तो आला....

अगदी चार दिवसांपूर्वी खिडकीच्याबाहेर पाहिलं तर डोळ्यांना दिपवेल इतकं प्रखर ऊन दिसायचं, उन्हाने वाळलेली झाडं दिसायची, तहानेने व्याकूळ झालेले पक्षी दिसायचे.
पण आज, आज काही वेगळंच चित्र होतं.

आकाशाचा रंग पालटला होता, हवेत गारवा होता आणि वा‌रयाने तर उच्छाद मांडला होता.
आधी माझ्या खिडकीतली झाडं मंद डुलत होती, जणू काही शांत अशा भावगीताचा आस्वाद घेत होती. मग पंख्याची हवाही थोडी जास्त जाणवू लागली, स्वतःच स्वतःला खेळवू लागली.
आणि अचानक माझं लक्ष खिडकीत गेलं, खिडकीतलं झाड न झाड कुंडीच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत वाकत होतं, जर मी त्यांना हलक्याश्या दोऱ्याने बांधलं नसतं तर कंबरेचं हाड मोडलेल्या बाईसारखं ते झालं असतं.
आज वारा इतका बेभान झाला होता की फक्त पाऊसच त्याला रोखू शकला असता, पण तो मात्र छळत होता सगळ्यांना, येण्याचं नावच घेत नव्हता तो वेडा..



आभाळ पुन्हा भरून आलं,
गडद काळे ढग,सुसाट वारा
आणि हळूहळू पसरत चाललेला अंधार,
अंगावर येणारा तो दाट काळोख,
खोलवर पसरत जाणारे ते ढग,
तो येण्या न येण्याच्या कात्रीत सापडलाय,
मग शेवटचा विचार करून तो आला,
त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी तो आला,

तो आला,

तो आला
वर्षभराच्या विरहाने व्याकूळ झालेल्या तिला भेटायला,
तो आला
तिला आपल्या कोमल स्पर्शाने अविश्रांत भिजवायला,
तो आला
प्रेमासाठी आसुसलेल्या तिला मिठीत घ्यायला,
तो आला
पुन्हा संवाद सुरु करायला,
तो आला
तिची प्रत्येक मागणी पूर्ण करायला,
तो आला
त्याच्या धरित्रीला उल्हासित करायला...


तो आला
आकाशातले रंग पालटायला,
तो आला
ढगांचे वेगवेगळे आकार दाखवायला,
तो आला
वाऱ्याशी बेभान स्पर्धा करायला,
तो आला
इंद्रधनुच्या प्रत्येक रंगाला खुलवायला,


तो आला
लांबसडक रस्त्यांना भिजवायला,
तो आला
कौलांना आंघोळ घालायला,
तो आला
इमारतींना चिडवायला,


तो आला
झाडाच्या प्रत्येक कोंबाला कुशीत घ्यायला,
तो आला
प्रत्येक फुलाला थेंबांनी अजून नटवायला,
तो आला
गुलाबाला हिऱ्यांचं रूप बहाल करायला,
तो आला
प्रत्येक झाडाला तरुण करायला,
तो आला
मातीच्या सुगंधाला दरवळवायला,


तो आला
काॅफीची आठवण करून द्यायला,
तो आला
'रिमझिम गिरे सावन' गुणगुणायला,
तो आला
आपला आवडता कोपरा दाखवायला,
तो आला
क्वीन्स नेकलेस अजूनच आकर्षक करायला,
तो आला
लॉंंग ड्राईव्हची भुरळ पाडायला,


तो आला
माझं मन चिंब भिजवायला,
तो आला
पुन्हा नव्या आठवणी द्यायला,
तो आला
माझ्या मनातल्या कवितेला जन्म द्यायला,
तो आला
मला पुन्हा प्रेमात पाडायला,
तो आला
माझ्या खिडकीला अजूनच सुंदर बनवायला,
तो आला
खिडकीच्या काचेवर आपल्या थेंबांनी नवनवीन नक्षी बनवायला,

हे इतकं सगळं आणि अजून बरचं काही करायला,
तो आला ,

पाऊस आला...


माझा पहिला पाऊस येऊन गेला, मी त्याला तो थांबेपर्यंत न्याहाळलं.
त्याचा चढत जाणारा वेग पाहिला,
आणि अंधारून आलेलं आभाळ बदलत पुन्हा प्रकाशमय होताना पाहिलं..
भिजायला जाणं शक्य नव्हतं, कारण पहिला पाऊस म्हणजे आजारांना निमंत्रणच...

पण पुढच्या पावसात मी मनसोक्त भिजेन,
तुम्हीही तुमचा पाऊस नक्की आनंदाने उपभोगा,
पुन्हा लहान व्हा,
'ये रे ये रे पावसा' गा,
चिमणीसारखे बागडा,
आणि प्रत्येक आठवण मनात साठवा....





Comments

  1. कविता छान आहे, एका क्षणाला असे वाटले की ही प्रेम कविता आहे :-)

    ReplyDelete
  2. Was trying to comment on this when I read this around 4-5 days ago but somehow I couldn't, some technical issue maybe. Anyway, Sagla sagla chhan. Sarvatra paoosane apli hajeri lawli ahe ani hawa hawasa paoos ata oonhalya var maat kartoy ani chhan sundar asa vatavaran saglyana detoy ani tyat tuzi hi blog post hi kharatar faar chhan ahe. Pan ek goshta khatakli ti mhanje hi - "भिजायला जाणं शक्य नव्हतं, कारण पहिला पाऊस म्हणजे आजारांना निमंत्रणच..."
    He mhanje asa zala ki akkha blog ani akkhi kavita itka itka chhan feel dete and then you just know the ending is equally apt but hya mule nemka alela feel gela... Pan he maza vayyaktik mat ahe... Pan hi line totally ignore kelyas sarvana vatnarya bhavana matra agdi hubehub utrawlya ahes. Tuza likhan khup chhan ahe :) Keep it up :)

    ReplyDelete
  3. Thank you so much Ashish 😊
    Heheheh kharatar kavita tya adhichya olit sampali hoti, ti ajarachi line ahe na to mazha experience hota, aai mala kadhich pahilya pavsaat paathvat naahi.. but yet I'll be careful next time.. Though it's your individual opinion but it matters to me.. 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...