इरफान...
“प्रिय इरफान,
आज ना सांगता येणार नाही असं काहीतरी वाटतंय.
वैयक्तिकरीत्या आपल्या ओळखीच्या नसलेल्या, आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या, आपल्या
मित्रमंडळाचा भाग नसलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू होतो. पण तरीही आपल्याच घरातला
माणूस देवाघरी गेलाय इतकं दुःख, इतका रितेपणा का येतो? करोडो चाहत्यांना आज इतका
शोक करावासा का वाटतोय? “इरफान खान” एक सिनेअभिनेता, ज्यांचं वैयक्तिक आयुष्य,
त्यांची दुःख, खंत, त्यांचे कष्ट हे सगळं आपण प्रत्यक्षात पाहिलेलं, अनुभवलेलं
नाही. तरीही ही व्यक्ती अशी निघून जाणं अक्षरशः जिव्हारी लागलंय. लिहिणारी असले
तरी मला प्रत्येक वेळी लिहावंसं वाटतंच, सुचतच असं नाही पण आज एवढं विचित्र काहीतरी
वाटतंय की, रडता रडता समोर असलेला लॅपटॉप उघडून मी सरळ लिहायला घेतलंय.
जीवन आणि मृत्यू, तसं बघायला गेलं तर जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक
दिवस जायचं असतंच. मात्र काही माणसं गेली की वाटतं याने एवढ्यात जायला नको होतं,
अजून सुंदर जगायला हवं होतं. सिनेसृष्टी ही झगमगाट, दिखावा आणि खोट्या
बातम्यांसाठी प्रसिद्ध पण याच सिनेसृष्टीत हातावर हातावर मोजता येतील असे अस्सल मोती
आहेत. हिरे कितीही आकर्षक असले तरी मोत्यांचं सौंदर्य, तेज काही वेगळंच असतं. या
मोत्यांच्या माळेतला एक मोती कायमचा पडला. “इरफान खान” हे नावच पुरेसं आहे असं
म्हणावं लागेल. वेगवेगळ्या पठडीतले सिनेमे करण्याचा हातखंडा, कॅमेऱ्यावर अधिराज्य गाजवणारी
हातोटी आणि डोळे तसेच देहबोलीतून होणारा संवाद हे सगळं या व्यक्तीचा ‘बायें हाथ का
खेल’ होता. हिरो म्हटलं की जिथे गोरेगोमटे चेहरे, सिक्स पॅक, अॅब्स, नाचता येणं,
अस्खलित इंग्रजी बोलता येणं हे सगळं डोळ्यांपुढे यायचं तिथे काळ्यासावळ्या वर्णाचे
आणि मोठ्ठाल्या डोळ्यांचे इरफान सर मात्र हृदयात एक वेगळाच कोपरा गाठून बसायचे.
केवळ सिनेमाचे क्षेत्रच नाही तर एक माणूस म्हणूनही इरफान वेगळेच होते, आज जी
जी व्यक्ती इरफानविषयी बोलली ती प्रत्येक व्यक्ती हेच म्हणत होती की, एवढी
प्रसिद्धी मिळूनही पाय जमिनीवर भक्कमपणे रोवून उभा असलेला एक सच्चा माणूस हरपला. कुठेतरी
वाचनात आलं की, इरफान सर बोलतानाही समोरच्याला सर म्हणून संबोधायचे. हे लिहिता
लिहिता सर लिहू की नुसतं इरफान हा प्रश्न पडला, सर लिहून पाहिलं, नुसतं इरफान
लिहून पाहिलं पण या माणसासाठी मनात ज्या काही भावना आहेत त्यामुळे नुसतं इरफान
लिहिल्याने त्यांचा अपमान होईल असंच वाटून शेवटी मी इरफान सर लिहिण्याचं ठरवलं पण
सुरुवातीला मनापासून तुम्हाला ‘प्रिय इरफान’च म्हणावंसं वाटलं.
तर आज इरफान सर गेल्याचं कळल्यावर धक्का बसला, मागे त्यांच्या
कर्करोगाविषयी कळल्यावर वाटलेलं की, का ? एवढ्या चांगल्या माणसांसोबतच असं का होतं
? पण याचं उत्तर ना माझ्याकडे आहे ना मला कोणी देऊ शकतं. तेव्हा तर ते नाहीत अशा
अफवाही पसरल्या होत्या, मी सतत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली का हे बघत होते.
आज ही बातमी कळल्यावर डोकं बधीर झालं. राहून राहून ते मोठ्ठे डोळे आठवत राहिले. ते
गोड हसू डोळ्यांपुढून अजूनही जात नाहीये. जिथे बघावं तिथे तुमचे फोटो,
तुमच्याविषयी लिहिलेलं दिसतंय, माहीत नाही त्या प्रत्येकाला काय वाटत असेल पण
तुम्ही गेलात. ५४ हे काही जाण्याचं वय नाही पण गेलात. हल्ली असं कोणी गेल्याचं
कळल्यावर रडू येत नाही, कोणताही अभिनेता गेल्याचं कळल्यावर मी आजवर कधीच रडले
नव्हते पण आज खूप रडले, हे लिहिता लिहिताही मनातल्या मनात मी खूप रडतेय.
मी तुमचे सगळेच सिनेमे पाहिलेत असं नाही मात्र लाईफ इन मेट्रो, द लंचबॉक्स,
पिकू, हिंदी मिडीयम, हैदर, तलवार, ज्युरासिक पार्क या सिनेमात तुमच्या भूमिका
डोक्यात अगदी पक्क्या बसल्या आहेत. तुमची सिस्का एलइडीची जाहिरात, हल्लीच्या
मिम्समध्ये असलेले ‘हे नको, हे जास्त चांगलं’ दाखवणारे तुमचे दोन फोटोज, आता ती
फ्रेमही रिकामीच. तुम्ही आजारी असतानाही ‘अंग्रेजी मिडीयम’ हा सिनेमा केलात जो
बघण्यासाठी मी हॉटस्टारची मेंबरशिपदेखील घेतली पण कामामुळे तो पाहता आला नाही. आज
तो खूप बघावासा वाटतोय, पण आज मी तो बघणार नाही, कारण मला खात्री आहे मी खूप रडेन
आणि जाणाऱ्याला रडता रडता निरोप द्यायचा नसतो.
कितीही दुःख झालं, विश्वास बसत नसला तरी तुम्ही हे जग सोडून गेलात, कलेला
वाहून घेतलेला माणूस कुठेही गेला तरी शांत बसणार नाही. जिथे कुठे असाल तिथेही
तुमच्या भाबड्या स्वभावाने आणि मधाळ हास्याने तुमचे चाहते बनवालच, तिथेही
तुमचा सुंदर अभिनय दाखवत रहा. तुमचं शरीर गेलं पण आमच्या मनात तुम्ही जिवंत आहात
ही चावून चावून चोथा झालेली ओळ मी लिहिणार नाही पण इतकंच सांगेन की, तुमच्या
प्रत्येक भूमिकेत तुम्ही नेहमी जिवंत असाल, कदाचित यापुढे तुमचा सिनेमा बघताना डोळ्यात
पाणी येईल, अंगावर काटा येईल सुन्न वाटेल ‘पर आपके तो गाली पर भी ताली पडती थी और
पडती रहेगी |’
“दरिया भी मैं, दरख्त भी मैं,
झेलम भी मैं, चिनार भी मैं,
दैर भी हूँ, हराम भी हूँ,
शै भी हूँ, सुन्नी भी हूँ,
मैं हूँ पंडित
मैं था, मैं हूँ और
मैं रहूंगा |”
- करोडो चाहत्यांमधील तुमची एक चाहती
माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे हा. त्यांचं जाणं खूप वेदनादायी आहे...😭😭😭
ReplyDeleteहो... :-(
Delete