आभाळ
आवडायचा त्याला माझा हात घट्ट धरायला,
माझ्या नखांशी खेळण्यात कोण जाणे काय आनंद मिळायचा.
माझे केस मोकळे असले की उगाचच ते कुरवाळत बसायचा,
मधेच माझे गाल ओढायचा.
"आई गंऽऽ" ओरडल्यावर हसत माझ्याकडे बघत राहायचा,
त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसायची.
श्वास कोंडून जाईल इतकी घट्ट मिठी मारायचा,
जणू काही मला स्वतःत सामावून घेण्याचा फोल प्रयत्न असायचा.
रस्त्याने चालताना हात खांद्यावर ठेवायचा,
एक आश्वासक दिलासा देऊन जायचा.
तसा तो अबोल पण स्पर्शातून आभाळ मांडून जायचा.
आधी आधी त्या आभाळातले तारे वेचताना व्हायची कसरत माझी,
कधीतरी पटकन मिळायचे, मात्र कधीतरी रात्रंदिवस शोध सुरू असायचा.
मग हळू हळू कळलं त्याचं प्रेम,
झिरपलं ते शरीरात,
खोलवर भिनलं रक्तात,
तेव्हा जाणवलं, उगाचच वेचत होते मी तारे,
त्याच्या आभाळाचा सडा तर माझ्याच दारी होता..
Wonderful
ReplyDeleteThank you!
Deleteखूप छान 👉👌
ReplyDelete