ब्लॅक कॉफी आणि गुलाबाचं फूल
विचारांच्या नादात आज ब्लॅक कॉफी, थोडी जास्तच ब्लॅक झाली
आधीच कडवट लागणारी ती, आज अजूनच कडवट लागली
खिडकीच्या थंड पडलेल्या कडाप्प्यावर मी हळूच जाऊन बसले
बाहेरचं विस्तीर्ण आभाळ माझ्या डोळ्यांच्या आभाळातून निरखू लागले
बाहेर बघता बघता नजर गेली गुलाबाकडे
एरवी असतं भरलेलं आज मात्र एकच फूल त्याच्याकडे
त्या फुलाचा रंगही गडदसा, फुलाच्या नाममात्र पाकळ्या राहिलेल्या
तरीही फूल आकर्षक, गंधही थोडासा मधाळलेला
त्या फुलाची एक पाकळी अलगद मातीत पडली
त्यावरून एक आठवण अचानक ताजी झाली
दिवस होते कॉलेजचे आणि होता एक कार्यक्रम
तोही होता सोबत माझ्या, होते त्यालाही निमंत्रण
स्वयंसेवक असूनही स्वागत झाले गुलाबाच्या फुलाने
त्यालाही दिले फूल त्या फुलं देणाऱ्या मुलीने
नाही आवडत तोडलेली फुलं मला
होती बहुधा ही कल्पना त्याला
तरीही घेतलं फूल दोघांनीही
जागा नव्हती पण फूल ठेवायला
"जागा नाहीये जुईली, फूल तुझ्याकडे ठेव"
म्हणाला तो काही वर्षांपूर्वी आणि मी अजूनही जपलीये ती ठेव
आजही ते फूल आहे माझ्या डायरीत
पाकळ्या सुरकुतल्या तरी माझ्यासाठी ते टवटवीत
मध्येच कधीतरी काढून ते फूल एकटक बसते मी बघत
आजही तो क्षण अगदी ताजा आहे माझ्या डोळ्यादेखत
फूल ते त्याच्यासाठी कदाचित काहीच नसावं
माझ्यासाठी मात्र त्यात प्रेमच दिसावं
त्याला कल्पनाही नसेल इतकं जपलंय मी त्याला मनात
त्याच्यासाठी केवळ प्रेम आणि प्रेम आहे माझ्या हृदयात ..
Comments
Post a Comment