कि हवेली, फतेह सागर लेक ही सगळी ठिकाणं मस्त आहेत, मला प्रचंड आवडली ती बागोर कि हवेली. छोटीशी असली तरी सुंदर वाटते, बाकी सगळं पर्यटनाच्या दृष्टीने मॉडर्न वाटलं तरी ही आपलीशी वाटते. 



जयपूरमधला आमेर फोर्ट, हवा महल, जल महल, गैटोर कि छत्रियां, पत्रिका गेट, सिटी पॅलेस, पन्ना मीना का कुंड, अल्बर्ट हॉल म्युझियम हे सगळं छान आहे. गैटोर कि छत्रियां म्हणजे समाधीस्थळ आहे पण तेही इतकं आकर्षक आहे की अक्षरशः वेड लागायची पाळी येते. 


अजमेरचा दर्गा शरीफ, ढाई दिन का झोपडा, पुष्करचा पुष्कर लेकही उत्तम. 


जोधपुरमधला मेहरनगड फोर्ट हा विलक्षण आहे, प्रचंड मोठा आणि सुंदर. इथला जसवंत थाडाही अगदी उत्तम आहे. या प्रत्येक ठिकाणी गेल्यावर कुठे जाऊ आणि कुठे नको होत होतं. सगळ्या हवेल्या आणि गड हे अगदी उत्तम राखलेले आहेत. स्थापत्य, रंगसंगती आणि कमानीवरची कलाकुसर, नक्षीकाम, हवा महलसारख्या ठिकाणी असलेल्या रंगीबेरंगी काचांच्या ३६५ खिडक्या आणि दरवाजे, दरवाजाच्या कुंड्या सगळं इतकं बारीक काम आहे की अगदी थक्क व्हायला होतं. ज्या राजाने हवा महल बांधला तो कृष्णभक्त असल्याने त्याने बांधलेला हवा महलचा वरचा भाग कृष्णाच्या मुकुटासारखा भासतो, ही एवढी आवड असणं आणि जोपासणं कौतुकास्पद आहे. 

तिथल्याच काही रिक्षाचालक आणि दुकानदारांनी म्हटलं की, राजस्थानने इतर राजांची हाजी हाजी केली म्हणून त्यांना इतक्या गोष्टी टिकवता आणि जपता आल्या, चित्तोडगढसारखा प्रतिकार केला असता तर काही खरं नव्हतं. यातलं खरं खोटं त्यांना माहीत, पण हो वर नमूद केलेल्यांमध्ये चित्तोडगढ मुद्दाम लिहिलं नाहीये, कारण मला राजस्थानमधलं सगळ्यात आवडलेलं शहर म्हणजे चित्तोड. आमच्या रिक्षाचालकाने आम्हाला तिथला इतिहास सांगताना कितीतरी वेळा हे सांगितलं की, “मॅडम आप लकी हो, चित्तोडगढ़ देखना सबके नसीब में नही होता, यहाँ आनेके लिये अलग से एक दिन निकालना पडता है |” आणि खरंच तिथे जाण्यासाठी वेगळ्याने एक दिवस काढावा लागतो. सगळ्यांनाच एवढा वेळ नसतो पण मी आणि माझी मैत्रीण हा एक दिवस काढायला तयार होतो कारण आम्हाला दोघींनाही चित्तोडला जायचंच होतं. त्याने आम्हाला अजून एक म्हणही सांगितली की, “गढो़ में गढ़ चित्तौडगढ़ बाकी सब गढय्या” ज्याचा अर्थ मी लावला की, गड तर खूप आहेत पण चित्तोडसारखा गड नाही.

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...