शब्द, शब्द आणि शब्द ...



                     शब्द,
                     कसे  सुचतात शब्द ?
                     खरंतर आजवर मीही ह्यावर विचार केला नव्हता की खरंच मला कसे सुचत्तात शब्द ? ते बाहेरच्या जगात असतात ? की माझ्याच आत, मनात, खोलवर कुठेतरी दडलेले असतात ? उत्तर मी अजूनही शोधतेय, कारण होतं काय की सुचणं ही एक प्रक्रिया आहे पण ती वैज्ञानिक प्रक्रिया नाही. ती एक कला आहे आणि कलेशी निगडीत प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या चौकटीत बसवता येत नाही, जरी आलीच बसवता तरी कलासक्त माणसांना ती पटतेच असं नाही.
                     माझंही अगदी तसंच झालंय , म्हणजे एकीकडे भाषाविज्ञानात मी शब्द, भाषा, ध्वनी यांच्याशी निगडीत गोष्टी शिकले पण ते सगळंच कलेच्या कक्षेत न बसणारं आहे . इतकं तांत्रिक आणि साचेबद्ध मांडणी आहे की लिहिणाऱ्या माणसाला क्वचितच ते पटेल. तरीही शिकायला, भाषा समजून घ्यायला म्हणून भाषाविज्ञानासारखा विषय नाही .मी जेव्हा तासाला बसायचे तेव्हा तारांबळ सुरु असायची माझी, कारण सिद्धांत म्हणून समजण्यासाठी सगळं छान आहे , सगळं कळतंही , शिकवलेल्या गोष्टी तेव्हापुरत्या मला पटायच्या मात्र घरी येईस्तोवर माझ्यामधल्या लिहिणाऱ्या मनाला त्या गोष्टी पटायच्या  नाहीत. तरीही मी समतोल साधायचे , या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करायचे .
                  यशस्वी झाला का तो प्रयत्न ?
                  हो , बऱ्याच अंशी झाला .
                  भाषा म्हणजे शब्दांची जुळणी करून बनलेली एक रेघ असते, जिला ना सुरुवात असते ना शेवट, तुम्ही थांबाल तिथे ती थांबेल आणि सुरुवात कराल तिथून ती सुरु होते. पण हे शब्द म्हणजे नेमके काय आहेत? भाषावैज्ञानिक सस्युरच्या मते , प्रत्येक गोष्ट हे एक चिन्ह आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे म्हणायचं असतं त्यासाठी शब्द सापडत नाहीत. ते म्हणतात ना, काही गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत, हेच असावं ते. किंवा बऱ्याचदा असं होतं की एखाद्या भावनेसाठी किंवा गोष्टीसाठी एखाद्या भाषेत शब्द असतो तर दुसऱ्या भाषेत तो नसतो, म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्ट येऊन थांबते ती शब्दांपाशी. त्या शब्दांआधी येतात ते स्वन, स्वनिम, रूपिका , रूपिम पण ह्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत.
                   तुम्हाला माहितीये माझ्यासाठी शब्द काय आहेत ? अगदी सुरुवातीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे शब्द हे जिवंत आहेत माझ्यासाठी, त्यांच्याशी मी रोज बोलते . हा संवाद मात्र मनातल्या मनात असतो. कधीतरी एखाद्या नवीन शब्दाचो त्यात भर पडते, मग नवीन माणूस घरात आल्यावर त्याच्याशी जुळवून घ्यायला जसा आपल्याला थोडा वेळ लागतो तसाच तो मलाही लागतो. त्या शब्दाला आतून, बाहेरून समजून घ्यायला मला वेळ लागतो. एखाद्या संदर्भात तो  कसा वागेल, कसा बोलेल हे समजून घ्यावं लागतं.
                या शब्दांचं मग भांडणही होतं मनात, कोण कवितेत वापरलं जाईल  यावरून आणि मग शेवटी होतं असं की मी अस्वस्थ होते, लिहायचं बरचं , साचलंय बरचं पण ते कागदावर उतरत नाहीये . माझी अस्वस्थता मग सगळ्यांना कळते आणि मी माझ्यापुरती स्वतःला शांत करते, थोडा वेळ स्वस्थ बसते, आपोआप काही वेळाने मग शब्द सुचतात. छोटीशी सर का होईना चालते पण मळभ असलं की अस्वस्थता वाढते.
               तर या शब्दांशी बोलणं,
               त्यांच्याशी वाद घालणं,
               कधीतरी त्यांच्यावर ओरडणं,
               तर कधी अलगद प्रेमाने त्यांच्याशी खेळणं खूप महत्वाचं असतं.
               ज्याला हे जमतं तो लिहितो, पण हे खरंतर तितकं बरोबर नाही. आपण प्रत्येकजण लिहित असतो, खोटं वाटतंय ? साहजिक आहे ते. पण खरंच आपण सगळे लिहितो, दूरध्वनीवर संभाषण असो, संदेशाच्या माध्यमातून बोलणं असो आपण लिहित असतो फक्त ते सगळं कागदावर उतरत नाही. या प्रत्येक शब्दाशी निगडीत एक भावना असते तिला समजणं, तितक्याच आत्मीयतेने आणि प्रेमाने तिला सांभाळणं हेही महत्वाचं ठरतं.त्यामुळे तुम्ही लिहिता,
             जेव्हा आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही तुमची गोष्ट शोधता तेव्हा तुम्ही लिहिता,
             ज्या गोष्टीवर लिहिता येणं शक्य नाही अशा गोष्टीवर जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही लिहिता,
             आणि सुचतं कसं यावर विचार करता करताही जेव्हा तुम्ही इतर गोष्टींचा विचार करता तेव्हा तुम्ही 
             लिहिता,
             तेव्हा तुम्ही लिहिता.....      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...