आभाळ

तिचं आभाळ काहीसं वेगळं
थोडं खुलं, बरंच मोकळं

आभाळात कधीतरी येतात ढग
काळोखं, अंधारं होतं तिचं जग

पण नेहमीच दिसतो एक किरण
आशा, प्रेम की भाग्याचं कोंदण ?

असतो पाऊस बऱ्याचदा तिच्या आभाळी 
कित्येक पहिले थेंब झेललेत तिने कपाळी 

आभाळात आहे इवलुसा चंद्र
लुकलुकणारे बरेचसे तारेही 

आभाळाच्या माथ्यावर एक सूर्यही उगवतो 
तिची स्वप्नं उराशी ठेवून तो मावळतो 

तिच्या आभाळाला ना आहे सीमा 
ना आहे कोणतीही मर्यादा 

आभाळात तिच्या आहेत ग्रहांची लेणी 
त्या लेण्यांत आहेत नशिबांचे मणी

कधीतरी अंगावर येतं हेच आभाळ 
सोसत नाही तिला या वाऱ्याचा भार 

खरंच आहे हे आभाळ ? 
की आहे नुसतं जंजाळ ?

शक्य आहे या खऱ्या आभाळी 
तिच्या मनातलं आभाळ ? 

असायचं तर असू दे 
नसायचं तर नसू दे !

तिचं आभाळ आजही मोकळं
ना कुठल्या खिडक्या ना दारं

आभाळ असतं सतत रंगीत 
आयुष्यातलं जणू सुंदर संगीत 

आभाळात आहे इंद्रधनुष्य मखमाली 
तीच तिची सखी आणि तीच वाली !

आजही अविरत चालतेय ती तिच्या आभाळी 
मुक्त, मोकळी 

नेसून किरणांची साडी 
अन् चंद्राची कोर भाळी !    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...