पाऊस आला, वारा आला...



     
      नमस्कार मंडळी ! कसं काय ? बरं चाललंय ना सगळ्यांचं ? आज पोस्टसाठी वेगळंच काहीतरी लिहायचं ठरवलं होतं, पण सकाळी अचानक आलेल्या पावसाने सगळा मूडच बदलून टाकला माझा.. मग म्हटलं इतर सगळं नंतर लिहू आधी लिहायचं आजच्या सुंदर सकाळबद्दल . 


      आज सकाळी जेव्हा पाऊस कोसळत होता तेव्हा खरंतर मी गाढ झोपले होते, मैत्रिणी आल्याही होत्या उठवायला पण आपल्या मुलीला इतकं सुखी झोपलेलं पाहून आईला काय मला उठवावंस वाटलं नाही. थोडासा राग आला मला तिचा पण म्हटलं जाऊ देत त्यानिमित्ताने झोपायला मिळालं. तर मला जाग आली ब्राउनीच्या भुंकण्याने, खिडकीबाहेर पाहिलं तर मस्त पाऊस पडत होता, इतकं छान, फ्रेश वाटलं की मी ब्रशही न करता तशीच गच्चीवर पळाले. तुम्ही पावसाळ्यात कुठेही भिजायला जा, मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेस, दादर चौपाटी अगदी कुठेही पण जिथे तुम्ही लहानपणी खेळलात, वेड्यासारखे गाणी म्हणत नाचलात, ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत पावसाला साद घातलीत त्याच ठिकाणी, त्याच मित्रमैत्रिणींबरोबर पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. असं तुमचंही एखादं ठिकाण असेल ना? तुमच्या हक्काचं, जिथे तुम्ही अगदी बिनधास्तपणे धांगडधिंगा केलात तरी लोकं तुम्हाला न ओरडता तुमचं मस्ती करणं एन्जॉय करतात. मग ती बिल्डींगची गच्ची असो, एखादं मैदान असो वा घरासमोरचं अंगण, अशी एक जागा तर असतेच. माझ्यासाठी ती माझी गच्ची आहे.


      तर गच्चीवर गेले आणि पाहिलं समोरच्या बिल्डींगच्या गच्चीवर जवळजवळ सगळ्या पिढीतील माणसं पावसात भिजत होती, काही आजोबा होते, चार-पाच काकू होत्या आणि खूप लहान मुलं, ती सगळी ‘ये रे ये रे पावसा’ गात होती . ऑफिशिअल बालगीत आहे ते पावसाचं आणि इतकं सुंदर की अजून बऱ्याच पिढ्यांनी ते गात रहावं. मग अशीच सहज रस्त्यावर नजर टाकावी म्हटलं तर रस्ते शॉवर अंगावर घेत आंघोळ करताहेत असा भासच झाला मला. मुद्दाम म्हणून रस्ते कोणी स्वच्छ करतात का माहीत नाही, पण बहुतेक नाही करत, ते स्वच्छ होतात फक्त पावसाळ्यात. तसेच आज सकाळीही रस्ते चकचकीत दिसत होते, शनिवार असल्याने ऑफीसच्या लोकांची गर्दी नव्हती. छत्र्या होत्या काहींकडे तर काही छत्रीशिवाय भिजत होते कदाचित माझ्यासारखे पाऊस आला की छत्री घेऊया म्हणून थांबले असतील किंवा छत्री विसरले असतील. शेजारच्या चाळीची कौलं माझ्याकडे बघून “ बघ पारोशी मुली, आम्ही कसे स्वच्छ आहोत” म्हणत होती, तर त्याच्या आजूबाजूला असलेले काचेचे उंचचउंच टॅावर्स कौलांच्या चाळींना चिडवून म्हणत होते, “ आमच्याकडे पहा, किती पारदर्शक दिसतोय आम्ही”, या दोघांच्या द्वंद्वात मी मात्र पाऊस झेलत होते. चेहऱ्यावर, अंगावर, हातावर, पायांवर, सगळीकडे मी फक्त पाऊस झेलत होते.



पाऊस

पहिला पाऊस,                                          

ह्या वर्षीचा पहिला पाऊस.



       काय तो आनंद असतो. उत्साह, रोमांच, वेड्यासारखं बागडणं हे सगळं हा पाऊस सोबत घेऊनच येतो जणू, मग तुम्ही कितीही मोठे असा, पाऊस आला आणि तुम्ही हा वेडेपणा केला नाहीत तर पावसात भिजायची मजा येतच नाही. पाऊस आला की सगळं कसं उत्साहाने प्रफुल्लित होतं, कवींना झटाझटा कविता सुचतात, ट्रेकर्सना गडकिल्ले खुणावतात, फोटोग्राफर्सना पावसाचा प्रत्येक थेंब, त्याचा प्रत्येक खेळ टिपायचा असतो, सगळं उत्साही असतं. म्हणजे आमच्या इथे पाणीबचतीसाठी म्हणून २४ तास येणारं पाणी उन्हाळ्यात दिवसातून फक्त दोन वेळा सोडतात, पण पाऊस आला की पाण्याचा नळही उत्साहात येतो आणि दिवसभर पाण्याची बरसात करत असतो. 

       हा असा असतो पाऊस, तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल तो तुम्हाला भिजवतोच, म्हणजे माझ्यासारखे पाऊस आवडणारे लोकं स्वतःहून पावसाच्या अधीन होतात, पण खरी मजा असते ती पाऊस न आवडणाऱ्या लोकांची. कधीतरी नेमकी ते छत्री विसरतात किंवा आणली असेल तर मग पाऊस आणि हवा जणू प्लान आखून ठरवतात की आज ह्याला भिजवायचंच. हवा मग इतकी प्रचंड येते की छत्र्या उलट्या होतात आणि रडत-खडत , पावसाला शिव्या देत का होईना पण ही मंडळीसुद्धा भिजतात. असा हा पावसाळा आता सुरु झालाय, लाहीलाही करून त्वचा भाजून काढणारा उन्हाळा संपलाय. हा पावसाळा जसा सुंदर आहे तसाच सुंदर तो जगा, बाईक चालवणारे असाल तर जरा वेगाला आवर घाला, कारण बाईक स्लिप होण्याच्या बऱ्याच घटना घडत असतात पावसाळ्यात. पाणी आहे म्हणून कसंही वापरू नका, लहान मुलांना पाणीबचतीचं महत्त्व शिकवा.

       पाऊस कधीही कोणाला तहानेने व्याकूळ ठेवणार नाही, दुष्काळग्रस्त भागातही पाऊस अशीच बरसात करेल, आणि हिरव्यागार झाडांची डौलदार रोपं डुलू लागतील. पावसात भिजा, लहान होऊन भिजा, गाडी थांबवून भिजा किंवा किल्ल्यांवर जाऊन भिजा, पण भिजा मात्र नक्की !


------

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

ती...