पधारो म्हारे देस (भाग २)
चित्तोडगढ ६९१.९ एकरवर (सौज. विकिपीडिया) पसरलेला भव्य गड आहे.
रिक्षाने जाताना प्रत्येक दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही सगळ्यात पहिले गेलो
ते राणा कुंभ पॅलेसमध्ये, तो जेवढा विस्तीर्ण आहे त्यावरून त्या काळाची आपण फक्त
कल्पना करू शकतो कारण तिथे केवळ पडझड झालेल्या, आगीमुळे काळसर डाग पडलेल्या भिंती
आहेत. पण या पडझडीतही इतकं सौंदर्य आहे की, त्या काळी हा गड काय असेल आणि किती
सुंदर असेल याची मला कल्पनाही करवत नव्हती. फक्त एका राणीच्या हव्यासापोटी कोणालाही
एवढ्या सुंदर गडावर हल्ला करून त्या सगळ्या किल्ल्याची नासधूस करून आग लावावीशी
कशी वाटली असेल ? पण असो, तिथे एक वेगळाच रिक्तपणा होता, अप्रतिम फ्रेम्स होत्या.
एका बाजूला मीरा पॅलेस होता जिथून थेट मीरेचं मंदीर दिसतं. हळूहळू आम्ही अशा एका
ठिकाणी आलो जिथे खाली भुयारात जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या. आमच्या रिक्षाचालक /
गाईडला विचारलं तर म्हणाला इथूनच राणी पद्मिनी आणि तिच्या दास्या जौहारसाठी (सती
जाणं) गेल्या होत्या, ऐकल्याक्षणी अंगावर सरर्कन काटा आला. आम्ही खाली जाऊन पहायचं
ठरवलं, कशीतरी हिंमत करत मी चार पायऱ्या उतरले, खाली पूर्ण काळोख होता आणि भुयार
पुरातत्व विभागाने बंद केलेलं होतं. त्या ठिकाणी मला शब्दात सांगता न येण्यासारखं काहीतरी
वाटत होतं. “पद्मावत” सिनेमामुळे आपल्याला फक्त १३०३ मधला राणी पद्मिनीचा एकच
जौहार माहीत आहे पण त्यानंतर १५२७ साली राणी कर्णावतीने जौहार केला होता आणि
त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच १५६८ साली जवळपास ८००० दास्यांनी गुलामगिरी
पत्करण्यापेक्षा जौहार करणे रास्त मानले.
मग तिथून आम्ही विजय स्तंभ, कीर्ती स्तंभ, मीरेचं मंदीर, श्यामकुंभ मंदीर
अशा ठिकाणी गेलो. गाईडने मीरेची गोष्टही सांगितली की, तिथल्या राजासोबत लग्न
होऊनही कृष्णभक्त असल्याने तिने तनमनधन कृष्णाला वाहून दिलं होतं, त्यामुळे ती इतर
कोणाची होऊच शकली नाही. तिने राजाला सांगितलं की मला माझा धर्म आणि प्रेम जोपासता
आलं पाहिजे आणि म्हणूनच तिच्यासाठी मंदीर बांधण्यात आलं, जे थेट तिच्या महालातून
दिसतं तेच हे “मीरेचं मंदीर”. गाईडने हेही सांगितलं की, इतर सगळीकडे कृष्णासोबत राधेची
मूर्ती असते पण हे एकमेव मंदीर असं आहे जिथे मीरा-कृष्णाची मूर्ती आहे. मी मंदिरात
जाऊन पूजा करणारी मुलगी नाही, जाते तेव्हा मी देवापेक्षा तिथली स्थापत्यकला
बघण्यात जास्त गुंग असते त्यामुळे यातली सत्यता मला पडताळून बघावीशी वाटली नाही. पण
या मीरेचं प्रेम किती अपार आहे, एखादा माणूस असावा अशी अपेक्षा नाही, त्याचं प्रेम
असायलाच हवा हा हट्ट नाही अगदी निरपेक्ष आणि निखळ प्रेम. हे असं झोकून देऊन प्रेम
करण्यात एक वेगळाच आनंद आणि सुख असतं. ते करणाऱ्यालाच कळतं आणि अनुभवता येतं.
त्यानंतर आम्ही गेलो जौहार
स्थलकडे, जिथे प्रत्यक्ष जौहार झाला होता आणि तिथे गेल्यावर डोळ्यांत टचकन पाणी
आलं, किती तो स्वाभिमान आणि हिंमत. परपुरुषाने बघू नये, स्पर्श करू नये म्हणून
स्वतःला जाळून घेणं, माझ्या तर कल्पनेच्या पलीकडलं आहे. ही जौहारची जागा त्या
भुयारापासून बरीच लांब आहे, राणी पद्मिनीने राणा रतनसिंग हरल्याची बातमी
मिळाल्यावर गडाचे सगळे दरवाजे बंद करायला सांगितले आणि ती दास्यांना घेऊन
भुयारातून त्या ठिकाणी गेली, अल्लाउद्दिन खिलजी सगळे दरवाजे पार करत गडावर
येईपर्यंत जौहार पार पडलेला होता. म्हणजे एवढा खटाटोप कशासाठी ? असो, तर आता त्या जागी हिरवळ आहे आणि एक छोटं
हवनकुंड आहे जिथे होळीच्या वेळी राजाचे पूर्वज येऊन त्या स्त्रियांच्या
आत्म्याच्या शांतीसाठी हवन करतात. तिथेच बाजूला समाधीश्वर मंदीर आहे. तिथली सगळी
मंदीर साधी तरी सोज्वळ होती, उगाच बडेजाव नाही, सगळं निर्मळ आणि आपलंसं वाटणारं.
तिथून आम्ही गोमुख कुंडाकडे गेलो. हे कुंड पाऊस असो अथवा नसो सतत पाण्याने भरलेलं असतं. आमचा गाईड आम्हाला पुन्हा तिथे म्हणाला की तुम्ही हा गड पाहायला आलात म्हणून नशीबवान आहात हे मी म्हणतोय कारण आमच्याकडच्या एका कवींनी असं म्हटलं आहे की,
“झरने झरें,
गोमुख गिरें,
पडे़ निर्भयनाथ कि ठोर,
करोडो़ं बरस तपस्या करें,
तब पावे गढ़ चित्तौड़ |”
तिथून आम्ही गेलो राणी पद्मिनी पॅलेसला, म्हणजे थेट तिथे नाही कारण तो पाण्यात आहे आणि तिथे जायला बंदी आहे पण त्याच्या समोरच एक महाल आहे जिथे राणा प्रतापसिंगने आरशाच्या प्रतिमेतून अल्लाउद्दिन खिलजीला राणी पद्मिनीचा चेहरा दाखवला होता. त्या ठिकाणी जाऊन खरंच कळलं की, एका विशिष्ट ठिकाणीच तुम्हाला महालातल्या त्या चौथ्या पायरीवर उभी असलेली व्यक्ती दिसते, तुम्ही एक पाऊल पुढे टाकलत आणि ती व्यक्ती लगेच पळून जाऊ शकते. राणी पद्मिनीचा चेहरा जसा दाखवला गेला अगदी थेट तसंच “आज फिर जिने कि तमन्ना है” गाण्यात देव आनंद यांनी वहिदा रहमानला पाहिलं होतं.
अगदी शेवटी आम्ही गेलो ते गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी, तिथून दृष्टीक्षेपात
३ दरवाजे, खाली दूरवर पसरलेली शेती, लांबवर एक फॅक्टरी आणि जवळपास एक वस्ती दिसली.
मी उस्तुकतेने आमच्या गाईडला ते काय आहे विचारलं, त्याने सांगितलं की ती भिल्लांची
वस्ती आहे, त्या भिल्लांनी हल्दीघाटीच्या युद्धात राजाच्या बाजूनं युद्ध लढलं होतं
आणि त्यांनी शपथ घेतली होती की, राजा परत आला नाही तर आम्ही गडावर पाय ठेवणार
नाही. आज एवढी वर्षं होऊनही एकही भिल्ल गडावर पाय ठेवत नाही कारण त्या गडाने
त्यांचा राजा, राणी सगळं हिरावून घेतलं. लांबवरच्या त्या फॅक्टरीमध्ये रोजगाराचा
प्रश्न सुटावा म्हणून राजाच्या वारसदारांनी औषधी रजया बनवण्याचं काम सुरु केलं आणि
चित्तोडमधल्या सगळ्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला. परिणामी, चित्तोडमध्ये एकही
भिकारी नाही !
तर असं होतं चित्तोड आणि असं होतं राजस्थान ! सुंदर, हवंहवंसं वाटणारं आणि बघायला,
अनुभवायला १० दिवसही कमी पडतील असं राजस्थान. एवढ्या लांब जाऊनही जैसलमेर बघायचं
राहिलं, पण त्यासाठी दुसरी सहल आवश्यक आहे. सगळ्या सुंदर गोष्टी बघून डोळे थकतात,
वैभवसंपन्न किल्ले बघून मन तृप्त होतं, स्त्रियांच्या बलिदानाच्या गोष्टी ऐकून,
प्रत्यक्ष तिथे जाऊन, आपण अशा ठिकाणी उभे आहोत जिथे बऱ्याच वर्षांपूर्वी हजारो
स्त्रियांनी सतीचं वाण घेतलं होतं ही भावना एक वेगळीच पोकळी निर्माण करते. याहूनही
महत्त्वाचं म्हणजे ९ दिवस म्हणजे जवळपास १७-१८ जेवणं बाहेर जेवल्यावर घरचा, आईच्या
हातचा वरणभात परत बोलवायला लागतो.
पण काहीही असलं तरी राजस्थान बघितलं, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आले याचं
समाधान आहे मात्र मन भरलेलं नाही, मी पुन्हा एकदा राजस्थानला जाईन, जैसलमेर बघेन,
पुन्हा चित्तोडला जाईन, मला नक्कीच काहीतरी नवीन उमजेल, काही नवीन सापडेल. कारण
प्रत्येक प्रवास आपल्यासाठी, आपल्या वैचारिकतेसाठी आणि आपल्या वाढीसाठी महत्त्वाचा
असतो.
Comments
Post a Comment