तिचे डोळे..
तिचे डोळे असेच असायचे नेहमी
नदीच्या खोल डोहात बुडाल्यासारखे
इतके गूढ की इतरांना फक्त ते डोळेच लक्षात रहायचे
सतत काहीतरी शोधणारे,
चाचपडणारे,
टप्पोरे डोळे..
पण,
ते नेहमी निस्तेज असायचे,
त्या डोळ्यांना कसलाही लोभ नसायचा
कसलं आकर्षण नसायचं
कसलीही ईर्ष्या नसायची
भीती तर त्याहून नाही
तिचे डोळे नेहमी निडर असायचे
एक वेगळाच रुबाब होता त्यांत
मात्र तरीही ते निराश असायचे.
तिच्या हृदयातल्या भावना,
डोक्यातले विचार तिच्या डोळ्यापर्यंत पोहोचायचेच नाहीत
की,
तो रस्ताच बंद झाला होता?
त्यांना कसलाही शोध नव्हता
हव्यास नव्हता, की इच्छा नव्हती
ते डोळे तर दुसऱ्या डोळ्यांकडे रोखून पाहूही शकायचे नाहीत
मग डोळ्यांच्या सागरात बुडून कवीसारखं प्रेम करणं तर दूरवरच राहिलं.
लोक तर तिला हे सांगायचेदेखील नाहीत की तिचे डोळे सुंदर आहेत,
निळ्याशार पाण्यासारखे,
नितळ,
शांत,
स्तब्ध..
त्या डोळ्यांना रंग नव्हता,
रूप नव्हतं,
आणि
अस्तित्वही !
Comments
Post a Comment