भर दुपारी..

                       निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी मी एकटाच बसलो होतो. ना मला कोणाची काळजी होती, ना कोणाला माझी . माझा माझा मस्त आराम चालला होता.टळटळीत ऊन पडलं  होतं. आसपास  कोणत्याच  अस्तित्वाची  जाणीव नव्हती, सगळी जीवसृष्टी जणू रजेवर गेली होती आणि मी एकटाच बाहेर पडलो होतो भटकायला. विश्रांतीचं ठिकाण होतं निष्पर्ण  वृक्ष , भुंडं झाड. 
                         बराच वेळ मी ह्या फांदीवरुन त्या फांदीवर फिरलो, झोके घेतले छोट्याश्या डहाळीवर. नंतर मात्र भूक लागली. म्हटलं चला काहीतरी खाऊया, मग लक्षात आलं, की अरे, झाड तर भुंडं ! ना पानं येण्याची आशा ना भविष्याची ओढ. मनात आलं, काय आहे या भुंड्या झाडाचं अस्तित्व ? कशाच्याच उपयोगाचं नाही ते, ना सावलीसाठी ना अन्नासाठी आणि ना निवाऱ्यासाठी. फक्त उपयोग होईल तो सरपणाला, पण म्हणजे भविष्य चुलीत जाणार.. आणि त्यात भर म्हणजे आहे एक झाड, त्यामुळे कुठे हिंडणं नाही की फिरणं नाही. पाय मोकळे करणं, आळस देणं तर दूरवरंच राहिलं.. जिथे उगवलं तिथेच राहिलं, प्रगती नाही, स्पर्धा नाही, किती बेचव आणि व्यर्थ ते जगणं ! 
                         मी विचार करतच होतो तितक्यात माझ्या छातीत एक कळ उठली, जीवघेणी कळ. बघतो तर रक्त दिसलं, मला कळेचना की हे अचानक काय झालं ? हसण्याचा आवाज यायला लागला, पाहिलं तर झाड हसत होतं. " ते बघ चिमण्या, ते आदिवासी. बरेच दिवस भटकत होते इथे, शिजवून खायला अन्नचं नव्हतं म्हणून सरपणाला मला नेलं नाही, ह्या जंगलात उकाड्यामुळे काय खायचं हा प्रश्न असतो रोज त्यांच्या डोळ्यात. एक पक्षी दिसत नाही की प्राणी, नेमका आज तू दिसलास." मी बघतच राहिलो. " मग सांग बरं, कोणाचं आयुष्य जास्त बरं ? एकाच जागेवर वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या या भुंड्या झाडाचं? की मनात आलं की आकाशात भरारी घेणाऱ्या तुझ्यासारख्या पक्षाचं ?"
                         उत्तर द्यायला चिमणा जिवंत नव्हता.....

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..