अबोल रात्रीतली प्रत्येक शांतता आज बोलली...

अबोल रात्रीतली प्रत्येक शांतता आज बोलली
आजवर जपलेल्या शरीरावरची जखम अखेर आज उघडी पडली,
शरीर तिचं,
मन तिचं,
पण अधिकार त्याचा,
का होतं हे असं?

तिनेही खूप विचार केला ह्यावर,
पण तोवर शरीराची बरीच चिरफाड झाली होती,
तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा लचका तुटलेला तिने पाहिला होता ,
इतरांना ते दिसलं नाही,
मात्र मनावरचे आघात तिचे तिलाच कळले,
रोज रात्री तो यायचा,
तिच्या इच्छेविरुद्ध सगळ्या गोष्टी व्हायच्या,
कपड्यांसोबत अब्रूचीही मग लक्तरं व्हायची..

आता तर जपून ठेवावं असं काही राहिलंही नव्हतं तिच्याकडे,
ज्या मिलनाची स्वप्नं तिने रंगवली होती,
त्याच स्वप्नातून वास्तवाच्या भीषण दरीत तो तिला रोज ढकलत होता,
तिथे प्रेम नव्हतं,
काळजी नव्हती,
तिच्या इच्छेचा आदर नव्हता,
होती फक्त वासना आणि तिचं स्त्रीत्व...

हा अत्याचार आता तिला सहन होत नव्हता,
नको होतं तिला ते स्त्रीत्व,
नको होते काळेभोर, लांबसडक केस,
ती नितळ कांतीची तिला कात टाकावीशी वाटली,
कंबरेचा तो घाटही तिला नकोसा झाला,
ज्यात तिचं खरं अस्तित्व असतं ते वक्षही तिला नकोसे झाले,
कारण ज्याने ह्या प्रत्येक अवयवाला फुलासारखं जपायला हवं होतं,
ज्या सुंदर शरीरावर लोकांनी कविता केल्या होत्या,
ज्या शरीराचा तिला अभिमान होता,
त्याचं शरीराला त्याने चुरगळून टाकलं होतं,
नको असलेल्या कागदासारखं....

हा हक्क कोणी दिला होता त्याला?
एका मंगळसूत्राने, जोडवी आणि कुंकवाने ?
होय,
तिचा नवरा होता तो,
आजवर प्रत्येक रात्री ह्याच मंगळसूत्राआड, नवरेपणाच्या नात्याआड तिच्यावर बलात्कार होत होता,
तिच्या नवऱ्याने केलेला बलात्कार...
सगळं घर झोपायचं आणि त्याच रात्री त्यांची खोली तिच्या अस्पष्ट हुंकारांनी भरून जायची..

आज मात्र त्याने मर्यादा ओलांडल्या,
म्हणजे त्याने मर्यादा ओलांडण्याची ती वाट पाहत होती असं नव्हतं,
पण ती बळ एकवटत होती,
ती सवय करत होती,
त्याला सोडून एकटं राहायची,
त्याने केलेला प्रत्येक घाव भरून काढण्याची...

मनात साठलेलं प्रत्येक दुखः, 
घृणा,
जखम,
आज भळाभळा वाहिली,
ज्वालामुखीचा उद्रेक झाला,
त्याचा प्रत्येक अधिकार,
त्याचं वर्चस्व तिने नाकारलं,
आणि आज इतक्या दिवसात पहिल्यांदा तिला तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव हवासा वाटू लागला...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..