आत्महत्या....
त्या पडक्या घरात
तो एकटाच राहत होता,
दिवसभर एकाच कोपऱ्यात पडलेला
आणि रात्र कशी घालवायची ह्या विचारात असलेला.
दिवसा मग तो बऱ्याच ठिकाणी जाऊन यायचा,
बसल्या बसल्या हृदयाच्या तळाशी जायचा,
डोक्याच्या आतल्या पेशींवर झोके घ्यायचा,
नाहीतर मनाच्या खूप आत जाऊन निपचित पडायचा.
काही दिवस त्याला उत्साह वाटायचा,
उरलेले दिवस कंटाळवाणे जायचे.
त्याला वाटायचं मग की माझीही दखल घ्यायला हवी कोणीतरी,
माझंही अस्तित्व आहे या जगात,
दाखवायला हवं कोणीतरी.
मात्र बरेच दिवस झाले त्याच्याकडे कोणी लक्षचं दिलं नाही,
त्या घराच्या मालकानेसुद्धा नाही.
बाहेर पडण्याचा नाहक प्रयत्न तो रोज करायचा,
आज तरी आपण बाहेर पडू या विचारावर दिवस रेटायचा.
वैतागला होता तो त्या गंजलेल्या डोक्याला,
संतापला होता या निरर्थक आयुष्याला,
त्याचे श्वासही त्याला जड वाटायचे,
जगण्याचे प्रयत्न निष्फळ वाटायचे.
अखेर तो कंटाळला,
मनापासून थकला,
आणि आज
त्याच्या अनेक विचारांपैकी
एका विचाराने आत्महत्या केली....
Comments
Post a Comment