थम जा जिंदगी



आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं
रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं !

मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या या सुंदर ओळी. आयुष्याबद्दलची एक संपूर्ण कविता. पण आयुष्य ? आयुष्य म्हणजे ? तुमच्या दृष्टीने आयुष्य म्हणजे काय ? खूप कष्ट, खूप आराम की नुसतं आला दिवस काढणं ? नाही, आयुष्य म्हणजे आलेला प्रत्येक क्षण रसरसून जगणं, ना कालचा विचार ना उद्याची चिंता, आयुष्य म्हणजे “आज” जगणं, उद्या काय घडणार, आपण कसे असू हे काहीच माहीत नसतं कारण उद्या कोणीच पाहिलेला नसतो.

मुंबईकरांना २२ मार्चला कर्फ्यू लागला आणि २४ मार्चपासून असंच काहीसं घडलं, २१ दिवसांसाठी आपलं आयुष्य जणू थांबून गेलं. २१ दिवस घराबाहेर पडता येणार नाही कारण मुंबई लॉकडाऊन करण्यात आली. ती मुंबई जी कितीही रात्र असली तरी झोपत नाही, ती मुंबई जी सगळ्यांना सामावून घेते, ती मुंबई जिची लाईफलाईन असलेली ट्रेन पावसाळ्यातच बंद होते ती मुंबई थांबली. नोकरवर्गाला वर्क फ्रॉम होम मिळालं, विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच सुट्ट्या मिळाल्या, काहींचे आलेले पाहुणे एकवीस दिवस अडकून पडले तर काहींना हवा असलेला एकांत मिळाला. आता तर लॉकडाऊन अजून वाढला, परिस्थिती सुधारली नाही तर तो याहूनही अधिक वाढू शकेल, कल्पना नाही.

तर या लॉकडाऊनच्या सुरुवातीला बऱ्याच जणांना खूप त्रास झाला, कारण घरी थांबायची सवय नाही, आरामाची सवय नाही, घरच्यांसोबत वेळ कसा घालवायचा कळत नाही अशी एक ना अनेक कारणं झाली. पण घरी थांबणं भाग आहे, मग काय करायचं ? मग आळसावलेल्या दिवसांत अचानकच छंदांनी मान वर काढली, बरीच वर्ष धूळ खात पडलेल्या गिटारच्या स्ट्रिंग्ज वाजू लागल्या, वाचेन वेळ मिळाला की म्हणून ठेवलेल्या पुस्तकांच्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात आल्या. सुचायला शांत वेळच नाही म्हणून पडून असलेली डायरी बाहेर आली, सुकत आलेली शाई पुन्हा नाचू लागली. घरातल्या एवढ्या माणसांपैकी  केवळ गृहिणीचा चेहरा बघून कंटाळलेल्या स्वयंपाकघराला “कुकिंग” करण्यासाठी आलेले वेगवेगळे चेहरे दिसू लागले. कामाच्या नादात झाडांना पाणीही घालायला वेळ नसणारे पुरूष आज आपली पानांची छाटणी करतायत बघून झाडं अजूनच टवटवीत झाली आणि घरांमध्ये पुन्हा रामायण, महाभारताची गाणी वाजू लागली.

कित्येक वेळेला आपण फक्त घड्याळाच्या मागे धावत असतो, मुंबईला तर थांबणं माहितीच नाही. रोज भला मोठा प्रवास करून ऑफिसला पोहचा तसाच परतीचा प्रवास करून परत या, मग जेवण करणं, आवराआवरी करणं यात रात्र कधी होते कळतंच नाही. पण तुम्हाला माहितीये थांबणं, विश्रांती घेणं किती महत्त्वाचं असतं ? आणि विश्रांती म्हणजे “हॉलिडेज” नव्हे, आपल्या स्वतःसोबत, आपल्या माणसांसोबत वेळ घालावणं यातून आपण खरे रिफ्रेश होतो. आप की कसम सिनेमातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं सुंदर गाणं आहे,
“ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जातें हैं जो मकाम
वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते |”
खरंच आयुष्यात घडलेल्या गोष्टी, निसटून गेलेला क्षण पुन्हा येत नाही. मग ते शाळेत तासाला बसणं असो, कॉलेजमध्ये मस्ती करणं असो, तुमच्या बाळाने टाकलेली पहिली पावलं असोत किंवा तुमच्या जिवलगाच्या घट्ट मिठीतली ती “अजून दोनच मिनिटं” करत झालेली पाच मिनिटं असोत. काहीच परत येत नाही.

          Girl in the city” नावाची एक सुंदर वेबसिरीज होती जिच्यात एक गाणं होतं, “थम जा जिंदगी लंबी दौड है, थक जाएगी तू अब मंझिल दूर है |” किती सुंदर लिहिलंय ! आयुष्यालाच थांबायला सांगितलंय, कारण मोठा पल्ला गाठायचा आहे. हा पल्ला गाठण्यासाठी थांबणं मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. जगता जगता आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चालत असतो, आपली मित्रमंडळी, आपल्या कुटुंबातील सदस्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आयुष्य. बऱ्याचदा आपण गृहीत धरून चालतो की, अमुकअमुक व्यक्ती असेलच तिला उद्या भेटू, हे काम उद्या करू, आज वेळ नाहीये मला उद्या वाचेन. आज हेच सगळे “उद्या” आपल्यापुढे उभे राहिले असतील. उद्या उद्या म्हणून किती गोष्टी बाकी होत्या, बऱ्याच गोष्टींची वेळही निघून गेली असेल. सगळ्या गोष्टींना “एक्सपायरी डेट” असते, आपल्यालाही आहेच, वेळ आली की बोलावणं आलं की जावंच लागतं ना ?

मग नको गृहीत धरूया गोष्टी, आजचं सगळं आजच करूया. आज भेटावंसं वाटतंय तिला, आजच भेटून घ्या, मुलासोबत खेळावंसं वाटतंय खेळा, नवऱ्यासोबत गच्चीवर मस्त कॉफी प्यावीशी वाटतेय ? पिऊन घ्या. छानश्या गाण्यावर नाचावंसं वाटतंय तेही करून घ्या, कारण Tomorrow never comes.” जे जे करावंसं वाटतंय ते सगळं आपण आज करूया, घरी थांबून सुरक्षित आहोत हे समजूया, आजवर न पाहिलेल्या गोष्टी पाहूया. मग ते कळीचं फुलणं असो किंवा झाडांचं डुलणं सगळ्या गोष्टींविषयी कृतज्ञ राहूया. एवढ्या सुंदर आयुष्याबद्दल, मिळालेल्या चांगल्या माणसांबद्दल आणि या छानश्या निसर्गाबद्दल, सगळ्याबद्दल कृतज्ञ राहूया ! आलेला प्रत्येक क्षण आनंदाने, प्रेमाने जगूया आणि हसतखेळत आनंदी राहूया. कारण, Be present, it is the only moment that matters!”

Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..