आज वाटलं पाऊसंच व्हावं.....

पावसाकडे पाहता पाहता
आज वाटलं पाऊसंच व्हावं...

टप्पोरे थेंब बनून अलगद बरसावं,
झाडांच्या मुळाशी हळूच थांबावं,
नाजूक सदाफुलीवर रेलावं,
पानांवरून मोत्यांच्या माळेसारखं पडावं..

जमलेल्या सगळ्या लहानग्यांना चिंब भिजवावं,
त्या दोघांच्या प्रेमळ प्रेमाची साक्ष व्हावं,
कागदाच्या होड्यांना हलकेच ओलं करावं,
ढगांना साद घालावी,
इंद्रधनुष्याला जन्म द्यावा,
वाऱ्याशी हितगुज करावं,
आणि गारव्याशी भांडावं...

कधी श्रावणसर म्हणून बरसावं,
तर कधी वळीवाचा पाऊस म्हणून,
नाहीतर पडू की नको अशा द्विधा मनस्थितीत असावं,
कधीतरी कोणालाही जाणवणार नाही असं रिपरिप यावं,
कधी सोसाट्याचा वारा, गारांइतके थेंब घेऊन गरजावं,
मात्र कधी संध्यामग्न पुरुषासारखं शांतपणे यावं...

नवकवींना लिहिण्यासाठी शब्द द्यावे,
विरहाला कंटाळलेल्या तिला सुख द्यावं,
आणि प्रत्येकाला जपण्यासाठी एक तरी आठवण द्यावी....


Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..