ज्ञानसूर्य अस्ताला गेला, पण पुन्हा उगवण्यासाठी...

एकादशीची संध्याकाळ होती, आठ वाजले होते..
पडल्यापडल्या माझा डोळा लागलेला, उठले तर ६४ मेसेज होते, कळेना नक्की झालंय काय..
मेसेज उघडून पाहिला तर धक्काच बसला, आणि माझ्याही नकळत मी रडायला लागले,
बातमी होती,
" डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अनंतात विलीन झाले. "

डॉ. अब्दुल कलाम,
एक अजस्त्र व्यक्तिमत्व, अत्यंत हुशार पण तितकेच साधे, म्हणजे आकाशात भरारी घेत असतानाही जमिनीवर कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं इतका तो माणूस विनयशील होता.
स्वतःच्या ज्ञानाचा गर्व नाही,
पुरस्कारांचं अप्रूप नाही,
जगजाहीर असलेल्या नावाचंही काही नाही,
अगदी ऋषितुल्य माणूस,
पण प्रेम, श्वास आणि ध्यास एकंच ' भारत देश आणि त्याचा विकास '
त्यांनी लग्न केलं नाही, का ?
तर त्यांना फक्त स्वतःच्याच नाही तर भारतातल्या प्रत्येक मुलाला, ज्याला शिक्षण मिळत नाही अशा प्रत्येक मुलाला शिकवायचं होतं, किती निस्वार्थी असावं कलाम सरांनी !

एक सच्चा शिक्षक, कल्पक संशोधक, प्रेमळ माणूस आणि लोकांचा राष्ट्रपती म्हणजे कलाम सर.
भारतात असं आहे ना, की तुमची जात आणि धर्म प्रत्येक पावली पाहिला जातो, पण कलाम सर ही पहिली व्यक्ती असेल जी धर्म आणि जातीपलीकडे जाऊन लोकांना प्रेरणा देत होती..
त्यांना तर देशाच्याही सीमा बांधून ठेऊ शकल्या नाहीत, म्हणजे परदेशात शिकून , काम करून मग त्या लोकांनी तुमची दखल घेणं वेगळं आणि भारतात राहून, तिथेच शिकून, काम करून परदेशातल्या लोकांनी तुमची दखल घेणं ही अभिमानास्पद बाब आहे.
एका साध्या नावाडयाचा मुलगा, रामेश्वर सारख्या गावात वाढला, लहान वयात वडिलांचं छत्र हरवल्यावर मिळेल ते काम करून शिकला , शास्त्रज्ञ झाला आणि अशा माणसाचा फक्त भारताने  नव्हे तर संपूर्ण जगाने आदर केला तर तो खरा आदर,
आणि कलाम सरांचा तर किती आदर असावा की, त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमेरिकन सरकारने त्यांचा झेंडा अर्ध्यावर उतरवला होता, आणि हे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा होत होतं, एकाच क्षणी अतीव अभिमान आणि दुखः अशा मिश्र भावना होत्या त्या क्षणी..
असं म्हणतात की प्रत्येक माणूस ह्या जगात येताना आपलं नशीब सोबत घेऊन येतो, पण कलाम सर येताना स्वतःसोबत बऱ्याच लोकांच्या नशिबाची शिदोरी सोबत घेऊन आले होते, जो त्यांच्या ज्ञानाच्या परिघात आला तो उजळून निघाला.

राजकीय इतिहासात आजवर राष्ट्रपतीपदाच्या निवडीच्या वेळी एखाद्या उमेदवाराला सर्व पक्ष, अपक्षांचा विरोध नसणं ही गोष्ट पहिल्यांदा आणि शेवटची झाली असेल ती कलाम सर राष्ट्रपती होताना. दुसऱ्यांदा त्यांनाच राष्ट्रपतीपद दयावं अशी चर्चा ज्यांच्या बाबतीत झाली असेही ते एकमेव असतील.
त्यांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं तिथे तिथे विक्रम घडवले, मग ते शिक्षण क्षेत्र असो, संशोधन असो, राजकारण असो किंवा मग लेखन, प्रत्येक क्षेत्रात तो माणूस विक्रमाधीश होता..
पण ह्या सगळ्यांहून महत्वाचं काय आहे माहितीये?
साध्या सुध्या माणसाला लोकांनी देवत्व बहाल करणं आणि हिंदू असो वा मुसलमान, लहान असो वा थोर प्रत्येकासाठी डॉ. कलाम देव असणं.

काल जेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार आणि त्याआधीचे अंत्यदर्शन पाहत होते तेव्हा डोळे सतत भरून येत होते,
मला आयुष्यात पहिल्यांदा ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं की मी त्यांना भेटून, त्यांच्या पायाला स्पर्श करू शकले नाही,
तेच पाय जे पांढऱ्या कापडात गुंडाळले होते,
त्याच पायांवर आता नेते मंडळी फुलांचा अभिषेक करत होती..
ज्या तिरंग्यात त्यांचा निष्प्राण देह लपेटला होता, तो तिरंगासुद्धा स्वतःला धन्य समजला असेल..
तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी आपल्या लाडक्या प्रमुखाला मुसलमान बांधवांच्या हाती दिलं आणि त्या क्षणी,
ते कफन,
त्यावर टाकण्यात आलेली माती,
 फुलांची आच्छादलेली चादर,
सगळं पवित्र झालं..

डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत,
घरातला माणूस गेल्यासारखी मी रडले,
मीच काय अख्खं जग रडलं,
फरक इतकाच की काहीजण माझ्यासारखे रडले,
तर काही मनातल्या मनात..
लौकिक अर्थाने कलाम सर गेले,
अनंतात विलीन झाले,
पण ते स्वर्गात गेल्यावर तिथल्या लोकांनीही आदराने उभं राहून त्याचं स्वागत केलं असेल,
इतका छान माणूस होता तो,
स्वच्छ,
निर्मळ,
लख्ख,
अगदी झऱ्याच्या पाण्यासारखा शुद्ध...

फेसबुकवरची एक पोस्ट होती ज्यात कलाम सरांचा फोटो होता आणि लिहिलेलं  
                     " ONLY MAN WITH NO HATERS "
अगदी पटकन हे वाक्य हृदयाला भिडलं, खरंच असा एकही माणूस नसेल ज्याला कलाम सर आवडत नसतील,
कधीतरी असं होतं की माणूस वयाने मोठा असला तरी पटकन एकेरीवर येऊन त्या माणसाविषयी बोललं जातं पण कलाम सरांच्या बाबतीत हे होणं शक्यच नाही,
ते आले,
त्यांनी पाहिलं,
ते झटले,
त्यांनी जिंकलं,
पण जाताना मात्र चटका लाऊन गेले...

भावनाप्रधान,
लहान मुलांत रमणारे,
२०२० च्या प्रगत भारताचे स्वप्न पाहणारे,
'missile man' म्हणून ओळखले जाणारे,
भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सगळ्यांना पोरकं करून,
जगभराला रडवून,
एकादशीच्या पावन दिवशी गेले..
अखेरच्या श्वासापर्यंत ते काहीना काही करत होते,
आपल्यासाठी दोन तास उभं राहावं लागलं म्हणून जवानाची त्यांनी माफी मागितली,
' विंग्स ऑफ फायर ' लिहिणारे स्वतः मात्र जमिनीवरच राहिले,
उत्तम नेता होण्यासाठी प्रत्येक स्तरातल्या माणसापर्यंत पोहोचायला हवं हे गांधीजींचं वचन त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणलं,
माणूस असावा तर असा...

जरी मी म्हटलं की ज्ञानसूर्य अस्ताला गेला,
तरी सूर्य मावळतोच ह्यासाठी की पुन्हा नव्या उमेदीने उगवता येईल,
कलाम सरांचं फक्त शरीर नसेल, पण त्यांच्या कल्पनांमधून, त्यांच्या शब्दांमधून ते नेहमी जिवंत राहतील,
आणि त्यांना जिवंत ठेवणं आपलं काम आहे,
तरुणांचं काम आहे,
हीच तरुणाई जी त्या ८३ वर्षाच्या डॉ. कलमांची प्रेरणा होती..
राखेतून जसा फिनिक्स पक्षी भरारी घेतो तशी भरारी त्यांनी घेतली,
आकाशात विहरण्याची हिंमत केली,
जाताना मात्र शांतपणे गेले,
त्या वरच्या देवालाही वाटलं असेल पृथ्वीवरच्या देवाला भेटावसं म्हणून तुम्ही गेला असाल..
पण आमच्या मनात,
विचारांत,
आणि कृतींमध्ये तुम्ही नेहमी असाल कलाम सर...
तुम्हाला कोटी कोटी सलाम !  



 

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...