नातं...

आईच्या गर्भात असल्यापासूनच आपल्यासमोर नात्यांची ही मोठ्ठाली रांग असते,
आई,
बाबा,
आजी,
आजोबा,
खूप सारी नाती,
बरेच नातेवाईक,
आईच्या माहेरचे,
बाबांच्या बाजूचे,
प्रचंड लोकं...

काही नाती ही रक्ताची असतात, तर काही आपण आपल्या आवडीने निवडतो..
पण हे नातं म्हणजे नेमकं काय?
म्हणजे माणूस हा समाजात राहणारा घटक आहे, असं आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकतोय, वाचतोय,
आणि समाज म्हटला की लोक आले,
लोक आले की मग आपले आणि परके किंवा अनोळखी, असा फरकही आलाच..
याचसोबत आलं नातं...

नातं सांभाळता नाही आलं तर काचेला जसा तडा जातो, तसा नात्यालाही मग तडा जातो,
कधीतरी छोट्याश्या वादाने, विनाकारण केलेल्या गैरसमजाने नात्याची काच फुटते.
जर आपण काहीही विणायला बसलो, तर कधीतरी अचानक लोकर गुंतते, आणि मग बराच प्रयत्न करून ती सोडवावी लागते..

नात्याचं पण असंच असतं,
ते कधीतरी न सुटण्याइतकं गुंततं,
तर कधी नेमका एक दोरा ओढला की गुंता सुटतो,
मात्र बऱ्याचदा असंही होतं की, नात्याचे दोर कापून आपल्याला हवे तेच नीट जपून ठेवावे लागतात..

नातं माणसा-माणसाला जोडतं आणि तोडतंसुद्धा,
एकच नातं कधी जगायला भाग पाडतं, तर कधी आयुष्यच संपवतं.
नात्याची वीण जितकी घट्ट तितकं आयुष्य बांधलेलं राहतं,
पण एक जरी दोरा उसवला, तर ह्याच आयुष्याचं लक्तर होतं.

अनेकदा नातं तुटतं,
आपली चूक नसतानाही ते तुटतं,
आपल्याला ग्राह्य धरलं जातं,
सगळे दोष आपल्यालाच दिले जातात,
आणि नातं तोडलं जातं...

खूप त्रास होतो तेव्हा,
जीव तुटतो,
काळजात
भयंकर
वेदना
होतात,
इतकं सुंदर जुळलेलं नातं क्षणात तुटतं,
दुसऱ्या सेकंदाला तुम्ही अनोळखी होता,
एक प्रकारची घृणा वाटते तुम्हाला स्वतःची,
पण हे सगळं होतंच !

मुळात होतं असं की काही नाती ही आयुष्यभर जपण्यासाठी जुळतात, तर काही आयुष्याच्या पुस्तकातलं फक्त एक प्रकरण म्हणूनच उरतात..
काही व्यक्ती फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात,
काही व्यक्ती आपल्यालाच आपली नव्याने ओळख करून देतात,
तर काही आपल्याला जगण्यावर, स्वतःवर भरभरून प्रेम करायला शिकवतात,
ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका ही ठरलेली असते,
आयुष्याच्या प्रोग्राम मध्ये आधीच कमांड्स दिलेल्या असतात, आपण फक्त त्यानुसार होणारे बदल पाहत असतो..

कधीतरी खूप आणाभाका घेतलेलं,
खूप छान असं नातंही तुटतं,
त्या दोघांना कदाचित ते टिकवता येत नसेल,
पण त्यात न चूक किंवा बरोबर असं काही नसतं,
चुकते ती वेळ आणि बदलते ती व्यक्ती.
असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं,
मग नातं तुटण्यामागेही असावं,
शेवटी नात्याच्या बागेत कोणतं झाड ठेवायचं आणि कोणतं नाही हे ठरवावंच लागतं..

आयुष्य म्हणजे जर दिवा असेल,
तर नातं ही त्यातली वात आहे,
नुसता दिवा असून चालत नाही,
आणि फक्त वात असूनही भागत नाही..
त्यामुळे ह्या दिव्यात वात असावी, मात्र त्यात समतोलही हवा,
कारण,
दिव्याची वात मोठी झाली तरी हवेने विझते,
आणि वात छोटी झाली तरी ती विझते,
ती नीट लावली गेली तरच फार काळ तेवत राहते..





फेसबुकवर शब्दरांजणच पेज आहे, नक्की लाईक करा.. :-) 

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..