शब्दांपलीकडचं बरंच काही !


मनातले विचार आज कागदावर उतरत नाहीयेत,
घाबरतायत ते,
खूप घाबरतायत..
आज का असं होतंय कुणास ठाऊक,
झालंच नव्हतं असं कधी,
नवीनच काहीतरी घडतंय...

का घाबरताय बाळांनो?
या ना बाहेर,
कोणी रोखणार नाही तुम्हाला,
बंधन घालणार नाही तुमच्या स्वातंत्र्याला,
मी खात्री देते,
.
.
.
विश्वास नाहीये ?
खरंच देते मी खात्री,
या बाहेर निर्धास्त...

का त्रास देताय?
मी अस्वस्थ झालेय,
बाहेर नाही पडलात तर वेडीपिशी होईन,
प्लीज या,
तुम्हाला आवडतंय ना?
हे असं वागायला?
इतर वेळी अल्लड मुली घोळक्यात येऊन,
पुढे पुढे करत मी येऊ ? मी येऊ? म्हणतात तसे असता,
कधीतरी निर्लज्जपणे येताही बाहेर,
मग आज का पाऊल अडलेल्या बाईसारखे वागताय?

अरे, माझे शब्द कसे स्वच्छंद आहेत,
मनमुराद बागडणारे,
ऐटीत मिरवणारे...

नाहीच येणार का?
काय झालंय इतकं?
या ना आता खरंच,
त्रास होतोय,
दिवस पुढे गेलेल्या गरोदर बाईसारखं वाटतंय अगदी..

का पडत नाही आहात बाहेर?

का?

ठीक आहे,
नकाच येऊत.
रहा आत घुसमटत,
मी आहे मज्जेत,
मोकळा श्वास घेतेय,
सुखाने जगतेय,
पण आज काहीतरी वेगळं घडणार,
नक्कीच घडणार,
आज बहुदा होईल मग,
शब्दांपलीकडलं बरंच काही !

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..