भास..

तो लिहायचा,
जे सुचेल,
जे पटेल,
जे रुचेल,
ते सगळं तो लिहायचा..
लेखक होता तो!
लोकांना आवडायचं त्याचं लिखाण,
काहींना कळायचं नाही.
"कसं सुचतं रे तुला ?"
"थोड्याच दिवसात पुस्तक येणार वाटतं"
इथवर लोकं बोलायचे.



मात्र तो खूष नव्हता,
त्याला भीती वाटायची,
त्याच्या कल्पनांची,
विचारांची,
त्याच्या शब्दांची,
शब्दांशी गुंफणाऱ्या ओळींची,
आणि लिखाणाची.

हो,
एका लेखकाला भीती वाटत होती,
लिहायची..


पण त्यामागे कारण होतं.
त्याने रेखाटलेल्या व्यक्तिरेखा,
शब्दबद्ध केलेली प्रत्येक व्यक्ती,
त्याला रोज रात्री भेटू लागली.
त्याच्याकडे आपल्या व्यथांच्या कथा मांडू लागली,
आणि तो बिथरू लागला.


भास कोणता आणि सत्य काय हेही त्याला कळेना,
"हे खरं नाहीये रे,
कथा-कवितांमधली पात्रं कधी खरी होतात का वेड्या ?
भ्रम आहे हा! "
तो स्वतःला समजवायचा.


रात्र झाली की खेळ सुरु व्हायचा,
व्यक्तिरेखांचा,
शब्दांचा,
संवादांचा,
अस्तित्वाचा..


याच उद्वेगात त्याने कविता लिहिली,
बरेच पुरस्कार मिळाले त्याला..


मात्र अजूनही खेळ संपला नव्हता,
आता या खेळात तोसुद्धा सामील झाला होता,
हो,
त्याला स्वतःचा भास होत होता.


घरात दोन-दोन 'तो' फिरताना दिसायचे,
रात्री अंथरुणात दोघं झोपायचे,
त्याच्या डायरीत ते दोघंही तीच कविता दोन वेळा लिहायचे.
आणि कॉफीच्या मगातली कॉफी दोघंही प्यायचे..


एका सकाळी त्यांचं वर्तमानपत्र वाचन सुरु होतं,
"अस्तित्वाचा खेळ संपला, जगप्रसिद्ध लेखकाचा अजरामर 'भास' कविता लिहून मृत्यू"
बातमीने त्या दोघांमधला खरा तो हादरला,

क्षणात उठून उभा राहिला
तडक बाथरूममध्ये गेला,
टाईल्सवर रक्ताचे शिंतोडे अजूनही ठळक होते.
बातमीतल्या फोटोत दाखवलेलं
त्याचं रक्ताने माखलेलं शरीर मात्र तिथे नव्हतं.
हरलेल्या मनाने तो हळुवार पावलं टाकत बाहेर आला,



भासातला 'तो' आणि खरा 'तो' आता समोरासमोर बसून,
'भासावर' टीका करू लागले!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...