शब्दरूपी उरावे!
आज सकाळी रत्नाकर मतकरींच्या निधनाची बातमी पाहिल्यावर मी
सुन्न झाले, दोनेक सेकंदानी आईला दाखवलं, तिलाही धक्का बसला. काही वेळ मी तशीच
बसून होते, तिला म्हटलं, “खूप वाईट वाटतंय गं आई मला” ती म्हणाली, “हो जुई पण
आयुष्य आहे, आलेला माणूस जाणारच!” ‘आलेला माणूस जाणारच’ हलकीशी पुटपुटले, मनाला
मात्र या सगळ्या practical गोष्टी पटत नसतात. कशीबशी आंघोळ
आटपली, परत रडू आलंच. लगेच येऊन लिहायला बसले. खूप दुःख झालं की कधीतरी काय लिहावं
हे कळत नाही मात्र आज माझ्याकडे लिहिण्यासारखं इतकं होतं की, रडता रडताही माझं
डोकं सगळ्या आठवणी गोळा करून काय लिहायचं याच्या नोंदी बनवत होतं. खरंतर रत्नाकर
मतकरी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं, त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा,
पटकथा, गूढकथा, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा बऱ्याच साहित्य प्रकारांमध्ये लेखन
केलं. ते साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रकारही होते. त्यांना
बरेच पुरस्कारही मिळाले होते, ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’ हे आईचं आणि माझं आव्द्त्म
गाणं असलेल्या ‘माझं घर माझा संसार’ चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट पटकथेसाठी
दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला होता.
आईकडे स्वतःची अशी काही पुस्तकंही
होती, ती ग्रंथालयातूनही निरनिराळी पुस्तकं, कथासंग्रह, कादंबऱ्या आणायची त्यामुळे
मी लहानपणापासूनच वाचायला लागले. तिचं वाचून झालं की मीही ते पुस्तक वाचून
काढायचे. मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत होते. एकदा आईने एक गूढकथासंग्रह
आणला. लेखक : रत्नाकर मतकरी, मुखपृष्ठावर काहीसं गूढ चित्र होतं. मी नेहमीप्रमाणे हेही
पुस्तकं वाचलं आणि नकळतच मला गूढकथांची गोडी लागली. दहावी झाल्यानंतर मी एक एक
करून मतकरी सरांचे सगळे गूढकथासंग्रह विकत घ्यायला सुरुवात केली, आज माझ्याकडे
त्यांचे जवळपास सगळे गूढकथासंग्रह आहेत. या कथासंग्रहांची अक्षरशः पारायणं करून
झालेली आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात येत असेल की, ‘हिने एवढ्या
वेगवेगळ्या पठडीतलं लेखन करणाऱ्या लेखकाच्या केवळ भयकथा वाचल्यात?’ तर हो, मला
कदाचित त्यांची हीच लेखनशैली इतकी भावली की इतर काही वाचन झालंच नाही. मात्र आता
त्यांचं इतर लेखनही वाचेन. गूढकथा, भयकथा आवडत असल्याने मी नारायण धारपांचीही बरीच
पुस्तकं वाचली आहेत पण रत्नाकर मतकरी ते रत्नाकर मतकरीच!
मला गोष्टी तशा पटकन विसरायला होतात
पण मतकरींचे कथासंग्रह वाचताना जी एक वेगळीच धुंद चढायची ती मला आजही आठवते.
दुपारी किंवा रात्री मी पुस्तक वाचायला सुरुवात करायचे, मग ते संपेपर्यत खाली
ठेवलं जायचं नाही, प्रत्येक शब्द वाचताना मनात त्याचं चित्र तयार व्हायचं आणि मी
नकळतच त्यांच्या कथांमध्ये पोहोचायचे. असं वाटायचं की, लिहिलेलं सगळं माझ्यासमोर
घडतंय आणि मी ते एका कोपऱ्यातून बघतेय. कथा वाचता वाचता माझ्या अंगावर काटा येत
राहायचा, एक वेगळीच भीती वाटायची तरीही मी वाचत राहायचे. प्रत्येक कथा वाचल्यावर डोळे
मिटून सगळ्या घटना-प्रसंग आठवून मग दुसऱ्या कथेला सुरुवात व्हायची. मी अक्षरशः
झपाटून गेल्यासारखी मतकरींची पुस्तकं वाचत होते आणि त्यात इतकी गुंतून जात होते
की, रात्री मला अशीच गूढ, भुताखेताची, एका वेगळ्याच शक्तीची स्वप्नं पडायची, पण ते
दिवस मात्र अगदी मंतरलेले होते. महाविद्यालयात असताना मी आणि आई त्यांच्या कोणत्या
गूढकथा कोणत्या संग्रहातल्या आहेत याविषयी बोलत होतो, तिची स्मरणशक्ती खूप चांगली
आहे पण पहिल्यांदा असं झालं असेल की, कोणत्या कथा कोणत्या संग्रहात आहेत
त्याचबरोबर मुख्य पात्र कोणतं, कथा काय हेही मला सांगता येत होतं.
मी महाविद्यालयात असताना माझ्या
पथ्यावर पडणारी एक गोष्ट घडली, २०१४ मध्ये माझ्या म्हणजेच रुपारेल
महाविद्यालयाच्या वाड्मय मंडळातर्फे ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक आदरणीय रत्नाकर
मतकरी सरांच्या ‘रसगंध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित
करण्यात आला होता, मतकरी सर या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते, या प्रकाशनासोबतच त्यांच्या
‘रंगरूप’ आणि ‘रसगंध’ या पुस्तकांची विक्री होणार होती. माझी एक वर्गमैत्रीण याच
कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका घेऊन मतकरी सरांच्या घरी गेली होती, आमच्या बाईंनी
तिला थोड्याफार सूचना देऊन तयार करून पाठवलं. ती आल्यावर तिला काय विचारू आणि काय
नको असं झालं होतं. मात्र “त्यांचं घर कसं आहे गं?” हा एकच प्रश्न विचारू शकले. “चांगलं
आहे आणि जिथे बघावं तिथे नुसती पुस्तकं आहेत” हे तिचं उत्तर ऐकून मी त्यांच्या
घराचं चित्र मनात रंगवत राहिले. छान पांढऱ्या रंगाच्या भिंती असतील, पुस्तकांची कपाटं
ओसंडून वाहून जात असतील आणि पुस्तकांच्या चळती मांडून ठेवलेल्या असतील. घर मात्र आपुलकीने
भरलेलं असेल. राहूनराहून वाटत राहिलं की, मला त्यांच्याकडे जाता आलं असतं तर मी भरून
पावले असते. माझ्या दोन मित्रांना रत्नाकर मतकरींची रांगोळी काढायला सांगितली होती
आणि मी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांच्यासोबत थांबले होते.
मला कार्यक्रमात सर काय बोलले किंवा तो
कसा झाला हे फारसं आठवत नाही कारण मी भारावलेल्या अवस्थेत तो बघत होते पण ते दिसायला
अगदी रुबाबदार होते आणि अतिशय प्रेमाने बोलत होते एवढं मात्र मला आठवतंय. कार्यक्रम
संपल्यावर मी त्यांची पुस्तकं विकत घेतली, माझ्या मित्रालाही घ्यायला लावली. जाऊ की
नको विचार करत, घाबरत घाबरत शेवटी मी त्यांच्यासमोर गेले, त्यांच्याशी काही बोलू
शकले की नाही हे मला आठवत नाही पण एवढं नक्की आठवतंय की, त्या पुस्तकावर मी
त्यांची स्वाक्षरी घेतली. आजवर मी दोनच खूप मोठ्या आणि माझ्या आवडीच्या व्यक्तींना
भेटलेय, चौथी-पाचवीत असताना शिवाजी पार्कमधल्या उद्यान गणेश मंदिरात सचिन तेंडुलकर
सर दर्शनासाठी आले होते, भारत वर्ल्ड कप जिंकला होता की त्यांनी कोणतातरी रेकॉर्ड
मोडला होता ते आठवत नाही पण आम्ही त्यांची स्वाक्षरी घेतली होती. दुर्दैवाने आज ती
स्वाक्षरी माझ्याकडे नाही पण मतकरी सरांची स्वाक्षरी मी आजही जपून ठेवलीये.
मराठीतील पुलंपासून, अत्रे, फडके,
शिवाजी सावंत ते आत्ताच्या नीरजा, प्रज्ञा दया पवार यांच्यापर्यंत तर इंग्रजीत शेक्सपिअर,
अगाथा ख्रिस्ती, सुधा मूर्ती, चिमामांदा आदिची, हारूकी मुराकामी, प्रीती शेणॉय
इत्यादी बऱ्याच सुंदर आणि वेगळं लिहिणाऱ्या लेखकांचं साहित्य मी वाचलंय पण रत्नाकर
मतकरींनी काळजात अक्षरशः घर केलंय. लिहिणं आणि लिहितं राहणं तशी आव्हानात्मक गोष्ट
आहे, विशेषतः गूढकथा. या कथा वाचल्यावर प्रत्येकवेळी वाचकाच्या अंगावर सरर्कन काटा
येईल, प्रत्येक वेळी थोडी का होईना भीती वाटेलच या ताकदीने लिहिणं म्हणजे अगदी
कौतुकास्पद गोष्ट आहे. अर्थात त्यांचं कौतुक करण्याची माझी ना पात्रता आहे ना
लायकी पण मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. शाळेत असतानाही आवडता लेखक विषयावर
मी त्यांच्याविषयी लिहिलंय, कदाचित अजून २० वर्षांनीही ‘आवडता लेखक कोण?’
विचारल्यावर मी एक मिनिटभरंही न थांबता ‘रत्नाकर मतकरी’ हेच उत्तर देईन.
मला त्यांच्या अजून गूढकथा वाचायच्या
होत्या, अजून नवनवीन पात्रं, वेगवेगळ्या घरांची वर्णनं वाचायची होती, ‘ऐक, टोले
पडताहेत!’, ‘मध्यरात्रीचे पडघम’, ‘खेकडा’ अशी अजून आगळीवेगळी शीर्षकं वाचायची होती
पण कधीकधी आपल्याला कितीही मिळालं तरी कमी वाटतं. मला अजून १०० पुस्तकं मिळाली
असती तरी कमीच वाटलं असतं. मृत्यूनंतर काय होतं, माहीत नाही पण एक मात्र नक्की ते
जिथे कुठे असतील तिथे अशीच साहित्यनिर्मिती करत राहतील कारण लिहिणारा हात कधी
थांबत नसतो. ते प्रत्यक्षात नसले तरी त्यांचे शब्द माझ्यासाठी कायम जिवंत राहतील.
ती म्हण आहे ना, ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ रत्नाकर मतकरी तर कीर्तीरुपानेही
आहेत आणि शब्दरुपानेही!
भावपूर्ण आदरांजली .......
खूप छान लिहलंय..
ReplyDeleteधन्यवाद!
Delete