दिल से दिल तक..
नमस्कार!
आजची पोस्ट थोडी खास आहे, म्हणजे माझ्यासाठी तशा सगळ्याच पोस्ट्स खास असतात
पण आजची जरा जास्त खास आहे. आज कोणताही लेख नाही किंवा कविता नाही आज थेट “दिल से”
लिखाण असणार आहे.
तर २०१५ साली याच दिवशी म्हणजे ३ जून २०१५ला मी माझी
पहिली पोस्ट शेअर केली होती, म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर आज शब्दरांजण पाच
वर्षांचं झालंय. आपलं शब्दरांजण पाच वर्षांचं झालंय. मला खरंतर काय लिहावं हे कळत
नाहीये, कारण २०१५ साली वाटलंच नव्हतं की मी एवढ्या पुढपर्यंत येऊ शकेन. आजवर
बऱ्याचदा मी हे बोललेय की, ‘लिहिणं आणि लिहीत राहणं यात फरक असतो’ आणि मला आनंद
आहे की मी लिहीत राहिलेय.
ही पोस्ट लिहिण्याआधी सहजच ब्लॉग चाळत होते, तेव्हा जाणवलं की, नाही म्हणता
म्हणता मी आजवर जवळपास ७७ पोस्ट्स लिहिल्या आहेत. या पूर्ण प्रवासात नवनवीन वाचक
सोबत येत गेले आणि शब्दरांजण बहरत गेलं. आधी एक-दोन असणारे फॉलोअर्स आज २३च्या
घरात आहेत. तुम्हाला वाचून वाटेल की, ‘त्यात काय मोठं? तेवीसच तर आहेत’ पण
माझ्यासाठी वाचकांची संख्या खूप महत्त्वाची आहे आणि हे असे असे वाचक आहेत ज्यांनी
शब्दरांजणला सबस्क्राईब केलेलं आहे म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर
लिंक मिळाली नाही तरी ह्या व्यक्तींना इमेलमधून शब्दारांजणच्या पोस्ट येत राहतील. या
सगळ्यांचे आणि या व्यतिरिक्त इन्स्टाग्रामचे, फेसबुकचे फॉलोअर्स तसेच माझ्या
पोस्ट्स वाचत असलेल्या तुम्हा सगळ्यांचे खूप आभार! शब्दरांजणचे page views देखील दहा हजारांच्या घरात आहेत, ते उत्तरोत्तर वाढत राहोत. तुमच्यामुळे
शब्दरांजण एवढ्या पुढपर्यंत आलंय.
मला आजही ते दिवस अगदी लख्खं आठवतात जेव्हा मी ब्लॉगचं नाव काय ठेवावं
ह्याचा विचार करत होते, मग ब्लॉग बऱ्यापैकी लिहिता झाल्यावर लोगो किंवा शब्दरांजणचं
चित्र काय असावं यावर डोकं खाजवत होते आणि बराच विचार करून आत्ताची background image तयार करणं, सगळं अगदी आत्ता, काल-परवा घडल्यासारखं वाटतंय. बऱ्याचदा असं
होतं की, अचानकच एखाद्या गोष्टीला सुरुवात होते आणि बघता बघता ती गोष्ट एवढी मोठी
होते की अनोळखी वाचक कुटुंबात जोडले जातात, इमेलमधून पोस्ट आवडल्याचं कळवतात
तेव्हा एक वेगळाच आनंद, एक वेगळंच समाधान मिळतं. तसं बघायला गेलं तर या पाच
वर्षांत बऱ्याच काही घटना घडल्या, एम.ए.ला असताना लिहिता येतं आणि लिहायला आवडतं म्हणून
सुरू केलेलं हे शब्दरांजण आज “खऱ्याखुऱ्या” जगात प्रवेश केल्यानंतरही सुरू आहे.
आज तुम्हाला मनातली एक गोष्ट सांगावीशी वाटते. सुरुवातीला म्हणजेच शब्दरांजण
फार नवीन असताना इतर लेखकांचे ब्लॉग्ज, कविता फेसबुकसारख्या माध्यमातून वाचायला
मिळायच्या, बऱ्यापैकी सगळ्या प्रेम किंवा विरह कविता असायच्या आणि त्याला भरमसाट likes असायचे, वाटायचं आपल्या पोस्ट्सना का नसतात इतके views किंवा likes? मग नंतर नंतर वाटायचं कदाचित माझं लिखाण तितकं connect होत नसेल, तितकंसं रुचत नसेल पण तरीही मी लिहित गेले. जे सुचेल ते लिहित
गेले. बऱ्याचदा लिहिणारी व्यक्ती ही जे लिहिते त्याचा आणि त्या व्यक्तीच्या
व्यक्तिगत आयुष्याचा थोडाफार संबंध असला तरी ते अगदी थेट संबंधित नसतं, याच
मुद्द्यावरून कित्येक वाचकांना मधल्या काळातल्या पोस्ट्स नकारात्मक वाटल्या
होत्या. तुम्हाला तसं वाटलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व पण खरंतर आजवर प्रत्येकवेळी
मी जे आणि जसं सुचलंय तेच लिहिलंय, यापुढेही लिहीत राहीन.
मध्यंतरी कामात व्यस्त झाल्याने मला बराच काळ लिहिता आलं नव्हतं,
तुमच्यापैकी बऱ्याच वाचकांनी पोस्ट्स का लिहीत नाही याविषयी चौकशीही केली होती,
तेव्हा तुम्ही आस्थेने चौकशी केलीत हे ऐकून बरं वाटलं आणि तेव्हा ठरवलं की, काहीही
झालं तरी थोडं का होईना लिहीत राहायचं. लिहिणं हे माझ्यासाठी एकप्रकारे व्यक्त
होणं आहे आणि आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर व्यक्त होत राहणं महत्त्वाचं असतं. मी
अशीच व्यक्त होत लिहित राहीन, मला माझ्या लिहिण्याचं, तुम्ही वाचल्याचं समाधान, हा
आनंद सतत मिळायला हवाय, त्यासाठी मी अजून चांगलं लिहिण्याचा सतत प्रयत्न करत राहीन,
तुम्ही वाचून तुमचा प्रतिसाद कळवालच अशी केवळ आशा नाही तर विश्वास आहे.
तुम्ही सगळेच तुमच्या तुमच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून शब्दरांजणच्या
पोस्ट्स वाचता याबद्दल मी तुमची आभारी आहे, आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्यामुळे
शब्दरांजण इथवर आलंय. मी अजून छान लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन, तुम्ही जेव्हा
आणि जसं जमेल तसं वाचा, तुम्हाला काही वेगळं वाचायचं असेल किंवा अमुकअमुक वाचायला
आवडेल असं असेल तर मला नक्की कळवा, मी तेही लिहिण्याचा प्रयत्न करेन. आजवर
दिलेल्या प्रेम आणि उत्तम प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार! आणि शेवटचं
म्हणजे Happy 5th birthday to our “शब्दरांजण”
अभिनंदन, जुईली ! बाळ पाच वर्षांचं झालं पण !? अशीच मनात असेल, ते मनापासून लिहीत राहा. खूप खूप शुभेच्छा !😊
ReplyDeleteहो बाई, कळत नकळत झालं खरं बाळ पाच वर्षांचं. नक्की लिहीत राहीन. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद! :-)
DeleteMala purna Marathi madhe lihina jamnar nahi karan tevhdi aavad nahi pan aaj vachayachi aavad nakkich nirman jhali aahe ...khup sundar lihila aahes ...ek ol vachli ki vachatach javasa vatata....५वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
ReplyDeleteधन्यवाद भार्गवी! मला आनंद आहे की तुला वाचनाची आवड निर्माण झालीये, अशीच वाचत आणि शब्दरांजणवर प्रेम करत रहा! :-)
Delete