सोबत

काल आपल्या घरावरून जात होते

सहजच मोगऱ्याकडे नजर गेली

काळजी घेत नाहीस ना त्याची ?

शुष्क, कोमेजलेला होता,

त्याला सांभाळ थोडं,

झाडांनाही प्रेम लागतंच ना ..

 

घराकडे पाहिलं,

पार रया गेलेली

भितींवर रंगांच्या आकृत्या

आणि कौलांतून दिसणारं आभाळ

जरा घराकडे लक्ष दे,

प्रेमाने भिंतीवर हात फिरव,

घरालाही माया लागतेच ना ..

 

दरवाजा बंद होता

तरी आत शिरले

आपल्या खोलीत आले,

अजूनही मी लावलेलेच पडदे आहेत

बदल ते,

शुभ्र अभ्रासारखे पडदे लाव

पडद्यांनाही गोंजारावं लागतंच ना ..

 

माझी पुस्तकांची कपाटं,

ती मात्र अगदी स्वच्छ,

तुझ्या लक्षात आहे वाटतं ?

छान हात फिरवतोस ना त्यांवरून ?

“मी नसले तरी माझी पुस्तकं जप”

सांगून गेलेले तुला,

पुस्तकांनाही कुरवाळावं लागतंच ना ..

 

आपले कॉफीचे मग्ज,

माझ्या डायऱ्या,

मला आवडणारं तुझं निळं शर्ट,

माझ्या काचेच्या बांगड्या,

त्या तू वॉल हँगिंगसारख्या का लावल्यास ?

किणकिण ऐकून मी आहे असं वाटतं ?

पण आता विसर थोडं मला,

इथे येऊन झालंय आता वर्ष,

देवाघरी सगळं चांगलं असतं म्हणतात,

तुला सोडून गेल्यावर चांगलं तसं काहीच नाही  

पण जप ना स्वतःला,

अखेर माणसांना सोबत लागतेच ना ..

Comments

  1. जुईली, छानच लिहिलीयस कविता. भाववाही, तरल आहे.👌👍 अभिनंदन आणि शुभेच्छा !🙂

    ReplyDelete
  2. Khup sunder 🥀 Keep writing. All the very best 😘

    ReplyDelete
  3. Mala tuzi hi kavita khup avdli...ataprynt tuzya sarv kavitamdh hi mala prachand avadli.

    ReplyDelete
  4. खूप छान लिहितेस तू...मला वाचायला खूप आवडत..त्यात आता तू लिहिलेलं वाचायला पण खूप आवडायला लागले आहे...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

दिल से दिल तक..