"प्लीज, मला मदत कराल ?"
मी स्वतःलाच गोळा करत चाललोय,
चिंधड्या-चिंधड्यांतून,
तुकड्या-तुकड्यांतून,
आणि तळागाळातून....
आधी मी पूर्ण होतो,
दोन हात,
दोन पाय,
एक हृदय,
टकलावर चार केस,
मी पूर्ण होतो...
मध्येच रस्त्यावर एक मुलगी दिसली,
हात नसलेली.
तिला हात दिले.
एका पुरुषाला,
माझे पाय...
माझ्याही नकळत मी सगळं देत गेलो,
जीवावर उदार होऊन.
मी तर हृदयही दिलं,
एक-दोनदा नाही
तर पाच वेळा,
त्याचेही आता तुकडे झालेत,
प्रत्येकीने वेगवेगळ्या आकारात,
वेगवेगळ्या हत्याराने
ते तोडलंय..
काही भाग तर चक्क हरवलेत
कुठल्यातरी खोल डोहात,
काळ्यामिट्ट अंधारात.
कुठेही शोधून सापडेनासे झालेत
माझे अवयव..
"प्लीज, मला मदत कराल ?
एकच मदत कराल?"
"मी जशी सगळ्यांना मदत करत गेलो,
माझे अवयव देत गेलो,
तसं तुम्ही कराल?"
"शरीरात रक्तही नसलेल्या या कफल्लकाला
पूर्णत्व द्याल ?"
"मला गरज आहे हो त्या पूर्णत्वाची,
खूप गरज आहे,
प्लीज मला मदत कराल?"
"काही नाही तर फक्त माझं
पिळवटलं गेलेलं हृदय,
पिचलं गेलेलं मन,
प्लीज ते तरी एकत्र करून द्याल?
हवं तर शिवून द्या,
मला ना,
मला ना,
मला फेविकॉल पण चालेल,
पण प्लीज मला मदत कराल?"
"या थकलेल्या,
मदत करून हरलेल्या,
माझ्यासारख्या अभाग्याला मदत कराल?
प्लीज मला मदत कराल?"
Comments
Post a Comment