मी लिहायला हवं होतं..

मी फार आधीच लिहायला हवं होतं,
तुझ्या नितळ, गोऱ्या कांतीबद्दल,
तुझ्या खोल निळ्याशार डोळ्यांबद्दल,
त्यातल्या प्रत्येक सुंदर भावाबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या इवल्याश्या नाकाबद्दल,
तुझ्या नाजूक हनुवटीबद्दल,
त्यावरल्या काळ्या तीळाबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या चेहऱ्यातल्या प्रत्येक बदलाबद्दल,
तुझ्या फुलागत कोमल ओठांबद्दल,
त्यांच्या प्रत्येक चुंबनाबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या सुरेख मनगटाबद्दल,
तुझ्या मऊशार तळहाताबद्दल,
त्यावरच्या गुंतलेल्या प्रत्येक रेघेबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या नाजूक शरीरयष्टीबद्दल,
तुझ्या शरीराच्या कमनीयतेबद्दल,
त्यातल्या ओळखी, अनोळखी वाटांबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या हृदयातल्या प्रत्येक ठोक्याबद्दल,
तुझ्या ठोक्यातल्या संथ लयीबद्दल,
त्यातल्या जीवघेण्या भीतीबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं...

तुझ्या अल्लड खट्याळपणाबद्दल,
तुझ्या हट्टी स्वभावाबद्दल,
त्यातल्या अहंकाराबद्दल,
मी फार आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या स्वर्गीय मिठीबद्दल,
तुझ्या उष्ण श्वासांबद्दल,
त्यातल्या गंधाळलेल्या सुगंधाबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या उन्मादात न्हायलेल्या रात्रींबद्दल,
तुझ्या विरहाच्या दिवसांबद्दल,
त्यातल्या प्रत्येक वेदनेबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

तुझ्या तलम वस्त्रांबद्दल,
तुझ्या रात्री बदलणाऱ्या कुशींबद्दल,
त्यातल्या प्रत्येक आळोख्याबद्दल,
मी आधीच लिहायला हवं होतं..

मी आधीच लिहायला हवं होतं,
तुझ्या अविस्मरणीय शरीराबद्दल,
तुझ्या लांबसडक केसांबद्दल,
आणि,
जिथून स्त्री आणि पुरुष हा भेद सुरु झाला
त्या सुंदर गोष्टीबद्दल मी लिहायला हवं होतं,
मी फार आधीच लिहायला हवं होतं....




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..