रेषा

 

तुझी चित्रं

माझ्या कविता

तुझं चित्रांचं जग

माझा अक्षरांचा निवारा

तुझे विस्कटलेले रंग

माझ्याकडे शब्दांचा पसारा

अन् रेषांचा खेळ सारा...

 

तुझा कॅनव्हास

माझं पान

तुझा रंगछटांचा सहवास

माझं शब्दखुणांचं रान

तुझी कुंचल्याची हौस

माझ्या लेखणीचा पिसारा

अन् रेषांचा खेळ सारा...

 

तुझं चित्र

तुझ्या रेषा

माझे शब्द

माझ्या शिरोरेषा

तुझ्याकडे बहरलेली वेल

माझ्याकडे कवितांचा किनारा

अन् रेषांचा खेळ सारा...


तू,

तुझ्या रंगांचं सार

मी,

माझ्या शब्दांचा संसार

कुंचला झाला लेखणी

लेखणी झाला कुंचला

तू, मी, आपण,

तुझ्या माझ्या कलेचा डोलारा

अन् रेषांचा खेळ सारा...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

काळी ठिक्कर...