फेसबुक..
तिने एका शहरात प्रवेश केला नाव होतं " वायफाय " आणि नावाखाली लिहिलं होतं २०७५. आश्चर्यच वाटलं तिला जरा पण बघूया पुढे म्हणत ती चालू लागली. एक बिल्डींग लागली पुढे "फेसबुक " नावाची, अचंबित होऊन ती आत शिरली पण एकही माणूस काही दिसेना..
नशिबाने एका घराचा दरवाजा उघडा दिसला, दबकत दबकत तिने हळूच जाऊन दारातून घरात पाहिलं, चार माणसं होती घरात पण प्रत्येकाच्या हातात 'iPhone', आजोबांसमोर मात्र appleचं macbook. ते मालिका बघत होते,' होणार पोस्ट मी त्या वॉलची '. एका मुलाने (मग पुन्हा तिच्याच नशिबाने) तिला पाहिलं, मात्र ती काही बोलेस्तोवर पुन्हा तो फोनमध्ये घुसला.. त्याला 'पोक' करेस्तोवर त्याने काही तिच्याकडे पाहिलं नाही. फोनमधून डोकं वर काढण्याचे कष्ट घेऊन त्याने तिला एक लुक दिला. तिने त्याला विचारलं, " अरे काय आहे हे ? प्रत्येकाकडे iPhone, मालिकेचं नाव 'होणार पोस्ट मी त्या वॉलची ' ?"
" अगं हो, नवीन असल्यासाखी काय विचारतेयस ? इथे असचं असतं. ना दिवस, ना रात्र. सगळं काम वायफायवर, पैसे नसतातच कारण ऑनलाईन बँकिंगने काम चालतं, हल्ली तर क्रेडीट कार्ड्स पण नसतात. शाळा नाही, कॉलेज नाही सगळं मुलांना आधीच माहित असतं गुगलमुळे. ऑफिस नाही कारण सतत work from home असतं. वेगळी अशी ऑफिसेस नसतातच बॉस घरीच ऑफिस सुरु करतात. आणि हो मालिकेचं म्हणशील तर, बऱ्याच वर्षापूर्वी आपण जे केलं ते सगळं फेसबुकवर अपलोड केलं जायचं, तर ह्या मालिकेत त्याच सगळ्याचा इतिहास दाखवतात आणि प्रत्येक भाग पाहून आजोबा रोज रात्री एक पोस्ट करतात फेसबुकवर . जेवण रोज KFC, McDonald's आणि faasos मधून येतं कारण चायला, मॉमला साधा वरण भात पण करता येत नाही, डॅडला येत होती चपाती बनवता पण मग कंटाळा आला त्या कच्च्या चपात्या खाऊन सगळं बोअर साला. " प्रत्येक वाक्यागणिक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. "आणि पुढे ऐक, आम्ही घरातल्या घरात पण Whatsapp वर बोलतो एकमेकांशी, प्रेम वैगरे सगळं ऑनलाईन होतं आणि लग्न झालंच तर ते Skype वर नाहीतर लिविंग रिलेशनशीपचं असतं, Instagram वर सगळ्याचेच फोटोज शेअर होतात आणि hike वर टाइमपास. " हे सगळं तर आमच्यावेळी सुद्धा व्हायचं असं ती मनातच बोलली पण हे सगळं ह्याला कसं माहीत?
" तुला कसं रे हे सगळं माहीत ?" तो फारच सहजपणे म्हणाला," गुगल अगं वेडे, तिथेच वाचलं मी तुमच्या काळाबद्दल सगळं. तुम्हाला म्हणे तुमची मॉम उठवायची झोपेतून, खरं आहे का हे Dude?" ती म्हणाली "हो खरं आहे पण आम्हाला मॉम नाही आई उठवायची" . "That's unbelievable, कल्पना पण करवत नाही मला, आम्ही तर अलार्म लाऊनच उठतो. "
सोन्या उठ गं, सकाळ झाली
" हे कोण बोलतंय मग ? " तो हसायला लागला. " ती दीची अलार्म टोन आहे, हंगामावर मिळाली तिला, मॉम बोलली पण तिला वॉव जुन्या काळाची आठवण आली हे ऐकून" आता तिला फक्त चक्कर यायची बाकी होती.
पिल्लू उठ अगं आठ वाजलेत . हे कोण बोलतंय आता ? ती आता वेडीच झाली असती. अगं बाळा उठतेस ना ? कॉलेजला जायचं ना ? दचकून ती उठली. बघितलं तर आईचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर होता तिच्या. बाथरूममध्ये जाता जाता " आई आज वरणभात तूप जेवणार गं मी, बनवून ठेव" ती ओरडली.
एरवी घरचं जेवायला कंटाळा करणारी मुलगी आज स्वतःहून वरणभात बनव म्हणतेय ऐकून आई अजूनच खुलली....
Goshtichi kalpana chhan aahe. Lihili aahe suddha chhan.
ReplyDelete